सीरियामध्ये पुन्हा गृहयुद्धाची नांदी

‘तहरीर अल-शाम’ बंडखोर गटाचे असद राजवटीला आव्हान

    03-Dec-2024
Total Views | 29
Syria

दमास्कस : सीरियामध्ये बंडखोरांनी पुन्हा डोके वर काढले असून, सीरियाची सुरक्षा दले आणि बंडखोरांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. गेल्या आठवड्यातच ‘तहरीर अल-शाम’ या ‘अल-कायदा’ या दहशतवादी गटांतून विभक्त झालेल्या गटाने सीरियाच्या अलेप्पोवर अचानक हल्ला करून या शहराचा ताबा घेतला होता. बंडखोर गटांच्या या हल्ल्यामुळे पुन्हा सीरियामध्ये युद्धसदृश ( Civil War ) परिस्थिती निर्माण झाली आहे.

सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्या राजवटीला ‘तहरीर अल- शाम’ या बंडखोरांना आव्हान दिले असून त्यांनी सीरियामध्ये सशस्त्र कारवाईला सुरुवात केली आहे. सीरियातील सर्वात मोठे शहर असलेल्या अलेप्पो शहरावर ताबादेखील मिळवला आहे. बुधवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी या बंडखोरांनी आक्रमणाला सुरुवात केली असून अवघ्या चार ते पाच दिवसांतच सीरियामधील मोठ्या शहरावर ताबा मिळवण्यात त्यांना यश आले आहे. या बंडखोरांनी अलेप्पो ताब्यात घेतल्यानंतर सीरियाच्या राजधानीकडे मोर्चा वळवला आहे.

अलेप्पोवर ताबा मिळवताना या बंडखोरांना सीरियाच्या सुरक्षा यंत्रणांनी विरोधही केला. मात्र, बंडखोरांना थांबवण्यात यश आले नाही. सीरिया सरकारचे लष्कर अनेक इशारे दिल्यानंतरही बंडखोरांच्या ताब्यातील प्रदेशात बॉम्बहल्ले करत असतात. त्यामुळेच हा निर्णय घेतल्याचा दावा बंडखोरांच्यावतीने करण्यात आला.

बंडखोरांनी ताबा मिळवलेल्या अलेप्पो शहरावरचा ताबा पुन्हा मिळवण्यासाठी प्रत्युत्तराची तयारी सीरियाच्या लष्करानेदेखील सुरू केली आहे. मात्र, असद यांच्या नेतृत्वाला इराण आणि रशियाकडून मदतीची अपेक्षा आहे. आजवर सीरियामध्ये असलेली सत्ता या दोन राष्ट्रांच्या मदतीनेच असद यांनी टिकवली होती. मात्र, सध्या रशिया आणि इराण दोन्ही देश युद्धरत असल्याने त्यांच्याकडून मिळणार्‍या मदतीलादेखील मर्यादा आल्या आहेत. तरीदेखील सीरियाच्या सैन्याला सहकार्य करण्यासाठी रशियाने हवाईहल्ले केले असून त्यांमध्ये ३०० बंडखोर मारले गेले आहेत. त्याचप्रमाणे, सीरियाच्या सैन्याला अपेक्षित सहकार्य ७२ तासांमध्ये रशियाकडून मिळेल, असेही सीरियाच्या सैन्याकडून सांगण्यात आले आहे.

गृहयुद्धाची पार्श्वभूमी

२०११ मध्ये सीरियातील गृहयुद्ध सुरू झाले. दहा वर्षांपासून सत्ता भोगणार्‍या असद सरकारच्या विरोधात सीरियातील जनतेने निदर्शने सुरू केली. यानंतर ‘फ्री सीरियन आर्मी’ नावाने बंडखोर गट तयार करण्यात आला. त्यातूनच पुढे गृहयुद्धही सुरू झाले होते. या गृहयुद्धामध्ये अन्य देश सहभागी झाल्यानंतर हा संघर्ष अधिकच चिघळला. त्यात ‘इसिस’नेदेखील झपाट्याने स्वतःचा विस्तार सीरियामध्ये केला. मात्र, २०२० मध्ये युद्धबंदी झाली. दरम्यानच्या काळात या गृहयुद्धात तीन लाखांपेक्षा अधिक नागरिक मृत्युमुखी पडले, तर कित्येकजण विस्थापित झाले होते.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121