नवी दिल्ली : आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (रालोआ) ( NDA ) घटकपक्षांसोबत उतरण्याची तयारी केली आहे. ही एकजूट आम आदमी पार्टी(आप)साठी धोक्याची घंटा ठरणार आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा यांच्या निवासस्थानी बुधवार, दि. २५ डिसेंबर रोजी रालोआ नेत्यांची बैठक झाली. बैठकीत हरियाणा आणि महाराष्ट्रातील विजयाबद्दल अभिनंदन करण्यात आले. त्याचवेळी झारखंडमधील पराभवाविषयी चर्चा करण्यात आली. या बैठकीत दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवरही चर्चा झाली. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने मित्रपक्षांच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रित केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री जितन राम मांझी आणि चिराग पासवान आदी दिल्लीत रालोआचा प्रचार करू शकतात.
दिल्लीतील पूर्वांचली मतदारांना मोठ्या संख्येने आपल्या गोटात आणण्यासाठी रालोआचे बिहारमधील नेते प्रयत्न करतील. दिल्लीत पूर्वांचली मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. बिहार, पूर्व उत्तर प्रदेश आणि झारखंडमधील सुमारे २५ टक्के मतदार दिल्लीत आहेत आणि दिल्लीतील २० जागांवर पूर्वांचली मतदारांची चांगली पकड आहे. हे मतदार प्रामुख्याने गोकलपूर, मतियाला, द्वारका, नांगलोई, करावल नगर, जनकपुरी, त्रिलोकपुरी, बुराडी, उत्तम नगर, संगम विहार, जनकपुरी, त्रिलोकपुरी, किरारी, विकासपुरी आणि समयपूर बदली या विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रभावी आहेत. त्यांना साधण्यासाठी भाजप चिराग पासवान, नितीश कुमार आणि जीतन राम मांझी यांना निवडणूक प्रचारात उतरवू शकते.