मुख्यमंत्र्यांचा निर्णय; ग्रामपंचायतीच्या "एनओसी"ची गरज नाही
31-Dec-2024
Total Views | 71
मुंबई : (Mukhymantri Saur Krushi Vahini Yojana) शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी' प्रकल्पाच्या अटी शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प राबवितांना विकासकांना आता ग्रामपंचायतीकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेण्याची आवश्यकता नाही, असे फडणवीस यांनी मंगळवार, दि. ३१ डिसेंबर रोजी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहावर 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.०' ची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, प्रधान सचिव एकनाथ डवले, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव, श्रीकर परदेशी, नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा, मुख्य विद्युत निरिक्षक संदीप पाटील, ऊर्जा विभागाचे वरीष्ठ अधिकारी त्याचप्रमाणे दुरदृष्य प्रणालीद्वारे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे तसेच पुणे, जालना, लातूर, अहिल्यानगर, नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच या प्रकल्पाचे विकासक उपस्थित होते.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी हा महाराष्ट्र शासनाचा 'फ्लॅगशीप' कार्यक्रम आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून काम करत असतांना प्रकल्प विकासकांना ज्या ठिकाणी अडीअडचणी येत असतील, तर संबंधित जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी नियमित आढावा बैठक घेऊन घेऊन त्या समस्या सोडवाव्यात. यासंदर्भातील अहवाल पुढील १५ दिवसामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच जमीन अतिक्रमीत झालेल्या ठिकाणी प्रकल्प विकासक तसेच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रित बैठक घ्यावी. त्याचप्रमाणे विकासकांना येणाऱ्या अतिक्रमीत जमिनीसंदर्भात समस्या सोडविण्यासाठी पोलीस अधीक्षक यांना जबाबदारी देण्यात यावी, अशी सूचना त्यांनी केली.
परवानगी प्रक्रिया ऑनलाइन करा
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाकरिता प्रकल्प विकासकांना लागणाऱ्या आवश्यक सर्व परवानग्या ऑनलाईन देण्याचे निर्देश करत मुख्यमंत्री म्हणाले की, हा प्रकल्प राबवितांना काही अडीअडचणी येत असतील आणि त्या जिल्हापातळी, गावपातळीवर सोडविणे शक्य नसेल तर त्या मंत्रालय स्तरावर सोडविल्या जातील. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन कार्यान्वित होईल, या कामाकडे सर्वांनी जबाबदारी पूर्वक पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या.