देवाच्या काठीला आवाज नाही तसाच देवाभाऊच्या काठीलाही आवाज नाही!

आमदार सदाभाऊ खोत : बीड प्रकरणात निश्चित न्यायनिवाडा होणार

    30-Dec-2024
Total Views |
 
Sadabhau Khot
 
मुंबई : देवाच्या काठीला आवाज नाही तसाच देवाभाऊच्या काठीलाही आवाज नाही, अशा भावना विधानपरिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केल्या. तसेच बीड प्रकरणात निश्चितपणे न्यायनिवाडा होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सोमवार, ३० डिसेंबर रोजी त्यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला.
 
सदाभाऊ खोत म्हणाले की, "बीडमध्ये अमानुषपणे सरपंचाची हत्या करण्यात आल्याने महाराष्ट्रातील जनतेची मने सुन्न झाली आहेत. राज्यात देवाभाऊंचे सरकार आहे. जसा देवाच्या काठीला आवाज नसतो तसाच देवाभाऊंच्या काठीलाही आवाज नाही. पण न्यायनिवाडा निश्चित होणार आहे. हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांना जास्तीत जास्त शिक्षा होणे गरजेचे आहे."
 
हे वाचलंत का? -  वाल्मिक कराडची बँक खाती गोठवली! पत्नीची सीआडीकडून चौकशी
 
"सरकारच्या तपासात ज्यांची नावे येतील त्यांच्यावर कारवाई होईल. या राज्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढू नये या भावनेतून सामाजिक क्षेत्रातील लोकांनी आपले मत व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही गोष्ट गंभीरपणे घेतली असून राज्याला एक संवेदनशील मुख्यमंत्री लाभले आहे. त्यामुळे काही दिवसात या प्रकरणात सरकारची कठोर भूमिका पाहायला मिळेल. २०१४ ते २०१९ मध्ये मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना देवाभाऊंनी राज्यातील गुन्हेगारांना ठेचून काढले होते. मीसुद्धा तेव्हा मंत्री होतो आणि अनेकांवर आम्ही मोका लावला होता. महाराष्ट्रातील पोलिस दल हे कार्यक्षम आणि कर्तव्यदक्ष आहे. या राज्याला पारदर्शकता असणारा मुख्यमंत्री मिळाला असून सगळी गुन्हेगारी ठोकून काढली जाईल. पाच वर्षात सामान्य माणसाला त्रास होणार नाही अशी व्यवस्था देवाभाऊंच्या नेतृत्वात निर्माण होईल," असेही ते म्हणाले.
 
मी नाराज नाही!
 
"मी अजिबात नाराज नाही. महायुतीचे सरकार येण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न केला. काँग्रेसची ५० वर्षांची राजवट आम्ही बघितली. यात गावगाडे लुटले जात होते, न्याय मागणाऱ्यांचा आवाज दाबला जात होता. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील यांच्यानंतर महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याची दुरदृष्टी असलेले नेतृत्व देवाभाऊच्या रुपात नव्याने उदयाला आले आहे. या व्यक्तीमत्वाला महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी मिळावी यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलो," असेही ते म्हणाले.