चर्चसंस्थेची दया?

    27-Dec-2024   
Total Views |
Jo Biden And Trump

राष्ट्राध्यक्षपदावरून पायउतार होण्यापूर्वी जो बायडन यांनी विशेष अधिकार वापरत, अमेरिकेतील ४० पैकी ३७ फाशीची शिक्षा सुनावलेल्या आरोपींच्या शिक्षेचे रुपांतर जन्मठेपेत केले आहे. यामुळे नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे बायडन यांच्यावर संतप्त झाले. तेव्हा, जो बायडन यांच्या या कृत्याचा अर्थ काय असेल? या सगळ्या घटनांचा मागोवा घेतला, तर एकच जाणवते ते म्हणजे चर्च, पोप आणि धर्माआड सत्तेचे राजकारण!

बायडन यांचे म्हणणे आहे की, “ज्यांच्यावर दया दाखवायला हवी, त्यांनाच फाशीच्या शिक्षेऐवजी जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आहे. कुणीही गैरसमज करू नये. गुन्हेगारांच्या कृत्याने पीडित असलेल्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे.” दुसरीकडे अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जो बायडन यांच्या या निर्णयामुळे संतप्त झाले. त्यांनी म्हटले की, “भयंकर गुन्हा केलेल्या लोकांची शिक्षा बायडन यांनी कमी कशी केली? बलात्कार, अमली पदार्थ विक्री, हिंसा असे गुन्हे केलेले गुन्हेगार, त्यांची शिक्षा यापुढे कमी होणार नाही. फाशीच्या शिक्षेचे प्रावधान झाले असेल, तर गुन्हेगाराला फाशीची शिक्षाच होईल.”

काही दिवसांपूर्वी पोप फ्रान्सिस यांनी अमेरिकेमध्ये मृत्युदंडाची शिक्षा मिळालेल्या कैद्यांसाठी प्रार्थना करण्याचा आग्रह केला. ते म्हणाले, “या आपण प्रार्थना करूया की, त्यांची शिक्षा कमी होईल किंवा बदलेल. आपण त्या भावाबहिणींबाबत विचार करू आणि प्रभूकडे त्यांना मृत्यूपासून वाचवण्याची कृपा मागूया.” त्यानंतर पोप फ्रान्सिस यांनी दि. १९ डिसेंबर रोजी बायडन यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि कैद्यांच्या मृत्युदंडाच्या शिक्षेचे म्हणणे पुन्हा मांडले. त्यानंतर अमेरिकेच्या धार्मिक संघटनेनेही हेच म्हणणे बायडन यांच्याकडे मांडले. त्यातूनच बायडन यांनी ४० पैकी ३७ कैद्यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली.

जो बायडन हे कॅथलिक ख्रिश्चन. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये ४८ टक्के असलेल्या प्रोटेस्टंट जनतेची मते विभागली होती. तसेच, २३ टक्के कॅथलिक जनतेची मतेही विभागली. त्यामुळे कॅथलिक ख्रिस्ती बांधवांची जो बायडन यांना एकगठ्ठा मते मिळाली असती, तर जो बायडन पराभूत झाले नसते. देशातील कॅथलिक ख्रिश्चन लोकांचे पुन्हा एकगठ्ठा समर्थन मिळवण्यासाठी मग बायडन यांनी पोप फ्रान्सिस यांचे म्हणणे ऐकले का? पण, या निर्णयाला आणखी एक किनार आहे. जो बायडन यांचा मुलगा हंटर यांना बेकायदेशीररित्या बंदूक बाळगल्याबद्दल आणि करचुकवेगिरीबद्दल गुन्हेगार ठरवत शिक्षा सुनावण्यात आली होती. अमेरिकेमध्ये अमली पदार्थांचे सेवन करणार्‍या व्यक्तीला शस्त्र परवाना मिळत नाही. हंटर हे अमली पदार्थांचे सेवन करतात. मात्र, शस्त्र परवाना मिळावा म्हणून त्यांनी ते अमली पदार्थांचे सेवन करतात हे लपवले. त्यामुळे हंटर यांचे शस्त्र बाळगणे हे बेकायदेशीर ठरले. गुन्हेगार म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली. जो बायडन यांनी ३७ कैद्यांना माफी देण्याआधी स्वत:च्या मुलाची शिक्षाही माफ केली. मुलाची शिक्षा माफ केल्यावर त्यांच्याकडे स्पष्टीकरण काही नव्हते. मग अशाच प्रकारे शिक्षा भोगणार्‍या तब्बल १ हजार, ५०० लोकांची शिक्षाही त्यांनी माफ केली. त्यामुळे आता बायडन यांनी मुलाची शिक्षा माफ कशी केली, असा प्रश्न कुणी विचारला, तर सर्वसामान्य इतर गुन्हेगारांचीही शिक्षा माफ केली, असे बायडन पुराव्यासकट बोलू शकतात.

काहीही म्हणा, पोप यांना फाशीची शिक्षा भोगणार्‍या कैद्यांविषयी दया, करूणा वाटली. या पार्श्वभूमीवर जर्दानो बुनो आठवतात. गॅलिलिओच्याही खूप आधीची एक घटना. १५व्या शतकात जर्दानो याने बायबलमधल्या ‘पृथ्वी चपटी असणे आणि सूर्य पृथ्वीभोवती फिरतो’ या विधानांच्या विरोधात जाऊन मते मांडली. तेव्हा इटलीच्या चर्चसंस्थेने जर्दानो यांना प्रभूचे गुन्हेगार घोषित केले. त्यांना ना फाशी दिली, ना विष दिले, तर जर्दानो यांना भर लोकवस्तीत जीवंत जाळले. त्यांचा आक्रोश ऐकू नये, म्हणून परिसरातील सर्व चर्चमधील घंटा जोरात वाजवण्यात आल्या. बाकी पुढे गॅलिलिओचे काय झाले, सगळ्यांना माहिती आहेच. गोव्याचा हातकतरो खांब आणि आजही धर्मांतरणासाठी गोरगरिबांची होणारी फसवूणक, हे सगळेसुद्धा यानिमित्ताने आठवले. पोप फ्रान्सिस यांना त्या गुन्हेगारांबद्दल दया वाटली. मात्र, वर नमूद केलेल्या घटनांमध्ये चर्चसंस्थेमधली ही दया तेव्हा कुठे होती आणि असते?

९५९४९६९६३८

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.