सध्या पाकिस्तान आणि तालिबान संघर्ष आणखी चिघळला आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने तालिबानला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानकडून तालिबानच्या पक्तिका प्रांतात हवाई हल्ले करण्यात आले, ज्यात 51 लोकांना आपले प्राण गमवावे लागलेे. पाकिस्तानने यावेळी सात गावांवरसुद्धा हवाई हल्ले केले होते. अफगाणिस्तानच्या जमिनीवरून दहशतवादी हल्ले होत असून, हे हल्ले थांबविण्यासाठी अफगाणिस्तानकडून कोणतेही प्रयत्न केले जात नसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.
मुळात पाकिस्तानचे हे म्हणणेच हास्यास्पद आहे. खुद्द पाकिस्तानच दहशतवादात आकंठ बुडालेला असताना, त्याला अफगाणिस्तानवर आरोप करण्याचा अधिकार तरी शिल्लक आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र, पाकिस्तानच्या लष्करी विमानांनी अफगाणिस्तानच्या पूर्व पक्तिका प्रांतावर हल्ला केल्यानंतर, तालिबान तरी कशाला शांत राहील. यानंतर तालिबाननेही आक्रमक भूमिका घेतल्याने, दोन्ही देशांच्या सीमेवर अफगाण आणि पाकिस्तानी सैनिकांमध्ये भीषण संघर्ष सुरू झाला आहे. त्यात 19 पाकिस्तानी सैनिक आणि तीन अफगाण नागरिक ठार झाले आहेत.
पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या, पूर्व अफगाणिस्तानच्या खोस्त आणि पक्तिका प्रांतात ही भीषण लढाई सुरू आहे. पाकिस्तानला प्रत्युतर देताना, अफगाणिस्तानच्या सैन्याने खोस्त प्रांतातील अली शिर जिल्ह्यात, अनेक पाकिस्तानी लष्करी चौक्यांना आग लावली आणि पक्तिका प्रांतातील दांड-ए-पाटन जिल्ह्यातील दोन पाकिस्तानी चौक्यांवर कब्जा केला. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने स्थानिक वृत्तसंस्थांना दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानवरील हल्ला हा बदला घेण्यासाठीच केला असल्याचे स्पष्ट आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी, अफगाणिस्तानने आपले 15 हजार सैनिक मैदानात उतरवले आहेत. त्याचप्रमाणे, अफगाण सैन्याला पाठिंबा देण्यासाठी हजारो लोक घराबाहेर पडले.
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील संघर्ष न संपणारा आहे. दोन्ही देशांना भरभरून नैसर्गिक साधनसंपत्तीचे वरदान लाभले असताना, त्याकडे दुर्लक्ष करून दोन्ही देशांनी दहशतवादाला आपलसे केले. केवळ आपलसे केले नाही, तर तो वाढविण्यासाठी प्रयत्न केले. दहशतवाद रूजविण्यात तेथील सत्ताधार्यांचा बराचसा हात होता. यातही अफगाणिस्तान मात्र त्यातल्या त्यात भारताच्या मदतीने , पुन्हा एकदा उभारी घेऊ पाहत होता. तेथील संसद बांधण्यासाठीही भारताने अफगाणिस्तानला भरीव अशी मदत केली होती. तेथील स्त्री शिक्षण, लोकशाही मूल्ये रुजविण्यासाठी, भारताने शक्य तितकी मदत केली. मात्र, अमेरिकेने अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतला आणि सगळे क्षणार्धात शून्य झाले. काढता पाय म्हणण्यापेक्षा अमेरिकेने एकप्रकारे दत्तक घेतलेल्या अफगाणिस्तानला, अक्षरशः वार्यावर सोडले. सगळे सैन्य मागे घेतल्याने, तेथे तालिबानला आपले मनसुबे यशस्वी करता आले. संपूर्ण देश तालिबानच्या अधिपत्याखाली आला. असे असतानाही भारताने मात्र, तालिबान सरकार असतानाही सुधारणांसाठी प्रयत्नशील भूमिका घेत, तालिबानला मदतीचा ओघ कायम ठेवला. जी भूमिका आधी होती, तीच भूमिका भारताने कायम ठेवली. त्याउलट मात्र, पाकिस्तान सर्व काही करूनदेखील, भारताविरोधात कट कारस्थान रचण्यात अग्रेसर आहे.
पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारण्यासाठी, भारताने नेहमी पुढाकार घेतला. मात्र, पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला घरात घुसून उत्तर देत, नव्या भारताची ओळख फक्त पाकिस्तानला नव्हे, तर संपूर्ण जगाला करून दिली. 19 शतकात इंग्रजांनी आखलेल्या डूरंड सीमारेषेला, अफगाणिस्तान काल्पनिक मानत असतो. ही सीमा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला वेगळे करते. मात्र, अफगाणिस्तान ती मानण्यास कधीही तयार नाही. त्यामुळे दहशतवादासोबतच सीमावादामुळे टोकाचा संघर्ष दोन्ही देशांमध्ये उभा ठाकला आहे. पाकिस्तानने आधी स्वतःचे हित साधण्यासाठी दहशतवाद पोसला आणि आता तोच त्याच्या मुळावर उठला आहे, हे मात्र नक्की...