मुंबई, दि. २८ : प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बांधकामामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी त्वरित सुरू होत असून एमएमआरडीएच्या सर्व विद्यमान आणि भविष्यातील प्रकल्पांसाठी ही मार्गदर्शक तत्वे लागू आहेत. या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीची जबाबदारी कार्यकारी अभियंत्यांवर असून, त्यांनी या संदर्भातील नोंदी ठेवून प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एमएमआरडीएने विविध उपाययोजना राबविण्यास आणि कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. धूळ नियंत्रित करण्यासाठी तातडीने करायच्या उपाययोजना, बांधकामांच्या कामावर देखरेख, मलब्याचे व्यवस्थापन आणि एमएमआरडीएच्या प्रकल्पस्थळांवरील वाहन वाहतुकीचे नियमन यांचा नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समावेश आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून प्राधिकरणाची विकासासाठी प्रयत्न करण्यासोबतच पर्यावरणासंदर्भातील समस्यांवर उपाययोजना शोधण्याची प्रतिबद्धता अधोरेखित होते. या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी एमएमआरडीएने कंत्राटदारांसाठी कडक दंड निश्चित केला आहे. पहिल्यांदा नियमांचे उल्लंघन केल्यास ५ लाख रुपयांपासून दंड सुरू होईल, तर पुन्हा उल्लंघन झाल्यास हा दंड २० लाखांपर्यंत वाढवला जाईल आणि कामकाज थांबवण्याची कारवाई केली जाईल.
प्रमुख उपाययोजना
१. धुळीवर नियंत्रण मिळवणे
बांधकाम सुरू असलेल्या सर्व ठिकाणी वॉटर स्प्रिंकलर्स आणि फॉगिंग मशीन्स तैनात करणे, मातीची वाहतूक करताना आणि बांधकाम साहित्याच्या साठ्यावर पाण्याची नियमित फवारणी करणे. प्रकल्प परिसरात यांत्रिक शक्तीवर चालणाऱ्या सफाई यंत्रांचा वापर करणे.
२. लक्ष ठेवणे आणि व्यवस्थापन
विद्यमान मार्गदर्शक तत्त्वांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी नियमित तपासणी. प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी सर्वसमावेशक निरीक्षण आणि अहवाल यंत्रणा.
३. वाहनांचे नियमन, मलवा व्यवस्थापन
अनधिकृतपणे मलवा टाकण्यास प्रतिबंध आणि धूळ कमी करण्यासाठी बांधकाम व पाडकाम (सीअँडडी) कचऱ्याच्या वाहतुकीचे योग्य नियोजन. बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी योग्य झाकण आणि परवान्यांसह मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन. प्रकल्पाच्या ठिकाणी कचरा जाळण्याला पूर्ण प्रतिबंध करण्यात आला आहे.
---------
मुंबई महानगर प्रदेशाचा विकास हा पर्यावरणीय प्राधान्यांशी सुसंगत असला पाहिजे. या उपाययोजनांमधून भविष्यातील पिढ्यांसाठी शाश्वत आणि आरोग्यदायी शहरी परिसंस्था निर्माण करण्यासाठी आमच्या सरकारची वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित होते.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारणे ही आपल्या सर्वांसाठीच प्राधान्याची बाब आहे. बांधकामामुळे होणारे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी एमएमआरडीएने हाती घेतलेल्या काटेकोर उपाययोजना या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. स्वच्छ आणि अधिक शाश्वत एमएमआर निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि अध्यक्ष ,एमएमआरडीए
या मार्गदर्शक तत्त्वांद्वारे एमएमआरडीएने वेगवान पायाभूत विकास आणि पर्यावरण संरक्षण यांचा समतोल राखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सर्व भागधारकांनी या तत्त्वांचे पालन करून स्वच्छ मुंबईसाठी योगदान द्यावे, असे आम्ही आवाहन करतो.
- डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए