दि. २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.3० वाजता ‘भारतीय भिक्खू संघ’, ‘देव देश प्रतिष्ठान’, ‘छबी सहयोग फाऊंडेशन’ आणि ‘संविधान वार्ता’ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान दिवस सोहळा शहीद स्मारक माता रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर पूर्व येथे आयोजित करण्यात आला. त्यानिमित्ताने या कार्यक्रमाचा मागोवा घेणारा हा लेख...
विधान दिवस सोहळ्याचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन डॉ. रविंद्र कांबळे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात रविंद्र कांबळे यांनी संविधान उद्देशिकावाचन करून केली. संविधान दिवस सोहळ्याचे प्रमुख वक्ते नागेश धोंडगे यांनी संविधानाबद्दल मार्गदर्शन केले. संविधानाचा इतिहास, रचना, संविधान देशासाठी का महत्त्वाचे आहे, हे समजावले. संविधान दिवस सोहळ्यामध्ये संविधानाची एक प्रत प्रत्येकाच्या घरात असणे महत्त्वाचे आहे, हे पटवून दिले. या सोहळ्यामध्ये प्रमुख उपस्थिती ‘भारतीय भिक्खू संघा’चे कार्याध्यक्ष भिक्खू विरत्न महाथेरो हे होते.
या संविधान सोहळ्याला ‘देव देश प्रतिष्ठान’चे अध्यक्ष डॉ. वैभव देवगिरकर, ‘संविधान वार्ता’चे मुख्य संपादक विनोद कांबळे आणि त्यांचे सहकारी अनिलकुमार शेट्टी, ‘छबी सहयोग फाऊंडेशन’चे अध्यक्ष राहुल पाठारे आणि महासचिव पार्था रॉय, त्याचप्रमाणे, पत्रकार प्रशांत बढे, पत्रकार तानाजी कांबळे, ‘घे भरारी’ संस्थेचे अध्यक्ष स्नेहा भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते. संविधान दिवस सोहळ्याचे आयोजन आणि नियोजन ‘देव देश प्रतिष्ठान’चे डॉ. रविंद्र कांबळे यांनी केले आणि ‘देव देश प्रतिष्ठान’चे जय गणेश लिंगातर, शशिकांत तायडे, अमर चव्हाण, रविंद्र कांबळे यांच्या रात्रंदिवस केलेल्या सहकार्याने हा सोहळा यशस्वी झाला.
या संविधान सोहळ्यामध्ये तळागाळात जाऊन समाजासाठी काम करणार्या १४ मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला. या सगळ्या सन्मान केलेल्या व्यक्तींचे अतिशय साधे, सरळ मात्र महत्त्वपूर्ण कार्यक्षेत्र आहे. अगदी कचरा वेचक ते स्मशानभूमीतील कर्मचारी ते पत्रकार ते सामाजिक कार्यकर्ता ते धम्मकार्यात प्रविण असलेल्या अशा अनेक स्तरातील व्यक्तींना या कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या १४ व्यक्तींचा आणि त्यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय पाहूया-
स्वरूप रविंद्र नेटवटे (सामाजिक क्षेत्र)
शिक्षण संस्थेमार्फत कौशल्यविकास प्रशिक्षण राबवून तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी स्वरूप हे मेळावे आयोजित करतात. नशामुक्तीसाठी अभियान उभे केले.त्यामुळे हजारो कुटुंबांचे आयुष्य बदलले आहे.
रवींद्र गोळे (पत्रकारिता)
‘विवेक प्रकाशन’ आणि ‘समरसता साहित्य पत्रिके’चे संपादक, ४० पुस्तके प्रकाशित केली आहेत. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशन’चे ते विश्वस्त असून अनेक पुरस्कारांचे मानकरी आहे. सामाजिक कार्यातही ते अग्रेसर आहेत. समाजातील उपेक्षित घटकांच्या सक्षमिकरणासाठी त्यांनी लेखणीद्वारे आवाज उठवला आहे.
सुमन उघडे (कचरावेचक, पर्यावरण)
सुमन या केवळ कचरा उचलत नाहीत, तर संपर्कातील प्रत्येकाला स्वच्छतेची जाणिव करून देतात, पर्यावरण वाचवतात. कचरा वेचून उदरनिर्वाह करतानाही त्यांनी समाजशिलता कायम ठेवली आहे.
अविनाश कदम (सामाजिक क्षेत्र)
गोरगरीब जनतेसाठी घरे बांधून देणे, झोपडपट्टीतील तरुणांना व्यसनमुक्त करून क्रीडा क्षेत्राकडे वळवणे, रक्तदानासाठी ब्लड कार्डची सोय, रोजगार मेळावे आयोजित करणे अशा विविध स्तरावर अविनाश काम करतात. कोरोना काळात त्यांनी खूप सामाजिक कार्य केले आहे. रूग्णांना उपचारासंदर्भात सहकार्य केले तसेच गरजूंना विविध संस्थांच्या माध्यमातून अन्नही वितरीत केले.
दिलीप भालेराव (संविधान जनजागृती सामाजिक, शैक्षणिक)
संविधानाचा विचार प्रत्येकाच्या मनात रुजवण्यासाठी तसेच सामाजिक न्याय आणि शैक्षणिक प्रबोधन य दिलीप काम करतात. संविधानाचा खरा लोकाभिमुख आणि देशाभिमुख अर्थ समाजाला समजावा यासाठी ते प्रयत्नशिल आहेत. त्यासाठी ते अनेक उपक्रम राबवतात.
ज्योती बनसोडे (आरोग्य सेविका)
आरोग्य सेविका म्हणून काम करताना ज्योती यांनी निस्वार्थी कार्याचा ठसा उमटवला आहे. वस्तीतील आयाबायांना तसेच लेकारांना सर्वतोपरी त्या सहकार्य करतात.
अनिल कदम (सामाजिक क्षेत्र)
अनिल यांनी सामाजिक न्याय आणि समतेसाठी त्यांच्या स्तरावर संघर्ष आणि समन्वय साधला आहे. परिसरातील वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी ते कार्य करतात. शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रात घडणार्या अनेक घटनांसंदर्भात ते समाजबांधवाना सहकार्य करतात.
मधुसूदन पॉल (स्मशानभूमी कर्मचारी पर्यावरण)
मधुसूदन हे स्मशानभूमीमधले कर्मचारी आहेत. मृतकाबरोबर स्मशानात नातेवाईक येतात. त्यावेळी दु:खी लोकांना ते सर्वतोपरी सहकार्य करत असतात. तसेच पर्यावरणासंदर्भातही काम करतात.
मालती हवालदार (सामाजिक, महिला सक्षमीकरण)
समाजात महिलांना समान अधिकार मिळवून देण्यासाठी मालती यांचे योगदान आहे. यांच्या कार्यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास आणि स्वावलंबन निर्माण झाले आहे.
अमोल दहिवले (धम्मजागरण, समाज प्रबोधन)
अमोल हे धम्माचे तत्त्वज्ञान लोकांपर्यंत पोहचवतात. याद्वारे त्यांनी समाज प्रबोधनाचे कार्य केले आहे. त्यांच्या प्रयत्नांनी लोकांमध्ये नैतिकता, शांती आणि सहिष्णुतेचे बीज रुजवले आहे. समाजाच्या अध्यात्मिक आणि बौद्धिक उन्नतीसाठी अमोल कार्य करतात.
वैभव ठाकरे (निसर्ग वैभव फाऊंडेशन)
वैभव यांच्या निस्वार्थ प्रयत्नांमुळे निसर्गवैभव जपले जात आहे. जंगलांचे रक्षण आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले आहे. घाटकोपरच्या खंडोबा टेकडीच्या संवर्धनासाठी त्यांचे योगदान मोठे आहे.
शशिकला खरात (सामाजिक क्षेत्र)
शशिकला खरात यांनी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये डॉ. आंबेडकरांच्या विचारांतून प्रेरित होऊन कुटुंबाला सर्वाथाने संस्कारीत केले. अनेक नातेवाईकांच्या कुटुंबांनाही सहकार्य केले. पतीच्यापश्चात त्यांनी कुटुंबप्रमुखाची जबाबदारी समर्थपणे निभावली.
संध्या अंबाडे (सामाजिक क्षेत्र)
नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांवर कार्य करत असताना, समाजातील वंचित वर्गासाठी अनेक उपक्रम राबवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या उभारणीमध्ये त्यांच्या नेतृत्वाने महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. त्यांच्या कार्यामुळे, बाबासाहेबांच्या विचारांची जनमानसांत प्रसार आणि जतन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सुरू आहे.
लक्ष्मी देसाई (अन्नपूर्णा)
सकाळी 3 वाजता उठून स्वयंपाक करणे, सगळ्यांना वाढणे आणि यासाठी मोबदला मिळाला तर ठीक, नाही मिळाला तरी ठीक. अशा व्यक्तींचे अस्तित्वच आपल्याला शिकवते की, सेवा ही नेहमी निःस्वार्थ असते. त्यांच्या हातात असतो अन्नाचा सुवास, त्यांच्या चेहर्यावर असते प्रेमळ हसू आणि त्यांच्या मनात असतो फक्त दुसर्याचा विचार.
डॉ. वैभव देवगिरकर
९८६९६९७९५८