भारतीय संविधानाचा ‘अमृत महोत्सव’ आपण साजरा करत असताना परभणीत मात्र संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान होण्याची निंदनीय घटना नुकतीच घडली आणि राज्यभर त्याचे पडसाद उमटले. या एकूण घटनेचा घटनाक्रम अतिशय वेदनादायक आहे.
एका मनोरुग्ण आणि व्यसनी व्यक्तीच्या दुष्कृत्यामुळे राज्यभरातील सामाजिक वातावरण तणावपूर्ण झाले. परभणीत १० डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५:३० च्या सुमारास एका व्यक्तीने शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीला दगडाने फोडून विटंबना करण्याची निंदनीय व गंभीर घटना घडली. हे होत असतानाच राजू कांबळे नामक रिक्षा चालकाने हे पाहिले व त्या व्यक्तीला अडविले आणि विचारले की तू हे का करतोय तेव्हा त्या आरोपीने उत्तर दिले की, 'मला खासदार व आमदारानी हे फोडण्यास सांगितले'. आणखी जमलेल्या लोकांनी आरोपीला तेथे जोरदार चोप दिला, पोलीस घटनास्थळी आले व त्यांनी आरोपीला अटक करून ताब्यात घेतले. तोपर्यंत शहरातील विविध भागातून लोक डॉ.आंबेडकर चौकात जमा झाले व त्याला आंदोलनचे स्वरूप आले. काही गाड्यांवर दगडफेक झाली तसेच आंदोलकांनी रेल्वे अडवली त्यानंतर रात्री पोलीस अधिकार्यांनी शांतात बैठक घेतली. आंबेडकरी संघटनांनी दुसर्या दिवशी (दिनांक ११ डिसेंबर) परभणी शहर व जिल्हा बंद ची हाक दिली होती. संविधान प्रतिकृती विटंबना करणारा आरोपी सोपान पवार हा मनोरुग्ण असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दिनांक ११ डिसेंबर रोजी बंद सुरु असताना सकाळी ९ च्या सुमारास काही तरुणांनी टायर जाळून चक्का जाम केले. सकाळी ११ च्या सुमारास डॉ.आंबेडकर चौकात लोक मोठ्या संख्येत जमा झाले दरम्यान सकाळी १२:०० च्या सुमारास बंद ला हिंसक वळण लागले काही तरुणांनी दगडफेक, तोडफोड सुरु केली. गाड्यांची तोडफोड झाली, गाड्या जाळल्या, दुकानांचे शटरवर, दुकानांच्या नाम फलकांवर तसेच सीसीटीव्ही कॅमेरे फोडले गेले. रस्त्यांवर टायर जाळले. पोलिसांवर दगडफेक झाली, पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक झाली. दरम्यान जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या आंदोलकांनी जिल्हाधिकार्यांच्या दालनात गोंधळ घातला व काचा फोडल्याचा प्रकार झाला. नंतर पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या व लाठीचार्ज करून जमावाला पांगवले. एसआरपीएफच्या तुकड्या मागविण्यात आल्या. सायंकाळी दंगल आटोक्यात आली. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केले व एकूण ५० जणांना ताब्यात घेतल्याची माहिती नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी प्रसास माध्यमांना दिली.
या घटनेत आरोपी तत्काळ अटक झाली होती व दुसर्या दिवशी व्यापार्यांनी उस्फुर्त कडकडीत बंद पाळला होता. आंदोलन लोकशाही मार्गाने शांततेत व्हायला हवे होते पण त्याला हिंसक वळण लागले अनेक दुकानांचे नुकसान झाले. शेकडो गाड्या फोडल्या गेल्या. नुकसान झालेल्या व्यापारी, व्यावसायिक नागरिकांनी दिनांक १२ डिसेंबर रोजी मोर्चा काढून रोष व्यक्त केला व भरपाईची मागणी केली.
आपल्याकडे कोणत्याही घटनेचे राजकारण केले जाते. राजकीय मंडळीचे आरोप प्रत्यारोप सुरु झाले. परभणीचे लोकसभेचे उबाठा गटाचे खासदार संजय जाधव तसेच शरद पवार गटाच्या राज्यसभेच्या खासदार फौजिया खान यांनी या घटनेचा संबंध बंगालदेश विरोधी झालेल्या मोर्चाशी जोडला. दिनांक १० डिसेंबर रोजी "आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त" महाराष्ट्रभरात बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू व बौद्धांवर होत असलेल्या अमानुष अत्याचाराच्या विरोधात मोर्चे निघाले होते. परभणीत सुद्धा असा मोर्चा दिनांक १० डिसेंबर रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १:०० दरम्यान झाला होता. संविधान प्रतिकृती अवमान व बांगलादेश विरोधी मोर्चा याचा काही एक संबंध नसताना परभणीतील खासदारांनी मात्र हा संबंध जोडला व जातीय तेढ निर्माण करून या घटनेचे राजकारण केले. यात शिवसेना उबाठा गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी आणखी पुढे जावून असा आरोप केला कि, ज्या दिवशी आंबेडकरी संघटनानी बंद पुकारला (११ डिसेंबर) त्याच दिवशी भाजपा ने बांगलादेश विरोधी बंद पुकारला व त्या मोर्चातील लोकांनी निळे गमछे घालून जाळपोळ केली’. मुळात अंधारे यांनी हेतुपूर्वक तारखेचा घोळ घालून दिशाभूल केली आहे. बांगलादेश विरोधी मोर्चा १० डिसेंबरला दुपारीच संपलेला होता. आणि विशेष म्हणजे या मोर्चात त्यांच्या उबाठा गटाचे आमदार राहुल पाटील हे सुद्धा सहभागी झाले होते. असे असताना अतिशय बिनबुडाचे आरोप करून अंधारे यांनी समाजात आणखी तेढ निर्माण करण्याचे काम केले.
प्रत्यक्षात ही घटना जेव्हा घडली तेव्हा राजू कांबळे या ऑटो रिक्षा चालकाने त्या मनोरुग्ण आरोपीस सर्वप्रथम पाहिले व त्याला रोखले होते. घटनेची माहिती सांगताना राजू कांबळे म्हणतात कि, आरोपीला विचारले की तू हे का करतोय तेव्हा त्या आरोपीने उत्तर दिले की, 'मला खासदार व आमदारानी हे फोडण्यास सांगितले'. या वक्तव्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे.
दुर्दैवाने १५ डिसेंबरला अटकेत असलेल्या व न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा दुःखद मृत्यू झाला. सोमनाथ अतिशय गरीब कुटुंबातून होता, भटके विमुक्त अशा वडार समाजातून होता, वकिलीचे चे शिक्षण घेत होता. त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोमनाथच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा होत्या हे प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले. वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत दिनांक १६ डिसेंबर रोजी सायंकाळी परभणीमध्ये अतिशय शोकाकुल वातावरणात सोमनाथवर अंत्यसंस्कार झाले. त्याच दिवशी परभणीतील जेष्ठ आंबेडकरी नेते विजय वाकोडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाले. दरम्यान या घटनांचे पडसाद राज्यभर उमटले. अनेक ठिकाणी आंदोलने झाली.
पोलिसांनी अशा घटना अतिशय जबाबदारीने व संवेदनशीलतेने हाताळल्या पाहिजेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अशा वेळी पोलिसांना कठोर निर्णय घ्यावे लागत असले तरी घटनेनंतर कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान निर्दोष व्यक्तींना तसेच व्हीडीओ शुटींग करणाऱ्या महिलांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचे पुढे आले आहे. त्याचीही सखोल चौकशी व्हायला पाहिजे. दिनांक ११ डिसेंबरच्या हिंसाचारात मुख्यतः १५ ते ३० वयोगटातील आक्रमक जमाव तोडफोडीत सक्रिय दिसला. यात महिला व मुलींचाही सहभाग होता हे विशेष. सुरवातीला पोलिसांचे नियोजन व नियंत्रण कमी पडले असे म्हणण्यास वाव आहे. पोलिसांकडे कुमुक कमीच होती. आदल्या शांतता बैठक सकारात्मक झाल्याने आंदोलन शांततेत होईल असे पोलिसांना वाटले असावे. आंदोलन दरम्यान जमाव एवढा आक्रमक का झाला? रात्रीतून आंदोलनाची तयारी झाली का? काही आक्रमक गट जमावात सहभागी झाले होते का? याची चौकशी होणे आवश्यक आहे.
SDPI (Social Democratic Party of India) कनेक्शन?
SDPI हि PFI या बंदी घातलेल्या जहाल संघटनेशी संबंधित पक्ष आहे. परभणीतील घटनेच्या सुरवातीपासून या पक्षाचे पदाधिकारी या घटनाक्रमात दिसत आहेत. या घटनेचे विविध व्हिडीओ समाज माध्यमातून पुढे आले त्यात मोर्चांमध्ये काही हिरवे झेंडे दिसत आहेत तसेच तोडफोड करताना तरुण हिंदी घोषणा (जाब तक सुरज चांद रहेगा...) देतांना दिसतात. त्यामुळे शांततेत होत असलेल्या आंदोलनाला कोणी हिंसक केले का? एकूण घटनाक्रमात यांचीही सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
या सर्व घटनाक्रमात सोमनाथ सूर्यवंशी सारख्या होतकरू तरुणाचा जीव जाने फारच वेदनादायी आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनात या घटनेची चर्चा झाली, मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिडीत सूर्यवंशी कुटुंबाला दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली, वाकोडे यांच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत जाहीर केली. या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे जाहीर केले तसेच या प्रकरणात एक पोलीस निरीक्षकाला निलंबित केले. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर आता परभणीतील तणाव निवळला आहे. सामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. असे असले तरी परभणीत भविष्यात नगरसेवक होऊ इच्छितात असे काही स्थानिक नेते तसेच विशेषतः महाविकास आघाडीचे नेते मात्र सोयीस्कर राजकारण करताना दिसत आहेत.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनात महाड चवदार तळे सत्याग्रह आंदोलन केले तसेच काळाराम मंदिर सत्याग्रह आंदोलन केले या आंदोलनात तणावाची स्थिती निर्माण झाली प्रसंगी हल्ले झाले परंतू डॉ.आंबेडकरांनी कायदेशीर मार्गानेच आंदोलने केली. भारतीय संविधानाचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेतील शेवटच्या भाषणात म्हणतात, “आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टपूर्तीसाठी संवैधानिक मार्गासारखा कोणताही मार्ग शिल्लक नव्हता, त्या वेळी असंवैधानिक मार्गाचा अवलंब करण्याचे समर्थन मोठ्या प्रमाणात केले जात होते. परंतु जेव्हा संवैधानिक मार्ग उपलब्ध आहेत, तेव्हा या असंवैधानिक मार्गांचे समर्थन होऊ शकत नाही. हे मार्ग इतर काही नसून अराजकतेचे व्याकरण आहे आणि जितक्या लवकर आपण त्यांना दूर सारू तेवढे ते आपल्या हिताचे होईल.” संविधान प्रेमी आपण सर्व सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी याचा विचार करायला हवा. संवेदनशील घटनेचे कोणीही राजकारण करू नये. समाजात बंधुभाव, शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे.
जय भीम, जय संविधान.
सागर शिंदे