आज २०२४ या वर्षाच्या मैफिलीची भैरवी! सरत्या वर्षातील घडामोडींचे सिंहावलोकन महत्वाचे ठरते. २०२४ या वर्षाने जगासाठी, आपल्या देशासाठी बरेच काही अनुभव दिले. यातील मोजक्या मह्त्वाच्या देश ते राज्य पातळीवरील घटनांचा घेतलेला हा मागोवा...
प्रभू आले मंदिरी...
‘सकल हिंदू समाजा’च्या कित्येक वर्षांच्या अविरत संघर्षाला दि. २२ जानेवारी रोजी पूर्णविराम मिळाला. या दिवशी अयोध्येत रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यासाठी १६ नद्यांचे पाणी जगभरातून आणण्यात आले. प्राणप्रतिष्ठा जरी दि. २२ जानेवारी रोजी झाली असली, तरीही विविध धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात दि. १६ जानेवारीपासूनच झाली होती. लोकवर्गणीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी संकलन मंदिरनिर्मितीसाठी करण्यात आले होते. त्या सर्वांना प्रभू प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात प्रातिनिधिक सहभाग घेता यावा, यासाठी संपूर्ण देशात अक्षतांचे कलश फिरवले गेले. प्रभू रामचंद्रांची मूर्ती भारतातील प्रसिद्ध शिल्पकार योगीराज यांनी घडवली होती. देशभरात विविध ठिकाणी या सोहळ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. २०२४च्या सप्टेंबर महिन्यापर्यंत ११ कोटी श्रीरामभक्तांनी राममंदिराला भेट दिली.
अमेरिकेत ट्रम्प पुन्हा आले
अमेरिकेच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळवला. बायडन यांच्या प्रतिमामालिन्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाने कमला हॅरिस यांना उमेदवारी दिली. ट्रम्प यांनी एकूण ४९.९० टक्के मते मिळवत ३१२ इलेक्ट्रोलमध्ये विजय मिळवला, तर कमला हॅरिस यांना ४८.८ टक्के मतांसह २२६ इलेक्ट्रोलवर समाधान मानावे लागले. अमेरिकेच्या या निवडणुकीत एलॉन मस्क यांची भूमिका निर्णायक राहिली होती.
सन्मान... कष्टाचा.. कर्तव्याचा...कर्तृत्वाचा...!
वर्ष २०२४ मध्ये लालकृष्ण अडवाणी, एम. एस. स्वामीनाथन, माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव, चौधरी चरण सिंग आणि कर्पुरी ठाकूर यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच यावर्षी एम. वैंकय्या नायडू, पद्म सुब्राह्मण्यम, वैंजयंतीमाला, बिदेश्वर पाठक आणि चिरंजीवी यांना ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच यावर्षी भूतान, रशिया, नायजेरिया, डोमिनिका, गयाना, बार्बाडोस आणि कुवेत या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च पुरस्काराने गौरवले आहे. आजवर पंतप्रधान मोदी यांना १९ देशांच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले आहेत. तसेच, स्वामी रामभद्राचार्य आणि गुलझार यांना ज्ञानपीठ पुरस्कारही जाहीर झाले आहेत.
देशात पुन्हा एकदा मोदी सरकार!
२०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये रालोआला यश मिळाले असून देशाच्या जनतेने मोदी यांच्यावरच देशाची जबाबदारी सोपवली. ‘इंडी’ नावाने विरोधकांनी नवा डाव या निवडणुकीसाठी मांडला होता. युवराज राहुल गांधी यांनी देशव्यापी ‘भारत जोडो यात्रा’देखील काढली. या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील अवास्तव घोषणा, वादग्रस्त वक्तव्ये पाहायला मिळाली. खोट्या ‘नॅरेटिव्ह’विरोधात भाजपनेही विकासाच्या मुद्द्याला, प्रखर हिंदुत्वाची जोड दिली. या निवडणुकांमध्ये बाह्य शक्तींचा हस्तक्षेपदेखील कळीचा मुद्दा ठरला होता. एकूण सात टप्प्यांमध्ये झालेल्या मतदानात जनतेने पुन्हा एकदा रालोआ सरकारवरचा विश्वास कायम ठेवला. या निवडणुकीमध्ये रालोआला ४४.२९ टक्के, तर ‘इंडी’ आघाडीला ४१.८० टक्के मतदान झाले. आघाडी आणि रालोआ या दोन्हींकडे २५ पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा म्हणजे २४० जागी यश मिळाले, काँग्रेसने ९९ जागांपर्यंत मजल मारली. रालोआने बहुमताचा आकडा पार केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची तिसर्यांदा शपथ घेतली.
‘वक्फ’चा वाद
‘वक्फ (सुधारणा) विधेयक, २०२४’ हे दि. ८ ऑगस्ट २०२४ रोजी केंद्र सरकारकडून लोकसभेत सादर करण्यात आले. या विधेयकाच्या माध्यमातून ‘मुस्लीम वक्फ कायदा, १९२३’ रद्द करण्याचा आणि ‘वक्फ कायदा, १९९५’ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. या विधेयकावर लोकसभेत जुजबी चर्चा करून सुधारणा सूचवण्यासाठी हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले होते. या समितीला दिलेल्या मर्यादित काळानंतर सहा महिन्यांचा अतिरिक्त कार्यकाळ देण्यात आला आहे.
धगधगणारे मध्य-पूर्व
मध्य-पूर्वेत युद्धाच्या पसरलेल्या वणव्यामुळे शांतता हे जणू मृगजळच झाले आहे. ‘हमास’ या दहशतवादी संघटनेने दि. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलमध्ये असंख्य नागरिकांची हत्या केली, तर कित्येक इस्रायली नागरिक ओलीस ठेवले. त्यानंतर, इस्रायल-हमास युद्धाचा भडका उडाला. यामध्ये संपूर्ण गाझा पट्टीही उद्ध्वस्त झाली. हमासच्या मदतीला आलेल्या ‘हिजबुल्ला’मुळे या युद्धाची झळ इराणलादेखील बसली. इराणचे अतोनात नुकसान या युद्धात झाले आहे. हमासच्या मदतीसाठी लेबेनॉनमधून ‘हिजबुल्ला’ दहशतवाद्यांनी इस्रायलविरोधात मोहीम उघडली. इस्रायलविरुद्ध लेबेनॉन युद्धात लेबेनॉनचे अतोनात नुकसान झाले आहे.
आकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे...
देशाच्या अंतराळ क्षेत्राने २०२४ मध्ये मोठी झेप घेतली आहे. २०२४ या वर्षात विविध क्षेत्रांतील अनेक उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केले आहेत. केंद्र सरकारकडून अंतराळ क्षेत्रामध्ये १०० टक्के परकीय गुंतवणुकीला मान्यता मिळाली आहे. २०२२ मध्ये या क्षेत्रात एक स्टार्टअप होता, २०२४ मध्ये त्यांची संख्या २००च्या आसपास पोहोचली आहे. भारत स्वतःचे अंतराळ स्थानक निर्माण करणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे. त्याचप्रमाणे, भारत अमेरिकेच्या संयुक्त प्रकल्पामध्ये भारतीय अंतराळवीरदेखील सहभागी होणार आहेत.
महत्त्वाचे कायदे
रालोआ सरकारने जुने कायदे बदलण्याचा धडाका नव्या सरकारमध्येही कायम ठेवला. यावर्षी भारतीय दंडसंहितेच्या जागी ‘भारतीय न्याय संहिता’ देशभरामध्ये लागू करण्यात आली. त्याचबरोबर ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता’ आणि ‘भारतीय साक्ष्य अधिनियम’ हे तीन नवीन कायदे लागू करण्यात आले. त्याचप्रमाणे, बँकिंग कायदा (सुधारणा) ‘विधेयक २०२४’देखील लोकसभेमध्ये पारित करण्यात आले. तसेच, ‘एक देश एक निवडणूक’ कायद्याचे विधेयकदेखील संसदेत मांडण्यात आणि अधिक चर्चेसाठी हे विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आले. ‘वक्फ बोर्ड विधेयक’देखील संसदेच्या संयुक्त समितीकडे विचारार्थ आहे.
विकसित भारत - २०४७
आर्थिक वर्ष २०२४-२५च्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने ’विकसित भारत २०४७’ हे लक्ष्य निर्धारित केले. त्याअंतर्गत भारताच्या पूर्वेकडील प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी ’पूर्वोदय’ ही योजना तयार करण्यात येणार आहे. अणुऊर्जा विकास हासुद्धा विकसित भारताचा महत्त्वाचा भाग आहे. नवीकरणीय ऊर्जास्रोतांच्या विकासासाठी ’पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजने’चीदेखील सुरुवात केली. देशाला तेलबियांमध्ये ‘आत्मनिर्भर’ करण्यासाठी ’आत्मनिर्भर तेलबिया अभियान’देखील सुरू झाले. आदिवासी समाजाच्या विकासासाठी जनजातीय ‘उन्नत ग्राम योजना’, युवकांसाठी ‘कौशल्यविकास योजना’, सूक्ष्म लघु उद्योगांसाठी वित्तपुरवठा योजना, युवकांना देशातील प्रमुख औद्योगिक संस्थांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा यासाठी ‘इंटर्नशिप कार्यक्रम’ अशा अनेक नव्या योजनांबरोबर आधी सुरू असलेल्या अनेक योजनांमध्येही काळानुरुप बदल केले आहेत.
बांगलादेशचे पतन...
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी दि. ५ ऑगस्ट रोजी बांगलादेश सोडला आणि भारतात आश्रय घेतला. नंतर मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर बांगलादेशातील परिस्थिती स्फोटक झाली आहे. बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवर २ हजार, २०० हल्ले आजवर करण्यात आले आहेत. हिंदूंची श्रद्धास्थाने असलेली अनेक मंदिरे, देवांच्या मूर्ती यांची विटंबना करण्यात आली. अनेक हिंदू साधूंना अटक करण्यात आली. इतकेच नाही, तर बांगलादेशच्या स्वातंत्र्यसैनिकांचादेखील सातत्याने अपमान करण्यात येत आहे. सततच्या दंगलींमुळे बांगलादेशची अर्थव्यवस्थादेखील रसातळाला गेली आहे.
रशिया-युक्रेन युद्धविराम नाहीच!
दि. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी सुरू झालेले रशिया युक्रेन युद्ध १ हजार, ३२ दिवसांनंतरही धुमसत आहे. आजपर्यंत झालेल्या या युद्धामध्ये दोन्ही बाजूंकडील पक्षांची मोठ्या प्रमाणात हानी झाली असून, १२ हजार, ३४० नागरिकांना जीव गमवावा लागला आहे, तर या युद्धामध्ये असंख्य सैनिकांनी हौतात्म्य पत्करले आहे. या दोन्ही देशांत सुरू असलेल्या युद्धामुळे, दोन्ही देशांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच, या युद्धाचा परिणाम म्हणजे, जगालाही आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात सहन करावे लागले आहे.
महाराष्ट्रात ‘देवेंद्रपर्व’
लोकसभेपाठोपाठ ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक झाली. यामध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. महायुतीमधील प्रत्येक घटक पक्षाचा एकमेकांशी असलेला समन्वय, ‘लाडकी बहीण’सारख्या लोकप्रिय घोषणा, मुस्लीम लांगूलचालनाचा मविआचा जुनाच डाव ही महायुतीच्या विजयाची प्रमुख कारणे ठरली. यामध्ये महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपला १३२, शिवसेना पक्षाला ५७ आणि राष्ट्रवादी पक्षाला ४१ व इतर घटक पक्षांना मिळनू पाच जागा मिळाल्या. या निवडणुकीमध्ये महायुतीला एकूण २३५ जागी विजय मिळाला, तर विरोधकांना जेमतेम अर्धशतकी मजल मारता आली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला ४९.३० टक्के मतदान झाले, तर ३५.१७ टक्के मतदान मविआला झाले. देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली .
काँग्रेस का ‘हात’ सोरोस के साथ...
देशाच्या संसदेमध्ये सभागृहामध्ये पहिल्यांदाच जॉर्ज सोरोसबरोबर काँग्रेसचा ‘हात’ असल्याचा आरोप करण्यात आला. ‘फोरम फॉर डेमोक्रॅटिक लीडर्स ऑफ एशिया पॅसिफिक’ या संस्थेच्या मुख्य सदस्यत्वावरून, सोनिया गांधी यांच्यावर भाजपकडून आरोप करण्यात आले. या संस्थेला जॉर्ज सोरोसच्या ‘ओपन सोसायटी फाऊंडेशन’मधून वित्तपुरवठा होत असल्याचेदेखील भाजपच्यावतीने संसदेमध्ये सांगण्यात आले. मात्र, या आरोपांबाबत विरोधी पक्षांनी कानांवर हात ठेवले.
भारतीय संस्था आणि उद्योजक लक्ष्य
‘हिंडेनबर्ग’ या अमेरिकास्थित संस्थेने सातत्याने ‘भारतीय उद्योग समूह’ असलेल्या ‘अदानी समूहा’वर आरोप केले होते. त्यामुळे ‘अदानी समूहा’च्या भागभांडवलात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. कृत्रिमरित्या भांडवली बाजरामध्ये हस्तक्षेप करणे, समभागांच्या किमतीमध्ये कृत्रिम फुगवठा निर्माण करणे, तसेच करचोरी करणे, असे अशा आरोपांचा त्यात समावेश होता. ‘हिंडेनबर्ग’च्या ‘अदानी समूहा’वरील नव्या आरोपांमध्ये ‘अदानी समूहा’तील अफरातफरीबरोबरच ‘सेबी’प्रमुख माधबी बुच यांच्यावर अदानी यांच्याशी हितसंबंध असल्याचे आरोप केले गेले. मात्र, ‘अदानी समूहा’ला याबाबत अमेरिकेच्या न्यायालयात निर्दोष घोषित करण्यात आले होते. ‘हिंडेनबर्ग’च्या आरोपानंतर विरोधकांनीदेखील माधबी बुच यांचा मुद्दा रेटून धरला. या प्रकरणात माधबी बुच यांना चौकशीसाठी संसदेच्या संयुक्त समितीसमोर हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे.
काही शेष काही विशेष
सुधारित नागरिकत्व कायदा देशभरात लागू, केंद्र सरकारची घोषणा. या कायद्यात पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपकडून सर्वाधिक महिला उमेदवारांना संधी
भारत-कॅनडा संबंधात मिठाचा खडा. भारताने कॅनडातील राजनयिक अधिकार्यांना माघारी बोलावले.
मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा
अनिल देशमुख यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा प्रयत्न - न्या. चांदीवाल यांचा आरोप
बोफर्स प्रकरणाच्या चौकशीमध्ये सहकार्य करण्यासाठी भारत अमेरिकेला नोटीस पाठवणार
सर्वोच्च न्यायालयाकडून ‘निवडणूक रोखे योजना’ रद्द
विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण एकमताने मंजूर, मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षण लागू, अंमलबजावणीही सुरू
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ब्रिटनमधून १०० टन सोने भारतात आणण्याचा निर्णय घेतला.
नॅशनल नंबरिंगमध्ये २१ वर्षांनंतर सुधारणा
पेपरफुटीसाठी कायदा. दहा वर्षांची शिक्षा, एक कोटींचा दंड
छत्रपती शिवरायांची वाघनखे लंडनवरून सातारा येथे दाखल
न्यायदेवतेच्या हातात आता तलवारीऐवजी संविधान
९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जानेवारी महिन्यात दिल्लीत
संजीव खन्ना ५१ भारताचे सरन्यायाधीश
प्रसार भारतीचा ‘वेव्ह’ नावाचा ओटीटी प्लॅटफॉर्म लॉन्च
तुळजापूरला आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘कावड्यांचे गाव’ म्हणून प्रथमच मानांकन
भारतीय लष्कराने त्वचा बँक सुरू करण्याचा निर्णय घेतला
प्राण्यांच्या देखभालीसाठी स्मॉल अॅनिमल रुग्णालयाची देशात मुंबईत पहिल्यांदा स्थापना
अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर
अमिताभ बच्चन यांना तिसरा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर
‘वर्ल्ड कृषी फोरम’चा सर्वोकृष्ट कृषी पुरस्कार महाराष्ट्राला
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते १०९ नवी बियाणी राष्ट्राला अर्पण
पुण्यात तीन ‘रुद्रम सुपर कंम्प्युटरिंग यंत्रणे’चे पंतप्रधान मोदी यांच्याकडून उद्घाटन
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मुंबईतील ‘इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’ येथे कर्करोगासाठी भारतातील पहिली घरगुती सीएआर-टी थेरपीची सुरुवात केली.
संसर्गजन्य रोगांशी यशस्वी लढा देण्यासाठी भारताचा प्रतिष्ठित गोवर आणि रुबेला चॅम्पियन पुरस्काराने सन्मान
मिरजेच्या सतार आणि तानपुरा वाद्यांना जीआय टॅग
साखर उत्पादनात देशात महाराष्ट्र अव्वल.