मुंबई : मालेगाव वोट जिहाद प्रकरणी नाशिक मर्चंट को. ऑप. बँकेचे व्यवस्थापक आणि सहव्यवस्थापकांना अटक करण्यात आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्यांनी दिली आहे. मालेगावमधील बँकेत २५० कोटींचा बेनामी आर्थिक व्यवहार झाला असून यातील १२० कोटी रुपयांचा वोट जिहादसाठी वापर करण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. त्यानंतर आता याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
नाशिक मर्चंट को. ऑप. बँकेचे व्यवस्थापक रविंद्र दत्तात्रय कानडे व सहव्यवस्थापक दिपरत्न साईदास निकम यांना पोलिसांनी केली अटक केली आहे. यापूर्वी सिराज मोहमद आणि अक्रम मोहमद यांना अटक करण्यात आली होती.
मालेगाव वोट जिहाद फंडिंग घोटाळ्यात सिराज अहमद हारून मेमन आणि मोईन खानने १२ तरुणांची फसवणूक केली आहे. या घोटाळ्यात मालेगावमधील २० ते २१ वयोगटातील १२ हिंदू तरुणांना नोकरीचे आमिष दिले. तसेच त्यांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाने बँक खाती उघडण्यात आली. त्यानंतर काही दिवसात त्यांच्या खात्यातून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार करण्यात आला.
सिराज आणि त्याच्या साथीदारांनी बनावट सह्या करून हा व्यवहार केला. या प्रकरणातील एक युवक बँकेत गेल्यानंतर त्याच्या खात्यात एवढे पैसे आल्याचे त्याला कळले. त्यानंतर इतरांनी आपापली खाती तपासल्यानंतर त्यांच्या खात्यातही हे पैसे आल्याचे त्यांच्या लक्षात आले. ७ नोव्हेंबर रोजी सिराज विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यावर कारवाई सुरु आहे. एकूण २०० कोटी रुपयांचा हा आर्थिक घोटाळा आहे. पहिल्या फेरीत फक्त नाशिक मर्चंट बँकेत खाती उघडण्यात आली. त्यानंतर आता बँक ऑफ महाराष्ट्र मालेगावमध्येदेखील त्यांच्या नावाने खाती उघडण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. या युवकांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये एकही सही केलेली नाही. तरीसुद्धा तिथे ४० कोटींचा आर्थिक व्यवहार झाल्याचे बँक मॅनेजरने कबुल केले आहे. तर नाशिक मर्चंट बँकेत सव्वाशे कोटींचा व्यवहार झाला आहे.