आत्मस्वराने गाण्यासाठी योगसाधना आवश्यक - दाजी पणशीकर

"गान सरस्वती आदिशक्तिचा धन्योद्गार" या पुस्तकाचे प्रकाशन

    30-Dec-2024
Total Views | 34
Daji Panshikar

ठाणे : आत्मस्वराने गाण्यासाठी योगसाधना आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर ( Daji Panshikar ) यांनी व्यक्त केले. दाजी पणशीकर लिखित 'गान सरस्वती आदिशक्तिचा धन्योद्गार' या मॅजेस्टिक प्रकाशित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मॅजेस्टीक पब्लिशिंग हाऊस आणि तारांकित संस्था यांच्या वतीने शनिवारी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृह येथे पार पडला. या कार्यक्रमात पणशीकर यांनी ‘किशोरीताईंचे प्रातिभदर्शन आणि मी’ या विषयावर व्याख्यान दिले.

या कार्यक्रमाला तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, किशोरी आमोणकर यांची नात आणि शिष्या तेजश्री, मीरा पणशीकर, शिष्य रघुनंदन पणशीकर, नृत्य दिग्दर्शिका सोनिया परचुरे, पुतणे विजय आमोणकर, अशोक कोठावळे आदी उपस्थित होते.तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी त्यांच्या मनोगतात किशोरी आमोणकरांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. 'किशोरी आमोणकरांसारखा कलाविष्कार सादर करण्यासाठी तशी प्रतिभा असावी लागते आणि प्रतिभेसाठी प्रज्ञा जागृत व्हावी लागते. प्रज्ञा जागृत होण्यासाठी कलावंतामध्ये एक जाणता अस्वस्थपणा असावा लागतो जो किशोरी आमोणकरांमध्ये होता. मात्र आज त्याची उणीव भासते,' असे मत पं. तळवलकर यांनी व्यक्त केले.दाजी पणशीकर यांनी किशोरी आमोणकर यांचा जीवनापट उलगडताना, किशोरीताईंच्या अनेक आठवणी व स्नेहबंध सांगितला. तसेच, सर्वसामान्य माणसाला प्राचीन काळापासून मनोरंजनाची गरज आहे. तपश्चर्या केल्याशिवाय काही होत नाही या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर मला समजले असेही पणशीकर म्हणाले.

दाजी पणशीकर यांनी या पुस्तकात किशोरी आमोणकरांच्या सांगितिक प्रतिभाशक्तीचा वेध घेतला आहे, असे प्रकाशक अशोक कोठावळे यांनी प्रास्ताविकात सांगितले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन नरेंद्र बेडेकर यांनी केले. या कार्यक्रमात पुस्तकातील 'लौकिक आणि अलौकिक' हा लेख प्रा. मोहिनी सप्रे यांनी वाचला. उपस्थितांचे आभार नंदिनी बेडेकर यांनी मानले.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121