उबाठा गटाला धक्का! अद्वय हिरे यांचे मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्यत्व रद्द
25-Dec-2024
Total Views | 74
नाशिक : उबाठा गटाचे उपनेते अद्वय हिरे यांचे मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. जिल्हा उपनिबंधक फैय्याज मुलाणी यांनी हा निर्णय दिला आहे. बाजार समितीच्या मासिक सभेला सात वेळा गैरहजर राहिल्याने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.
मंगळवार, २४ डिसेंबर रोजी बाजार समिती प्रशासनाला याबाबतचे आदेश प्राप्त झालेत. २३ ऑगस्ट रोजी मालेगाव कृषी उत्पन्न उत्पन्न बाजार समितीचे मतदार धर्मा शेवाळे यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली होती. समितीचे सभापती सातत्याने मासिक सभांना गैरहजर राहत असल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर यावर निबंधकांकडे सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर उपनिबंधक फैय्याज मुलाणी यांनी अद्वय हिरे यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय दिला.
उबाठा गटाचे उपनेते असलेले अद्वय हिरे यांनी गेल्या विधानसभा निवडणूकीत मंत्री दादा भुसे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर आता त्यांचे मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्यत्वदेखील रद्द झाल्याने उबाठा गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.