गृहनिर्माण संस्था आणि शासन यांच्यात ‘रामसेतू’ उभारणारे, स्वभावाने फणसाप्रमाणे, वरून काटेरी अन् आतून मधाळ असे ‘ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन’चे अध्यक्ष सीताराम राणे यांच्याविषयी...
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यामधील वाघेरी या गावी एका सर्वसामान्य कुटुंबात, सीताराम राणे यांचा जन्म झाला. वडील बंधू मुंबईत असल्याने, नोकरीच्या शोधात त्यांनी भांडूप गाठले. युवावस्थेत नाटकांची आवड असल्याने, पदरमोड करून अनेक कलाकृती साकारल्या. 1985 साली ठाण्यात स्थायिक झाले. पदरी भांडवल नसतानाही, मित्र परिवार आणि स्वतःच्या हिंमतीवर उद्योग करण्याचा निर्णय घेतला. 1995 सालच्या काळात ठाण्यातील एका ‘झोपडपट्टी पुनर्वसन योजने’चे काम त्यांनी हाती घेतले. मात्र, या कामात अपयश आल्याने गुंतवलेले भांडवलही परत मिळाले नाही. व्यवसायात पहिल्यांदाच अपयश आलेले असतानाही, सीताराम राणे यांनी खचून न जाता त्याच प्रकल्पाच्या बाजूला, दुसरा गृहनिर्माण प्रकल्प यशस्वीपणे उभारुन दाखवत आपल्या जिद्दीची चुणूक दाखवली.
आपण ज्या खेडेगावातून आलो, तेथील तरुणांसाठी, शेतकरी-कष्टकर्यांप्रति एक सामाजिक जबाबदारी म्हणून समाजकार्य करावे, या हेतूने ‘कोकण ग्रामविकास मंडळा’ची स्थापना केली. सुरुवातीला ठाण्यातील दहीहंडी उत्सव आणि इतर उपक्रमांद्वारे प्रसिद्धी मिळाली. मात्र, दहीहंडीतील थरांचा वाद आणि स्पर्धा यांमुळे दहीहंडीतील थरांच्या थराराऐवजी, आगळ्या पद्धतीने उत्सव आयोजित करून हा निधी गरजूंसाठी देत आहेत. हा शिरस्ता कायम असल्याचे राणे सांगतात.
सीताराम राणे हे अतिशय उत्सवप्रिय आहेत. काव्य, नाट्य, संगीत यासह विविध क्षेत्रात त्यांनी वेगळा ठसा उमटविला आहे! कोकणातील शेती, लघुउद्योग, खाद्य संस्कृती, पारंपरिक व्यवसाय, कलाकुसर यांना ठाणे, मुंबईतील बाजारपेठ मिळावी, या उद्देशाने ठाण्यात दरवर्षी ‘कोकण ग्रामविकास मंडळा’च्यावतीने ‘मालवणी महोत्सवा’चे आयोजन करतात. 27 वर्षांपासून हा महोत्सव ठाण्यात दरवर्षी होत आहे. या माध्यमातून कोकणातील व्यावसायिकांना, बाजारपेठा उपलब्ध होण्यासह सांस्कृतिक जनजागरणाचे शिवधनुष्य त्यांनी लीलया पेलले आहे. ‘मालवणी महोत्सवा’त आजवर अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वे तसेच, अनेक कलाकृती सादर होऊन त्यामुळे रसिकांचे मनोरजंन झाले आहे. ‘मालवणी महोत्सवा’त कोटी कोटींच्या उलाढाली होत असल्याने, एकप्रकारे कोकणातील अनेक व्यावसायिकांना सधन केले, तर तरुणांना रोजगार उपलब्ध केला . त्यामुळे राणेंना ‘मालवणी महोत्सवा’चे प्रणेते म्हटल्यास, वावगे ठरणार नाही.
उत्तम संघटक व अभ्यासू वक्ते असलेले राणे, चांगले कलावंत व लेखकही आहेत. कोकणची सर्वांगसुंदर माहिती देणारे ‘कोकणमुद्रा’ हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. 2008 सालापासून ‘ठाणे डिस्ट्रिक्ट को-ओपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन’ आणि 2009 सालापासून ‘महाराष्ट्र स्टेट को-ओपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन’चे अध्यक्षपद सीताराम राणेे भूषवित आहेत. निःस्वार्थी व निःस्पृह सेवा करून, जनाची प्रगती हा सहकाराचा पाया आहे. या अनुषंगाने गृहनिर्माण संस्थेसंदर्भातील तक्रारी असो, सहकार क्षेत्रातील प्रश्न असो, महापालिका स्तरावरील समस्या, बांधकाम विषयक बाबी किंवा विद्यार्थांना लागणारी सर्वतोपरी मदत, यासाठी सीताराम राणे सर्वांना आपला हक्काचा माणूस वाटतो. आजवर त्यांनी सहकारी गृहनिर्माण संस्थांसमोरील अनेक प्रश्न सोडविले असल्याने, ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांना लाभ झाला आहे.
प्रत्येक फुल जोडून जशी फुलांची माळ तयार होते, दिव्या शेजारी दिवा लावत सुंदर दिपावली साजरी होते, तशीच सुंदर विचारांची माणसे जोडून त्यांनी, माणुसकीची एक सुंदर माळ तयार केली आहे. सहकारी गृहनिर्माण क्षेत्रातील सर्व कायदे, नियम यांचा चालता बोलता विश्वकोष म्हणजे सीताराम राणे! ठाणे महापालिकेच्या भांडवली मूल्यावर आधारित करप्रणालीला विरोध करीत त्यांनी अभिरूप महासभा भरवली. ‘सुलभ डिम्ड कन्व्हेअन्स योजना’, ‘तंटामुक्त गृहनिर्माण संस्था अभियान’, सोसायट्यांची बंधपत्रातून मुक्तता, पाणीपट्टी, विद्युत बिलाची समस्या, अकृषिक कर (एन.ए.टॅक्स ) रद्द करणे आदी सोसायट्यांचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले.
मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात सहकार हा स्वतंत्र विषय असावा. सहकारी गृहनिर्माण क्षेत्रात एमबीए, ‘पीएच.डी’ करता यावी, यासाठी ते आग्रही आहेत. कोणतेही राजकीय लाभाचे पद नसताना, सीताराम राणे यांनी गृहनिर्माण संस्थांसाठी ‘हाऊसिंग अदालत’ तसेच 32 हजार गृहनिर्माण संस्थांचे भव्य ‘महाअधिवेशन’ राबवून, समाजकारणात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. ठाणे जिल्ह्यात प्रथमच झालेल्या या महाअधिवेशनाची दखल दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घेतली. समाजहित जपताना पदरमोड झाली, तरी राणे मागे हटत नाहीत. कार्यक्रम कोणताही असो, सादरीकरणात कोणतीही कसर राहता नये, याकडे त्यांचा कायम कटाक्ष असतो.
‘महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघ’, ‘ठाणे हाऊसिंग फेडरेशन’चे, कोकण ग्रामविकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, ‘डीम्ड कन्व्हेअन्स’ आढावा समितीवर महाराष्ट्र शासनाचे निमंत्रक, महाराष्ट्र राज्य हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचे संचालक, समर्थ को.ऑप. कन्झ्युमर सेंट्रल स्टोअर्सचे सल्लागार आणि भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशा विविध संस्था, संघटनांच्या माध्यमातून आपल्या सेवाकार्याचा वसा अविरत जपणार्या सीताराम राणे यांना वाढदिवसानिमित्त दै. ‘मुंबई तरूण भारत’च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
9892874087