गुंडांचे राज्य चालू देणार नाही! संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिकी कराडच्या अटकेनंतर मुख्यमंत्र्यांचा इशारा
31-Dec-2024
Total Views | 106
(Photo - Devendra Fadanvis Youtube)
मुंबई : बीडच्या प्रकरणात आम्ही कुणालाही सोडणार नसून गुंडांचे राज्य चालू देणार नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मंगळवार, ३१ डिसेंबर रोजी वाल्मिक कराडने सीआयडीपुढे शरणागती पत्करली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधत ही प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "बीडच्या प्रकरणात आम्ही कुणालाही सोडणार नाही, हे मी पहिल्या दिवशीपासून सांगत आहे. ज्याचा ज्याचा संबंध ज्या ज्या प्रकरणात आढळला त्या प्रत्येकावर कडक कारवाई करण्यात येईल. आम्ही गुंडांचं राज्य चालू देणार नाही. कुणालाही अशा प्रकराची हिंसा करता येणार नाही, खंडणी मागता येणार नाही. यादृष्टीने अतिशय गतीशील तपास केला आहे. त्यामुळे आज त्यांना शरणागती पत्करावी लागली. हत्येतील फरार आरोपींना पकडण्यासाठी वेगवेगळ्या टीम कामाला लागल्या आहेत. आम्ही सगळ्यांना शोधून काढणार असून कुठलाही आरोपी सोडणार नाही," असे आश्वासन त्यांनी दिले.
"स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंची आणि माझी फोनवर चर्चा झाली आहे. तुम्ही काळजी करू नका, वाट्टेल ते झाले तरी सगळे दोषी शोधून जोपर्यंत ते फासावर लटकत नाही तोपर्यंतची सगळी कारवाई पोलिस करतील, हा विश्वास मी त्यांना दिला आहे," असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, "वाल्मिक कराडवर कोणता गुन्हा दाखल होईल, कसा होईल हे सगळे पोलिस सांगतील. पुराव्यांच्या आधारे कुणालाही सोडणार नाही. यासंदर्भात वेळोवेळी पोलिस निर्णय घेतील. हा खटला जाणीवपूर्वक सीआयडीला देण्यात आला असून त्यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आली आहे. त्यांच्यावर कुणाचाही दबाव चालवून घेतला जाणार नाही. कुणीही काहीही म्हणत असले तरी पोलिस पुराव्याच्या आधारेच कारवाई करणार आहेत. त्यामुळे व्हिडीओमध्ये कोण काय म्हणतो हा विषय नाही. जिथे पुरावा आहे त्याला सोडले जाणार नाही."
विरोधकांना राजकारण लखलाभ!
"मला या प्रकरणातल्या राजकारणात जायचे नाही. कुणाच्याही विरुद्ध पुरावा असल्यास तो द्यावा. पण माझ्याकरिता स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत लोकांना शिक्षा होणे महत्वाचे आहे. काही लोकांना केवळ राजकारण महत्वाचे आहे. त्यांचे राजकारण त्यांना लखलाभ आहे. त्यांच्या राजकारणाने फार फायदा होईल असे वाटत नाही. त्यामुळे मला कुठल्याही राजकीय वक्तव्यात जायचे नाहीत. त्या वक्तव्याचे समर्थनही करायचे नाही आणि विरोधही करायचा नाही. त्यांनी त्यांचे राजकारण करत राहावे. मात्र, संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्याची आमची भूमिका स्पष्ट आहे," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.