नवी मुंबई : (Drug Smuggling Cases) ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थांसंदर्भातील गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असून संपूर्ण नवी मुंबई शहर अंमली पदार्थांच्या वेढ्यात अडकले आहे. या वर्षभरात अंमली पदार्थांची ६५४ प्रकरणे समोर आली आहेत. २०२३ मध्ये अंमली पदार्थांच्या गुन्ह्याचे प्रमाण ४७५ इतके होते. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत अमली पदार्थांच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट होते. रेव्ह पार्ट्या किंवा इतर तस्करीच्या माध्यमातून अंमली पदार्थ तरुण-तरुणींपर्यंत पोहचविले जातात. त्यामुळे या अंमली पदार्थांच्या विळख्यात सर्वसामान्य घरामधील तरुणाई बळी पडत आहेत.
गांजा आणि ब्राऊन शुगर जप्तीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. २०२४ मध्ये ६७.८३ लाख रुपयांचा गांजा जप्त केला आहे. तर जप्त ब्राऊन शुगरची ३०.१० लाख रुपये आहे. याशिवाय, ३३.५५ लाख रुपयांचे एलएसडी ब्लॉट्सही जप्त करण्यात आले तर २०२४ मध्ये ६७.८१ लाख रुपयांची चरस आणि ५५,००० रुपयांची मेथाडोन जप्त करण्यात आली आहे, जप्त केलेल्या मद्याची एकूण किंमत ३३.२७ कोटी रुपये आहे. तर गेल्यावर्षी याचे प्रमाण २२.९७ कोटी रुपये इतके होते. २०२४ मध्ये अंमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत गुन्ह्यांमध्ये ९३९ जणांना अटक झाली. तर गेल्यावर्षी ८११ जणांना अटक झाली होती. यावर्षी अटकेत असलेल्यांपैकी ५८ जण विदेशी नागरिक आहेत. यामध्ये प्रामुख्याने आफ्रिकन नागरिकांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. २०२३ मध्ये अटक केलेल्यांमध्ये ३७ परदेशी नागरिक होते.
कोकेनचे प्रमाण सर्वाधिक
जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांपैकी कोकेन हे सर्वाधिक किमतीचे आहे. यावर्षी १६.७० कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले असून, २०२३ मध्ये १.२५ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले होते. तर पोलिसांनी १२.६७ कोटी रुपयांचे मॅफेड्रॉन जप्त केले आहे. गेल्या वर्षी जप्तीत हेच प्रमाण ९.३३ कोटी रुपयांचे होते.
याउलट, २०२३ मध्ये अनुक्रमे ५.९६ कोटी रुपये आणि ३.६४ कोटी रुपयांच्या जप्ती नोंदवलेल्या मेथाक्वॉलोन आणि ट्रामाडोलसारखे काही पदार्थ यावर्षी जप्त करण्यात आले नाहीत, असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे, गेल्या वर्षी जप्त केलेल्या ३३,१६० रुपयांच्या तस्करीच्या तुलनेत २०२४ मध्ये एकही हेरॉईन जप्त करण्यात आले नाही, असेही पोलिसांनी सांगितले.