दहशतवाद्यांना बांगलादेशचे आयते कुरण!

    23-Dec-2024   
Total Views |
some violent islamist groups in Bangladesh


बांगलादेशमधील काही जहाल इस्लामी गट या दहशतवादी संघटनाशी जवळीक साधून आहेत. ही जवळीक भावी काळात भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते. बांगलादेशमधील असे जहाल गट ‘एक्यूआयएस’ आणि ‘आयएसकेपी’ला पाहिजे ते सर्व सहकार्य करण्यास तयार असतील. बांगलादेशमधील जहाल गट अशा दहशतवादी संघटनांना भारताविरुद्ध पुरेशी रसद पुरविण्याचे केल्यावाचून राहणार नाहीत.

भारताविरुद्ध विविध दहशतवादी संघटना जगाच्या विविध भागात कार्यरत असल्या, तरी आगामी काळात भारतास ‘अल कायदा इन द सब कॉन्टिनेन्ट’(एक्यूआयएस) आणि ‘इस्लामिक स्टेट खोरासान प्रोविन्स’(आयएसकेपी) या दहशतवादी संघटनांकडून अधिक धोका असल्याचा गुप्तचर विभागाचा होरा आहे. ‘लष्कर-ए-तय्यबा’ आणि ‘जैस-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनांना भारत तोंड देत आला आहे. तसेच, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवण्यात यश आले आहे. जम्मू-काश्मीर पुरत्याच या संघटना आता कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. पण, वर उल्लेखित ‘एक्यूआयएस’ आणि ‘आयएसकेपी’ यांचा भारतास भावी काळात धोका आहे, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. बांगलादेशमध्ये अलीकडे जे सत्तांतर झाले, त्यामुळे तो देश म्हणजे, अशा दहशतवादी संघटनांसाठी आयते कुरणच बनले आहे. बांगलादेशमधील सत्तांतरानंतर त्या देशात जहाल, धर्मांध गट सक्रिय झाले आहेत. अन्य देशात सक्रिय असलेल्या इस्लामी दहशतवादी संघटनांना बांगलादेशात आश्रय घेणे आता अधिक सुकर झाले आहे.

‘जैस-ए-मोहम्मद’ आणि ‘लष्कर-ए-तय्यबा’ या दहशतवादी संघटना प्रामुख्याने पाकिस्तानच्या तालावर कार्य करणार्‍या आहेत. पण, ‘एक्यूआयएस’ आणि ‘आयएसकेपी’ या संघटनांना सर्वत्र खिलाफत राजवट आणि शरिया कायदा अमलात आणायचा आहे. बांगलादेशमधील काही जहाल इस्लामी गट या दहशतवादी संघटनाशी जवळीक साधून आहेत. ही जवळीक भावी काळात भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते. बांगलादेशमधील असे जहाल गट ‘एक्यूआयएस’ आणि ‘आयएसकेपी’ला पाहिजे ते सर्व सहकार्य करण्यास तयार असतील. या दोन दहशतवादी गटांनी भारतात आपला जम बसविण्याचा प्रयत्न अनेकदा करून पाहिला होता. पण, त्यांचे ते प्रयत्न यशस्वी होऊ शकले नव्हते. या गटांना जम बसविणे शक्य झाले नसले, तरी आपले तत्त्वज्ञान जहाल मुस्लीम तरुणांच्या गळी उतरविण्यात ते यशस्वी झाल्याचे दिसून येते. बांगलादेशमधील जहाल गट अशा दहशतवादी संघटनांना भारताविरुद्ध पुरेशी रसद पुरविण्याचे केल्यावाचून राहणार नाहीत.

‘आयएसकेपी’चे कार्यक्षेत्र हे अफगाणिस्तान पुरतेच मर्यादित आहे, असे मानले जात होते. पण, या दहशतवादी संघटनेने मॉस्कोलगत एका सभागृहावर हल्ला करून 137 लोकांची हत्या केली आणि त्याद्वारे आपण जागतिक पातळीवर कार्यरत असल्याचे दाखवून दिले. ‘आयएसकेपी’ या संघटनेस भारतात हातपाय पसरवायचे आहेत. रशियामध्ये जसा हल्ला केला तसा एखादा हल्ला करण्याचा त्या संघटनेचा मानस असू शकतो. या दोनपैकी एक संघटना दक्षिण भारतात आणि दुसरी उत्तर भारतात कार्य करण्याचा विचार करतात. पण, समान उद्दिष्टांसाठी या दोन्ही संघटना एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा दहशतवादी संघटनांच्या हालचालींकडे भारताचेही लक्ष आहे. अलीकडेच दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने ‘आयएसकेपी’च्या 14 सदस्यांना अटक केली होती. या प्रकरणी अधिक तपास केला जात आहे. भारताने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या जहाल संघटनेवर बंदी घातल्यानंतर त्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न ‘आयएसकेपी’ ही संघटना करीत आहेत. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे अनेक भूमिगत कार्यकर्ते आता ‘आयएसकेपी’साठी कार्य करताना दिसत आहेत.

जहाल मुस्लीम दहशतवादी संघटना भारतास आपले लक्ष्य करीत आहेत, असे या सर्व घडामोडी पाहता दिसून येत आहे. बांगलादेशमध्ये झालेल्या सत्तांतरामुळे त्या देशात जहालांचे फावले असल्याचे दिसून येत आहे. त्यांची मदत घेऊन प्रारंभी उल्लेखित जहाल मुस्लीम संघटना भारताविरुद्ध कारवाया करण्यामध्ये सक्रिय होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. पण, भारताच्या गुप्तचर यंत्रणांचे या सर्व घडामोडींकडे बारकाईने लक्ष आहे. त्यामुळे अशा जहाल संघटनांचे मनसुबे पूर्ण होण्याची शक्यता नाही, असे गृहीत धरायला हरकत नाही.


एफआयआर रद्द करण्यास नकार!

वाराणसीमधील ज्ञानवापी परिसरात जे शिवलिंग आढळले त्या शिवलिंगासंदर्भात आक्षेपार्ह ‘पोस्ट’ टाकल्याबद्दल दिल्ली विद्यापीठाच्या डॉ. रतनलाल नावाच्या प्राध्यापकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आपल्यावर जो गुन्हा नोंदविण्यात आला आहे तो रद्द करण्यात यावा, अशी विनंती डॉ. रतनलाल यांनी एका याचिकेद्वारे दिल्ली उच्च न्यायालयास केली होती. भाषण स्वातंत्र्याचा गैरवापर केल्यावरून रतनलाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मे 2022 साली या प्राध्यापकाने समाजमाध्यमावर आपली आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसिद्ध केली होती. त्यावरून जोरदार वाद निर्माण झाला होता. एका न्यायालयीन सर्वेक्षणाच्या दरम्यान वाराणसीमधील ज्ञानवापी परिसरात शिवलिंग आढळले होते. त्याचा आपल्या ‘पोस्ट’मध्ये उल्लेख करून या प्राध्यापक महाशयाने समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखावतील, असा मजकूर त्या समवेत प्रसिद्ध केला होता. त्या शिवलिंगाची छायाचित्रे देऊन त्यासमवेत ‘यदि यह शिवलिंग हैैं, तो लगता हैैं, शायद शिव जी का भी खतना कर दिया गया था,’ अशा ओळी या महाशयाने प्रसिद्ध केल्या होत्या. कोणीही उठावे आणि हिंदू देवदेवतांची टिंगलटवाळी करावी, असाच तो प्रकार होता. या ‘पोस्ट’नंतर दि. 18 मे 2022 साली दिल्लीमधील सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला. या संदर्भातील तक्रार शिवाल भल्ला यांनी केली होती. सदर पोस्ट जातीय सलोखा बिघडविणारी, धार्मिक भावना दुखविणारी आणि सामाजिक सलोखा बिघडविणारी असल्याचे आपल्या तक्रारीत भल्ला यांनी म्हटले होते. गुन्हा रद्द करण्याच्या याचिकेवरील युक्तिवादाच्या वेळी सदर प्राध्यापकाच्या वकिलांनी, प्राध्यापक इतिहासाचे अभ्यासक असल्याचा उल्लेख केला होता. त्यांचा कोणाच्याही भावना दुखविण्याचा हेतू नव्हता, असे न्यायालयास सांगण्यात आले. पण, न्यायालयाने ते म्हणणे अमान्य केले. कोणाही व्यक्तीला मग ती प्राध्यापक असो, शिक्षक असो किंवा बुद्धिवंत असो, त्या व्यक्तीस असे भाष्य करण्याचा, अशा ‘पोस्ट’ करण्याचा किंवा ‘ट्वीट’ करण्याचा काही अधिकार नाही. भाषण स्वातंत्र्य आणि विचार स्वातंत्र्य किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य असो, त्याचा वापर अत्यंत जबाबदारीनेच करायला हवा, असे दिल्ली उच्च न्यायालयाने आपला निकाल देताना म्हटले. इतिहासाचे अभ्यासक म्हणून डॉ. रतनलाल यांच्यावर अधिक जबाबदारी होती, असेही न्यायालयाने नमूद केले. याचिकाकर्त्याचा युक्तिवाद अमान्य करून एफआयआर रद्द करण्यास न्यायालयाने नकार दिला.


सोन्या-चांदीच्या बाजारपेठेचा शोध!

विजयनगर साम्राज्याच्या सुवर्णकाळ पाहिलेल्या हम्पीमध्ये तेथे सुरु असलेल्या उत्खननात पुरातत्त्व खात्यास नवनवीन माहिती हाती लागत आहे. विजयनगर साम्राज्याच्या काळात या नगरीमध्ये सोन्या-चांदीचा आणि अन्य मौल्यवान धातूंचा व्यापार होत होता. त्याच्या खाणाखुणा तेथे जे उत्खनन करण्यात आले त्यातून आढळून आल्या आहेत. हम्पीमधील सध्या पान सुपारी बाजार म्हणून ओळखल्या जात असलेल्या एक किलोमीटरच्या परिसरात पुरातत्त्व खात्याकडून उत्खनन केले जात आहे. तेथील हजार राम मंदिर आणि ‘शृंगारदा हेब्बागिळू’ (सुशोभित मुख्य प्रवेशद्वार) या परिसरात हे उत्खनन केले जात आहे. हा भाग त्याकाळी ‘पेड्डा अंगडी विधी’ (मुख्य बाजारपेठ) ओळखला जात होता. या बाजारपेठेमध्ये तेव्हा सोने-चांदी आणि अन्य मौल्यवान धातूंची खरेदी-विक्री होत असे. सध्या सुरु असलेल्या उत्खननात पुरातत्त्व खात्यास त्या संदर्भातील अनेक वस्तू हाती लागल्या आहेत. मंदिरांवरील शिलालेख आणि विदेशी पर्यटकांनी केलेल्या नोंदी लक्षात घेता पान सुपारी बाजार म्हणून ओळखली जात असलेली ही बाजारपेठ विजयनगर साम्राज्याच्या काळात सोन्या-चांदीची उलाढाल करणारी मोठी बाजारपेठ असल्याचे उपलब्ध पुराव्यांवरून दिसून येते, असे पुरातत्त्व अधिकारी निखील दास यांनी म्हटले आहे. विजयनगर साम्राज्य किती वैभवशाली होते, त्याचे पुरावे अशा उत्खननाच्या निमित्ताने हाती लागत आहेत.

9860020732

दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.