मनमोहन सिंगांची स्वाक्षरी असलेली ही नोट बघितली का?
१९८२ ते १९८५ या कालावधीत भुषवले होते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पद
27-Dec-2024
Total Views | 93
नवी दिल्ली: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरूवारी रात्री निधन झाले. डॉ. सिंग यांनी अर्थमंत्री, विरोधी पक्षनेते यांसारख्या पदांबरोबरच भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पद देखील भुषवले होते. त्यांच्या निधनाने भारताने एक सर्वगामी प्रतिभा असलेला अर्थतज्ज्ञ, एक सुसंस्कृत राजकारणी गमावला अशीच भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर पदावर असताना स्वाक्षरी केलेल्या नोटा सध्या व्हायरल होत आहेत.
डॉ. सिंग यांनी १९८२ ते १९८५ या कालावधीत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पद भुषवले होते. त्यावेळी इंदिरा गांधी या पंतप्रधान पदी होत्या तर प्रणब मुखर्जी हे अर्थमंत्री होते. आपल्या चलनांतील नोटांवर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांची स्वाक्षरी असते, त्यानंतरच ती अधिकृत मानली जाते. याच कारणासाठी १९८२-८५ या काळात छापल्या गेलेल्या प्रत्येक नोटेवर त्यांची स्वाक्षरी आहे. त्यांच्या निधनानंतर आता त्या नोटांच्या रूपाने त्यांच्या आठवणी जाग्या होत आहेत.
डॉ. सिंग यांनी केंब्रीज विद्यापीठातून अर्थशास्त्रात उच्चशिक्षण घेतलं. त्यानंतर व्याख्याता, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री या पदांनंतर १० वर्षे देशाचे पंतप्रधान पद भुषवले होते. त्यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे आर्थिक उदारीकरणाचा निर्णयातून देशाला प्रगतीची नवी दिशा दाखवणे हे होय. अशा या नेत्याच्या निधनाने भारतीय राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.