मुंबई : जगातील गजबजलेल्या शहरांपैकी एक असलेल्या मुंबईची हवा ( Mumbai Air ) बिघडली आहे. येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक १५९ वर पोहोचण्यासह धुलिकणांचे प्रमाणही वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. काही भागांतील हवा ही सातत्याने ‘वाईट’ ते ‘अतिवाईट’ श्रेणीतच नोंदली जात आहे. यामध्ये कुर्ला, कलिना, भायखळा, वरळी, माझगाव या परिसराचा समावेश आहे. बोरिवलीमध्ये गेल्या एका महिन्यातील साधारण दहा ते १५ दिवस ‘वाईट’ हवेची नोंद झाली तर, काही दिवस सलग ‘अतिवाईट’ हवेची नोंद झाली आहे. येथील हवा निर्देशांक हा नोव्हेंबर महिन्यापासून २०० ते ३०० पर्यंत नोंदवला जात आहे. वारे वाहते नसल्याने प्रदूषके साचून राहत असल्याचा परिणाम मुंबईत अनेक ठिकाणी दिसून येत असला तरी, बांधकामे, वाहतुककोंडी या समस्यादेखील हवा प्रदूषणाला तितक्याच जबाबदार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
मुंबईच्या तापमानात गेल्या दोन-तीन दिवसांपासून घट झाली आहे. त्यामुळे वातावरणात धुके होते. त्यातच वार्यांचा वेग मंदावल्याने हवेत प्रदूषके साचून राहिली. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात २९ अंश सेल्सिअस तर, सांताक्रूझ केंद्रात ३० अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मुंबईतील धुळीचे प्रमाण वाढले असून, वातावरणातील पीएम २.५ इतके नोंदवण्यात आले आहे. पीएम २.५ पेक्षा बारिक धुलिकण शरीरासाठी हानिकारक आहेत. ते नाकाद्वारे शरीरात सहज प्रवेश करतात. या धुलिकणांची मात्रा ४५ ‘मायक्रोक्यूबिक’पेक्षा जास्त नसावी, असे तज्ञांचे मत आहे.
पालिकेकडून विशेष उपाययोजना
मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबई महापालिकेने विशेष उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी न करणार्या २८ बांधकामांना प्रशासनाने नोटीस बजावली आहे. रस्ते धुण्यासाठी १०० टँकर तैनात करण्यात आले आहेत.
२४ प्रशासकीय विभागांमध्ये ‘ट्रक माऊंट फॉग मिस्ट कॅनॉन’ संयंत्रांद्वारे दोन सत्रांमध्ये पाणी फवारणी केली जात आहे.
बांधकाम, पाडकाम, खोदकाम सुरू असलेल्या ठिकाणी प्रकर्षाने पाणीफवारणी केली जात आहे.
वॉर्डातील रस्ते, पदपथ स्वच्छतेसाठी ई-स्वीपर संयंत्राचा अवलंब करण्यात येत आहे, जेणेकरून धुळीस प्रतिबंध करणे शक्य होईल.