वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर खोणी ग्रामस्थांचा निर्णय
28-Dec-2024
Total Views | 64
डोंबिवली : कल्याणसह आजूबाजूच्या शहरांत महिलांवर होणारे अत्याचार आणि गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर खोणी गावातील ग्रामस्थांनी गावातील मशिदीमध्ये ( Namaj Prayer ) गावाबाहेरून येणार्या मुसलमानांना बंदी घातली आहे.
खोणी गावात एक जुनी मशीद आहे. याठिकाणी ग्रामस्थांसह अंबरनाथ, बदलापूर, कल्याण अशा विविध ठिकाणांहून मुस्लीमधर्मीय व्यक्ती नमाजपठण करण्यासाठी येतात. विशेष म्हणजे त्यात बांगलादेशी मुस्लिमांचादेखील समावेश असतो. शुक्रवार, दि. २७ डिसेंबर रोजी नमाजपठण करण्यासाठी मुस्लीमधर्मीय व्यक्ती बाहेरून गावात आले होते. परंतु, ग्रामस्थांनी त्यांना माघारी धाडले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
बदलापूर येथील मुलींवरील लैंगिक अत्याचाराची घटना काही महिन्यांपूर्वी घडली असताना कल्याणमध्येदेखील एका नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत तिची निर्घृण हत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. महिला, लहान मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढत असून गुन्हेगारीदेखील शहरी तसेच ग्रामीण भागात वाढली आहे. यावर खबरदारी म्हणून खोणी ग्रामस्थांनी एक वेगळीच भूमिका घेतली आहे. गावातील मुस्लीम मशिदीमध्ये जाऊन नमाजपठण करू शकतात. पण बाहेरून येणार्या मुस्लिमांना मज्जाव राहील, असा निर्णय त्यांनी घेतला आहे.
ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
“यासंदर्भात ग्रामस्थांनी पोलिसांकडे तक्रारदेखील केली आहे. परंतु, बाहेरून येणार्या मुस्लिमांना पोलीस संरक्षण देण्यात येऊ लागले आहे. बाहेरून येणार्या मुस्लीम व्यक्तींनी पुन्हा नमाजपठण करण्यासाठी गावात प्रवेश केल्यास ग्रामस्थ आंदोलन करतील,” असा इशारा शिवसेना ग्रामीण तालुकाप्रमुख महेश पाटील यांनी दिला आहे.
खोणी गावात असलेली मशिद लहान आहे. येथे बाहेरून लोक नमाज पठण करण्यासाठी आल्यास परिसरात गर्दी होते. त्यामुळे ग्रामस्थांनी एक बैठक घेऊन शांततेच्या मार्गाने पत्र दिले आहे. बाहेरून येणार्या लोकांनी आपल्या परिसरात नमाज पठण करावे.
विजय कादबाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानपाडा पोलीस ठाणे