सवय म्हणावी की खोड?

    24-Dec-2024   
Total Views | 62
ubt spokeperson sanjay raut
 
जग इकडचे तिकडचे होवो, मात्र राज्यातील एका विश्वप्रवक्त्याला प्रत्येक गोष्टीवर आपले मत व्यक्त करणे अतिगरजेचे वाटते. ही सवय म्हणावी की खोड, ते सांगता येत नसले, तरी ती काही केल्या जात नाही, हे मात्र तितकेच खरे. नुकतीच राज ठाकरे यांच्या भाच्याच्या लग्नात उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आले. यावेळी दोघांमध्ये जुजबी चर्चा झाली. मात्र, चर्चा झाली इकडे अन् मिरच्या झोंबल्या त्या विश्वप्रवक्ते संजय राऊतांना. “जनतेचे दोन्ही भावंडांवर जीवापाड प्रेम आहे. दोघांचे पक्ष वेगळे आहेत. त्यांच्यात वैचारिक मतभेद आहेत. कुटुंब म्हणून मात्र आम्ही कायम एक आहोत. मात्र, राज ठाकरे यांचे अमित शाह, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे आदर्श आहेत. आमच्या पक्षाचे तसे नाही. महाराष्ट्रावर अन्याय करणारे, आमचा पक्ष फोडणारे हे लोक आहेत.” त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकत नसल्याचे म्हणत उबाठा गटाचे खा. संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर भाष्य केले आहे. तसेच, राज ठाकरे दुर्दैवाने अशा लोकांची साथ देतात, असा टोमणाही राऊतांनी लगावला. पक्षाध्यक्षांकडून राऊतांनी त्याचेही उत्तम प्रशिक्षण घेतलेले आहे, नव्हे त्यांनी एकदा तर सांगितलेही आहे की, चक्क उद्धव ठाकरेंकडून रशियाचे राष्ट्रपती पुतीन मार्गदर्शन घेतात. त्यामुळे राऊतांच्या बडबडीवर आणि विश्वासार्हतेवर फार काय ते बोलावे... राऊतांनी आपल्या शेवटच्या खासदारकीत का होईना, जमेल तेवढी लोकांची कामे करावी. ज्यांना पन्नास खोके म्हणून हिणवले, त्यांच्याच जीवावर ते खासदार झाले होते. अगदी काठावर जिंकले, नाहीतर पराभव अटळ होताच. मात्र, दिवस आणि वेळ पूर्णतः बदललेली आहे. आता राऊतांना राज्यसभेची पायरी चढायला उबाठा गटाकडे आमदारच शिल्लक नाही. खासदारकी दूर, स्वतः उद्धव ठाकरे यांचे आमदार होणे आता दुरापास्त दिसते. विरोधी पक्षनेते पद मिळेल इतके आमदारही महाराष्ट्राच्या जनतेने यंदा निवडून दिले नाही. इतका लाजिरवाणा पराभव होऊनही, रोज राऊत अपशब्दांची लाखोली सत्ताधार्‍यांवर वाहत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर राऊतांना एका वाक्यातच प्रत्युत्तर देतात आणि ते म्हणजे कोण संजय राऊत? भविष्यात खासदारकी मिळणार नसल्यामुळे ते वाक्य लवकरच खरे ठरेल, हे मात्र नक्की...


कर नाही त्याला डर कशाला?


"जे सिनेमात कधीकाळी पाहिले, ते आता वास्तवात महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. सध्या जे महाराष्ट्रात घडते आहे, त्यावर विश्वास बसत नाही. आता पुढचा महाराष्ट्र कसा असेल, याची मला फार भीती वाटते, मला कधीही भीती वाटली नाही. पण, आजची परिस्थिती पाहून भीती वाटते,” असे शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, बारामतीत गुन्हेगारी वाढते आहे, असे सांगायलाही त्या बिलकुल विसरल्या नाहीत. दादा जरी बारामतीचे आमदार आणि आता राज्याचे उपमुख्यमंत्री असले, तरीही आपण स्वतः बारामतीच्या खासदार आहोत, हे सुप्रिया सुळे बहुदा विसरल्या. बहुतेक त्यांना ‘ईव्हीएम’ला विरोध करता करता आपण स्वतःही ‘ईव्हीएम’मुळेच निवडून आलोय, हे लक्षात नसावे. आता त्यांना महाराष्ट्रात भीती वाटतेय. कारण, राज्यात मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आहेत. त्यामुळे एकेकाळी ‘अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा,’ असे खोचकपणे विचारणार्‍या सुप्रियाताईंना विधानसभा निवडणुकीच्या निकालात या प्रश्नाचे व्यवस्थितपणे उत्तर मिळाले. तिकडे दिल्लीत तर राहुल गांधी भाजी बाजारात जाऊन भाजी खरेदी करत आहेत. भाज्यांचे भाव वाढले, म्हणून आरडाओरड करत आहेत. मात्र, ज्या भाज्यांना हंगाम नसतो, त्या महाग असतात, इतके साधे गणितही त्यांना कळत नाही. असो. ते तिकडे भाजी बाजारात मुक्त फिरतात. इकडे महाराष्ट्रात येतात. मग सुप्रिया सुळेंनाच नेमकी भीती का वाटतेय? बहुतेक मविआ सरकारच्या काळात झालेल्या गैरव्यवहारांचा पर्दाफाश होण्याची भीती त्यांना वाटत असावी. मविआ सरकार असताना महाराष्ट्रात विरोधी पक्षाचे कार्यकर्ते प्रचंड दबावाखाली होते, कधी काय लिहिले म्हणून अटक होईल, याची शाश्वती नव्हती. कसल्याही आरोपाखाली ठाकरे सरकार आपल्याला अटक करेल, याची त्यांना भीती वाटत होती. हनुमान चालीसा पाठ करणार म्हणून नवनीत राणांना तुरूंगात टाकले, केतकी चितळे, अनंत करमुसे मारहाण प्रकरण अजूनही महाराष्ट्र विसरलेला नाही. त्यामुळे ही भीती वगैरे काही नाही, तर केवळ फडणवीस मुख्यमंत्री झालेत म्हणून आणि त्यातही त्यांच्याकडे गृह खाते आल्यामुळे सुप्रियाताई असे बोलू लागल्या आहेत. सुप्रियाताई पण कर नाही, त्याला डर कशाला? आता ठाकरे नव्हे, तर फडणवीस सरकार आहे, त्यामुळे निर्धास्त राहा!


 

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.
अग्रलेख
जरुर वाचा