मुंबई : राहुल गांधींनी जातीजातींमध्ये भांडण लावण्याची सुपारी घेतली आहे, अशी टीका मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. मंगळवार, २४ डिसेंबर रोजी त्यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास खात्याचा पदभार स्विकारला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मंत्री नितेश राणे म्हणाले की, "राहुल गांधींनी देशात जातीजातींमध्ये भांडण लावण्याची सुपारी घेतली आहे. हिंदूंना विभागणे आणि त्यांच्यांत भांडण लावणे हे त्यांचे मुख्य काँट्रॅक्ट आहे. त्यांना हिंदू राष्ट्रात फूट पाडायची आहे. महाराष्ट्रात हिंदुंनी एकत्र येऊन मतदान कसे केले, याची त्यांना मिरची लागली आहे. मुसलमान समाजातही तेवढ्याच जाती आहेत. पण राहुल गांधी कधीही त्या जातींचा उल्लेख करताना दिसले नाहीत. मात्र, हिंदूंना वेगवेगळ्या जातींमध्ये विभागून त्यांना तोडण्याचा एककलमी कार्यक्रम राहुल गांधी करत आहेत," असे ते म्हणाले.
संजय राऊतांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, "ज्या संजय राऊतांचा पक्ष स्वत:चा पायावर उभा राहू शकत नाही त्यांनी कुबड्यांची भाषा करू नये. उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कुबड्या घेऊनच मुख्यमंत्री झाले आहेत. ते स्वत:च्या ताकदीवर मुख्यमंत्री झालेले नव्हते. त्यामुळे दुसऱ्यांच्या कुबड्यांची भाषा करण्यापेक्षा स्वत:च्या मालकाची अवस्था पाहा."