पूजा खेडकर प्रकरण म्हणजे केवळ UPSC च नाही तर संपूर्ण समाजाची फसवणूक : दिल्ली उच्च न्यायालय
23-Dec-2024
Total Views | 59
नवी दिल्ली : (Pooja Khedkar Case) वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे आता तिच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला असून कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. तिच्यावर फसवणूक तसेच चुकीच्या पद्धतीने ओबीसी आणि दिव्यांग कोट्याचा लाभ घेतल्याचा आरोप आहे.
फसवणूक आणि चुकीच्या पद्धतीने ओबीसी आणि दिव्यांग कोट्याचा लाभ घेतल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेली पूजा खेडकरची अटकपूर्व जामीन याचिका मंजूर करण्यास नकार दिला आहे. तसेच पूजा खेडकरला उच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले. पूजा खेडकर प्रकरण म्हणजे केवळ UPSC च नाही तर संपूर्ण समाजाची फसवणूक असे न्यायालयाने म्हटले. पूजाने देशाची प्रतिमा मलीन केल्याची टिप्पणी न्यायमूर्ती चंद्र धारी सिंग यांच्या खंडपीठाने केली आहे.
पूजा खेडकर विरोधात युपीएससीच्या तक्रारीवरून दिल्ली गुन्हे शाखेने एफआयआर नोंदवून घेतली होती. त्यानंतर पूजा खेडकर अटकपूर्व जामिनासाठी पटियाला न्यायालयात गेली होती. त्यावेळी पटियाला न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर पूजाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. तसेच या प्रकरणातील गुन्हेगारी उलगडण्यासाठी चौकशी आवश्यक असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना प्रत्येक तारखेपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते. जवळपास आठ ते दहा वेळा सुनावणी झाली. अखेर महिन्याभरानंतर पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. यूपीएससीच्या तक्रारीनुसार दिल्ली पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला होता त्यानुसार पूजा खेडकरांना कधीही अटक होऊ शकते.