आर्थिक विकासात प्राथमिक सहकारी संस्थांचे मोठे योगदान : केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह
१० हजार प्राथमिक सहकारी कृषी संस्थांचे उद्घाटन
25-Dec-2024
Total Views | 46
नवी दिल्ली : (Amit Shah) केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी बुधवारी नव्याने स्थापन झालेल्या १० हजार बहुउद्देशीय प्राथमिक कृषी पतसंस्था, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालन सहकारी संस्थांचे उद्घाटन केले.
सहकारी संस्थांनी देशातील प्रत्येक पंचायतीमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात काम केले पाहिजे. देशातील त्रिस्तरीय सहकरी संरचनेला बळ देण्याची सर्वाधिक क्षमता प्राथमिक सहकारी संस्थेत आहे. त्यामुळेच सहकारी मंत्रालयाची स्थापन झाल्यानंतर पहिला निर्णय हा २ लाख प्राथमिक सहकारी संस्था तयार करण्याचा घेण्यात आला होता. नव्याने उभारण्यात येत असलेल्या सहकारी संस्था हा बहुआयामी असणार असून त्या पारंपरित बँकींग आणि कर्जपुरवठ्याच्या पलीकडे अनेक सेवा प्रदान करणाऱ्या ठरतील, असे केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह म्हणाले.
प्राथमिक सहकारी संस्थांना बहुआयामी बनविण्यावर मोदी सरकारचा भर असल्याचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, सरकारने प्राथमिक सहकारी संस्थांना गोदामे, गॅस वितरण, खत वितरण, पाणीपुरवठा यांच्याशी जोडले आहे. प्राथमिक सहकारी संस्था आता सामुदायिक सेवा केंद्रेही बनली आहेत. प्राथमिक सहकारी संस्थांद्वारे आता रेल्वे आरक्षण, विमान आरक्षणही करता येते. पुढेही अशा अनेक सुविधा त्यात जोडण्यात येणार आहेत. नव्याने स्थापन झालेल्या सहकारी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्रे, रुपे किसान क्रेडिट कार्ड आणि मायक्रो एटीएमचेही वाटप केले. ही आर्थिक साधने पंचायतींमध्ये कर्जसेवा सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी आणि आर्थिक समावेशनाला चालना देण्यासाठी महत्वाची ठरत आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण जनतेला विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना सक्षम करण्यासाठीही सहकारी संस्था प्रमुख भूमिका बजावणार आहेत. केंद्र सरकारने बंद पडलेल्या प्राथमिक सहकारी संस्था बरखास्त करण्यासाठी मानक प्रणाली जारी केली आहे. याद्वारे १५ हजार गावांमध्ये नवीन प्राथमिक संस्था उभारण्यात येणार असल्याचेही केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी नमूद केले आहे.