मुंबई : काही दिवसात ग्रेगोरियन नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. लोक या इंग्रजी नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस ( Mumbai Police ) अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मुंबई पोलिसांकडून मध्यरात्री मुंबई शहरात वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली. नाकाबंदीमध्ये वाहतूक नियमांचा पालन न करणारे वाहन चालक तसेच मध्यरात्री फिरणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली.
डिसेंबरच्या शेवटच्या दिवसांमध्ये नाताळच्या सुट्टीमुळे लोक बऱ्याच ठिकाणी फिरतात. रात्री फिरताना रस्त्यावरचे सिग्नल पाळणे, हेल्मेट घालणे हे नियम सर्रास मोडताना दिसतात. यामुळे लोकांच्या जीवाला धोका असल्याचे वाहतुक यंत्रणा वेळेवेळी सांगत असते. यावर योग्य त्या प्रकारे लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पोलिस आता अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.
मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे. नाकाबंदीमध्ये जे वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचं पालन करत नसतील अशांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच मध्यरात्री सराईत फिरणाऱ्या गुन्हेगारांवरदेखील नजर ठेवण्यात येत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नवीन वर्षासाठी पोलिस यंत्रणा अधिक सुसज्ज झालेली दिसून आली.