आगामी आर्थिक वर्षात भारताचा वृद्धीदर ६.५ टक्के राहणार!
अर्थमंत्रालयाचा अंदाज
27-Dec-2024
Total Views | 24
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आगामी २०२५-२६ वर्षासाठी भारताचा वृद्धीदराचा ( India's Growth Rate ) अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २०२५ या वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ६.५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. अर्थमंत्रालयाकडून मासिक आर्थिक पाहणी अहवालात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दमदार पावसामुळे झालेली कृषी क्षेत्राची चांगली कामगिरी आणि औद्योगिक क्षेत्रात झालेल्या वाढीने अर्थव्यवस्थेला हात दिला आहे.
अर्थव्यवस्थेवरील वाढत्या महागाईचा दबाव लक्षात घेऊन भारतीय रिझर्व्ह बँकेकडूनही सलग ११व्या बैठकीत व्याजदरांमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. वर्षाच्या सुरुवातीच्या तिमाहीत अर्थव्यवस्था मंद गतीने वाढण्याची शक्यताही या अहवालात नोंदवली गेली आहे. रिझर्व्ह बँकेकडून आखण्यात आलेले सावध चलनविषयक धोरण हेसुद्घा देशांतर्गत मागणी मंदावण्याचे प्रमुख कारण असू शकते, असेही या अहवालात म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेकडून बँकांमधील रोखतेचे प्रमाण राखण्यासाठी केले जाणारे प्रयत्न यांचा चांगला परिणाम दुसर्या तिमाहीत दिसून येईल, असा अंदाज आहे.
एकूणच पुढील वर्षी दुसर्या तिमाहीत अर्थव्यवस्थेचा जोर वाढण्याची शक्यता आहे. वाढती शहरी मागणी आणि अर्थव्यवस्थेच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये जसे स्टील, सिमेंट, वाहननिर्मिती या क्षेत्रांमध्ये ही वाढ दिसून येईल. सेवा क्षेत्रातही वाढीचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. भारत सरकार सातत्याने भांडवली गुंतवणुकीत वाढ करत आहे. त्याचाही सकारात्मक परिणाम दिसण्याची शक्यता आहे.