लोकसभेला गुलाल उधळणाऱ्या निलेश लंकेच्या पत्नी राणी लंकेचा पराभव
03-Dec-2024
Total Views | 116
अहिल्यानगर, दि.३ : विशेष प्रतिनिधी अगदी काही महिन्यांपूर्वीच गुलाल उधळणाऱ्या शरदचंद्र पवार गटाच्या निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके पारनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. मात्र निलेश लंके यांचा लोकसभेचा विजयी गुलाल उतरलाही नसताना मतदारांनी निवडणूक रिंगणात उतरलेल्या निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना सपशेल नाकारले. लंके यांच्याविरोधात अजित पवार गटाचे काशिनाथ दाते निवडणूक लढवत होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी जोरदार पीआर केल्याने आणि महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसच्या जोरावर विजयी झालेल्या खासदार नीलेश लंके यांनी पत्नी राणी लंके यांना विधानसभा निवडणुकीत रिंगणात उतरवले होते. या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार काशिनाथ दाते यांनी पारनेर विधानसभा मतदारसंघात विजय मिळविला आहे.
अजितदादांची सभा आणि वातावरण पलटले
निकालानंतर पहिल्यांदाच पुतण्याला भेटल्यावर अजितदादांनी रोहित पवार यांना प्रीतिसंगमावर अत्यंत मिश्कीलपणे 'ढाण्या थोडक्यात जिंकलास, पण माझी सभा झाली असती तर काय झालं असतं?' असा सवाल केला. पराभवाच्या छायेत असणाऱ्या रोहित पवारांचा केवळ १२०० मतांनी विजय झाला. अजित पवारांची सभा झाली असती तर नेमके काय झाले असते? याचे उत्तम उदाहरण म्हणजे राणी लंके यांचा पराभव म्हणता येईल. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून पारनेर मतदारसंघ आपल्याकडे ठेवत काशिनाथ दाते यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. अजित पवार यांनी पारनेरमध्ये सभा घेऊन जी वातावरण निर्मिती केली त्याचा फायदा काशिनाथ दाते यांना झाला.
लंकेचा दगा आणि अजितदादांची फिल्डिंग
पक्ष फुटीच्यावेळी सोबत आल्यानंतर लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी दगा देत खासदार झालेल्या नीलेश लंकेविरोधात अजित पवार यांनी विधानसभेसाठी तगडी फिल्डिंग लावण्यास काही महिने आधीच सुरुवात केली होती. निवडणुका जाहीर होण्याच्या काही आठवडेआधीच ऑक्टोबर महिन्यात पारनेरचे माजी माजी नगराध्यक्ष विजय औटी यांच्यासोबतच जिल्हा परिषद उपाध्यक्ष, भाजपचे सुजित झावरे, माजी बांधकाम सभापती काशिनाथ दाते, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखेडे, धनगर समाजाचे नेते शिवाजी गुजर यांनी आपल्या समर्थकांसह अजितदादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे तालुक्यात अजितदादांच्या पक्षाला बळ मिळाले. अजित पवारांनी निलेश लंकेचे होमग्राऊंड पारनेरमध्ये बाजार तळ येथे कार्यकर्ता मेळावा आणि पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेऊन विधानसभेची वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली होती. इतकंच नाहीतर प्रचारसभेवेळी निलेश लंके यांचे कट्टर विरोधक विजय औटी यांनी उपस्थित राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काशिनाथ दाते यांना पाठिंबा दिला. औटी यांनी महायुतीच्या उमेदवाराला दिलेल्या पाठिब्यानेही पारनेर विधानसभेत चित्र बदलेले पाहायला मिळाले. पारनेरमध्ये विखे समर्थकांची संख्याही मोठी आहे. लोकसभेतील पराभवानंतर राधाकृष्ण विखे व डॉ. सुजय विखे यांनी लंके विरोधकांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतला होता.
ठाकरेंच्या उमेदवाराची बंडखोरी लंकेच्या पथ्यावर
पारनेरची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लढावी अशी मागणी करत कट्टर शिवसैनिक संदेश कार्ले यांनी मातोश्रीच्या पायऱ्या झिझवल्या. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी लंके यांच्या विजयासाठी जीवाचे रान केले होते. मात्र तिथे अपयश आल्याने कट्टर शिवसैनिक संदेश कार्ले यांनी बंडखोरी केली. संदेश कार्ले यांचे नगर तालुक्यात मोठे संघटन आहे. हे पाहता कार्ले यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. पारनेर मतदारसंघातील बरीच गावे नगर तालुक्यात येत असल्यानेही राणी लंके यांच्यासमोर आव्हान निर्माण झाले होते. कार्ले यांनी या निवडणुकीत तब्बल १० हजार ८०३ मते मिळवली. ज्याचा फटका एकार्थाने राणी लंके यांना बसला.