सौर उर्जा व पर्जन्य जल सारख्या पर्यावरणपूरक स्त्रोतांना प्राधान्य
गृहनिर्माण संस्थांच्या महाअधिवेशनामधील प्रदर्शनाला हजारो नागरीकांची भेट
30-Dec-2024
Total Views | 41
ठाणे : सिमेंट, कॉक्रीटच्या जंगलात विकासाचे इमले उभे राहत असले तरी पायाभूत सुविधासाठी निसर्गातील शाश्वत पर्यायाची गरज निर्माण झाली आहे. या अनुषंगाने सौर उर्जा ( Solar Energy ) आणि पर्जन्य जल यासारख्या पर्यावरणपुरक बाबींकडे नागरिकांचा ओढा वाढत आहे. ठाण्यात पार पडलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या महाअधिवेशनामधील प्रदर्शनात पर्यावरणपुरक सुविधा पुरवणाऱ्या स्टॉलवर हजारो नागरीकांची झुंबड उडाल्याचे दिसुन आले.
सहकार विभाग आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील उपवन तलाव परिसरातील भव्य मैदानात २७ ते २९ डिसेंबर या कालावधीत गृहनिर्माण संस्थांचे महाअधिवेशन व प्रदर्शन नुकतेच पार पडले. फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांच्या पुढाकाराने ठाण्यात प्रथमच पार पडलेल्या महाअधिवेशनातील प्रदर्शनात गृहनिर्माण संस्थासाठी उपयुक्त ठरणाऱ्या वेगवेगळ्या व्यावसायिकांचे स्टॉल्स, विकासक, अर्थसाह्य करणाऱ्या संस्था त्याचबरोबर पर्यावरणपुरक सोलर वीज निर्मिती, रेन वॉटर हॉर्वेस्टींग व घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांचे ५६ स्टॉल्स उपलब्ध होते. या स्टॉल्सवर तीन दिवसात तब्बल १५ हजार नागरीकांनी भेटी दिल्या.
सौर ऊर्जा ही भविष्याची गरज आहे. भारतात सर्वाधिक वीज निर्मिती दगडी कोळशाने होत असली, तरी पुढच्या काही काळात कोळशाच्या खाणी या संपणार आहेत. त्यामुळे उद्याचा विचार करता, सौर ऊर्जा ही काळाची गरज आहे. आपल्याकडे सूर्य प्रकाश मुबलक प्रमाणात असल्याने सौर ऊर्जा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. दगडी कोळशाने प्रदूषण देखील होत असल्याने, सौर ऊर्जा सर्वांसाठी उपयुक्त ठरणार आहे. याचमुळे सौर उर्जेचे संच मोठी गृहसंकुले किंवा पाण्याच्या पंपासाठी फायदेशीर ठरत आहेत.
आपल्याकडे मुबलक पाणी असेल तरी, वाढते जलप्रदूषण देखील जैव साखळीसाठी धोक्याची घंटा आहे. शुध्द पाणी आरोग्यासाठी मिळणे महत्वाचे असल्याने अनेक घरात शुद्ध पाण्यासाठी जल वॉटर सोल्युशन बसवण्यात आले आहेत. या प्रदर्शनात देखील पाण्याचे महत्व पटवून देण्यात आले आहे. या सोबतच आपल्या गृह संकुलात रेन वॉटर हार्वेस्टिंग किती फायदेशीर आहे याची देखील माहिती सांगण्यात येत होती.