सावरकर विचारांची ज्योत तेवत ठेवणारा ‘भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूह’

    24-Dec-2024   
Total Views |
swantatryaver savarkar

 
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मस्थान असूनही भगूरमध्ये सावरकरांची जयंती आणि आत्मार्पण दिन वगळता अन्य उपक्रम होत नव्हते. याची खंत बाळगत भगूरमधील काही हिंदुत्ववादी आणि सावरकरप्रेमी कार्यकर्त्यांनी सावरकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पुढाकार घेतला. सावरकरांच्या विचारांची ज्योत तेवत ठेवण्याच्या उद्देशाने त्यांनी 2010 साली ‘भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहा’ची स्थापना केली. आज या समूहाचे रूपांतर रोपट्यापासून वटवृक्षात झाले आहे. या लेखाद्वारे समूहातर्फे राबविण्यात येणार्‍या उपक्रमांचा आणि कार्याचा घेतलेला हा आढावा...

तंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मस्थान असूनही भगूरमध्ये सावरकरांची जयंती आणि आत्मार्पण दिन वगळता अन्य उपक्रम होत नव्हते. याची खंत बाळगत भगूरमधील हिंदुत्ववादी कार्यकर्ते मंगेश मरकड, मनोज कुवर, प्रशांत लोया आणि योगेश बुरके यांनी पुढाकार घेतला. सावरकर म्हणजे हिंदुत्व आणि हिंदुत्व म्हणजे सावरकर. त्यामुळे सावरकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने दि. 28 मे 2010 साली सर्वप्रथम ‘भगूरपुत्र स्वांत्र्यवीर सावरकर’ फेसबुक समूह स्थापन करण्यात आला. यावेळी फेसबुकच्या माध्यमातून सावरकरांचे जन्मस्थान, त्यांचे वास्तव्य, विचार आणि त्यांच्या कार्याची माहिती समूहाद्वारे लोकांना दिली जाऊ लागली. या समूहाला प्रचंड प्रतिसाद मिळत गेला आणि पुढे ‘भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर’ समूह या नावाने काम सुरू झाले.

सावरकर हॉलमध्ये सर्वप्रथम सावरकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सुनील धनवट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दि. 8 जुलै 2010 साली स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘मार्सेलिस उडी’ अर्थात समुद्रझेपेचा शौर्य शताब्दी सोहळा भगूरमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी हिमानीताई सावरकर यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात अशापद्धतीने झालेला हा पहिलाच कार्यक्रम होता. पुढे हा सोहळा दरवर्षी भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला जाऊ लागला. समूहाच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येऊ लागले. तिन्ही सावरकर बंधुंच्या जयंती, पुण्यतिथीनिमित्त अभिवादनपर कार्यक्रमही दरवर्षी घेतले जातात. 2013 साली क्रांतिकारकांच्या तैलचित्रांचे प्रदर्शनदेखील भरविण्यात आले.

नाशिकरोड येथील उड्डाणपुलाला स्वा. सावरकरांचे नाव देण्यात आले होते. मात्र, या उड्डाणपुलावरील नावाची दुरवस्था झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रशासनाकडे पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला. 2016 साली शहर व परिसरातील शाळा आणि ग्रंथालयांना सावरकरांवरील ग्रंथ भेट देण्यात आले. याच वर्षी भगूरमध्ये ‘सावरकर साहित्य संमेलन’ भरविण्यात आले. यावेळी समूहाच्या 50 हून अधिक कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने सावरकरांचे छायाचित्र असलेले टी-शर्ट तयार करून घेतले. देशभरातून सावरकरप्रेमी भगूरमध्ये येणार परंतु, त्यांना आठवण म्हणून काय देणार असा प्रश्न होता. तेव्हा समूहाने स्वखर्चाने ‘भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूह क्रांतितीर्थ दिनदर्शिका’ प्रकाशित करत ती मान्यवरांना भेट दिली.

सदर संमेलनाच्या यशस्वीतेसाठी समूहाने सर्वोतोपरि प्रयत्न केले. संमेलनादरम्यान समूहाच्या कार्यकर्त्यांची सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांच्याशी भेट झाली. त्यावेळी सावरकर समूहातर्फे सुरू असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. समूहाने सावरकर जयंतीला ग्रंथदिंडी आणि महाआरती सोहळा आयोजित केला. यासाठी रणजित सावरकरांनाही निमंत्रण देण्यात आले. कार्यक्रमाला रणजित सावरकर यांच्यासह स्वामिनी सावरकर यादेखील भगूरमध्ये आल्या. भगूरमधील ग्रंथदिंडीला मोठा प्रतिसाद मिळाला. अष्टभुजा देवीच्या आरतीला तर संपूर्ण खंडेराव मंदिर गर्दीने भरून गेले होते. यावेळी दोन्ही मान्यवरांच्या डोळ्यांत अक्षरशः आनंदाश्रू आले. भगूरकरांकडून सावरकर कुटुंबाला मिळालेल्या प्रेमाने ते अगदी भारावून गेले होते.

पुढे मुंबईतील स्वा. सावरकर स्मारक येथे समूहाने सहल काढली. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी स्मारक पाहिले. फायरिंग क्लब, नाट्यगृह लायटिंग शोदेखील अनुभवला. समूहाच्या कार्यकर्त्यांचा सत्कारही करण्यात आला. यानंतर सावरकरांशी संबंधित ठिकाणांना भेट देण्यासाठी समूहातर्फे सहल काढली जाऊ लागली. दरवर्षी सावरकर भगूर दर्शन अभ्यास मोहीम आयोजित केली जाते. गुढीपाडव्याला छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्वाची गुढी उभारली जाते. नाशिक नगरीत झालेल्या 94 व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’साठी रचण्यात आलेल्या गीतामध्ये जाणीवपूर्वक टाळलेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख, संमेलनामध्ये विविध ठिकाणी साहित्यिक सावरकरांची केली जात असलेली उपेक्षा तसेच, मराठी साहित्य संमेलनासारख्या पवित्र ठिकाणी संकुचितपणे वागणार्‍यावृत्तींचा समूहाच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज व स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याशेजारी सुशोभीकरण करण्यासाठी समूहाने प्रयत्न केले आणि यशही मिळवले. समूहाने राबविलेल्या वक्तृत्व, लेखन स्पर्धांतून अनेक वक्ते, लेखक तयार झाले. सावरकरांच्या आत्मार्पण दिनी दरवर्षी रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येते. भगूर येथील उड्डाणपुलाला क्रांतिवीर बाबाराव सावरकर यांचे नाव देण्यासाठी तत्कालीन खा. हेमंत गोडसे यांना समूहाच्यावतीने निवेदन देण्यात आले. नाशिक येथील विमानतळाला बाबाराव सावरकरांचे नाव देण्यासाठी तत्कालीन पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांना समूहातर्फे निवेदन देण्यात आले. पवन एक्सप्रेस रेल्वे अपघातवेळी नाशिक रेल्वे स्थानकावर कार्यकर्त्यांनी रेल्वे प्रशासनाला मदत केली.

समूहातर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर ही आयोजित केले जातात. गणेशोत्सवादरम्यान ‘दारणातीरी स्वच्छता मोहीम’, ‘प्लास्टिकमुक्त भगूर अभियान’ राबविले जाते. स्वा. सावरकर स्मारकामध्ये देशभरातून येणार्‍या विविध शैक्षणिक सहलींना सावरकरांची तसेच, स्मारकाबद्दल माहिती देणे, भगूरमधील विविध ठिकाणांची माहिती देणे, तसेच त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करणे, हे कार्य समूह अव्याहतपणे करीत आहे. सवंग लोकप्रियतेसाठी राजकीय सुडबुद्धीने काही समाजविघातक शक्ती वेळोवेळी स्वातंत्र्यवीरांबद्दल अवमानकारक भाषा वापरत असतात. अशावेळी सर्वात आधी समूहातर्फे निषेध व निदर्शने केली जातात, समाजमाध्यमांद्वारे सावरकर प्रेमीमध्ये याबाबतची जनजागृती केली जाते. या व्यतिरिक्त महापुरूषांची जयंती आणि पुण्यतिथी असे अनेक कार्यक्रम समूह वर्षभर राबवित असतो.

भगूर दर्शन अभ्यास मोहिमेचा अनोखा प्रयोग
12/24/2024विविध शहरांतून सावरकर स्मारकाला मान्यवर भेट देतात आणि निघून जातात. मात्र, सावरकरांचा सहवास लाभलेली ठिकाणे त्यांना पाहता येत नाही. कारण, त्यांना मार्गदर्शन करणारे कुणी नाही. यावर उपाय म्हणून 2016 साली भगूर दर्शन अभ्यास मोहीम सुरू करण्याचा निर्णय समूहाने घेतला. सावरकरांचा सहवास लाभलेली भगूरमधील सर्व ठिकाणे जयंतीच्या एका दिवसात दाखविण्याचा प्रयत्न या मोहिमेद्वारे केला जातो. या मोहिमेच्या माध्यमातून हर्षल देव, प्रणव जोशी, शौनक कंकाळ ही मंडळीही समूहात सामील झाली. दरवर्षी ही मोहीम आयोजित केली जाते, त्याची पूर्वसूचना फेसबुकच्या माध्यमातून दिली जाते. मोहिमेसाठी नाममात्र शुल्क आकारले जाते. प्रारंभी बालाजी मंदिरात एकत्रित होऊन नोंदणीनंतर बॅच दिले जातात. सावरकर स्मारकात दर्शनानंतर लक्ष्मी नारायण मंदिराची माहिती सांगितली जाते. तेथून बाजारातील महादेव मंदिर, सावरकर संकुलाची माहिती दिली जाते. सावरकरांनी पोहण्याचा सराव जिथे केला, तो दारणा नदीचा तीर दाखवला जातो. नंतर राम मंदिराचे माहात्म्य सांगितले जाते. सावरकरांच्या सर्व भावंडांचे शिक्षण ज्या मराठी शाळेत झाले, ती शाळा दाखवून मग खंडेराव मंदिरात दर्शनानंतर मोहिमेचा समारोप केला जातो. दरम्यान, कोरोना काळात मोहीम खंडित होऊ नये, यासाठी समूहातर्फे अनोखा प्रयोग करण्यात आला. सावरकरांचा सहवास लाभलेल्या प्रत्येक स्थळाची छायाचित्रणासह माहिती असलेला व्हिडिओ फेसबुकवर अपलोड करण्यात आला, ज्याला सावरकरप्रेमींचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या अभ्यास मोहिमेला वर्षागणिक सावरकरप्रेमींची संख्या वाढत आहे.

सावरकरांच्या विचारांची ज्योत तेवत ठेवायची आहे. भगूर हे सावरकरांचे गाव आहे आणि ती ओळख कायम राहिली पाहिजे. सर्व कार्यकर्ते आपली नोकरी, व्यवसाय सांभाळत समूहाच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत असतात. यासाठी गरज पडल्यास स्वखर्चही करतात. राजकारणाला दूर ठेवत केवळ आणि केवळ सावरकर विचार हेच ध्येय आमच्यासमोर असल्याचे सावरकरप्रेमी मंगेश मरकड सांगतात.
 
मंगेश मरकड, मनोज कुवर, प्रशांत लोया, योगेश बुरके यांच्यासह संतोष मोजाड, सुनील जोरे, प्रवीण वाघ, संभाजी देशमुख, आकाश नेहरे, खंडु रामगडे, विजय घोडेकर, गणेश राठोड, सार्थक मरकड, सुभाष पुजारी, केतन कुवर, दीपक गायकवाड, भूपेश जोशी, भूषण कापसे, विवेक भागवत, विजय घोडेकर, सौरभ कुलकर्णी, शंकर मुंढारे, ओम देशमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्ते समूहात सक्रिय असून सावरकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कार्यरत आहे. समूहाला एकनाथराव शेटे, प्रताप गायकवाड, मृत्यूंजय कापसे, मंजिरी मराठे यांचेही मार्गदर्शन लाभते. सावरकर विचारांची ज्योत तेवत ठेवणार्‍या भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाला आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा...
अधिक माहितीसाठी संपर्क : 7058589767



पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.