मंत्री संजय शिरसाट आणि उदय सामंत बीड-परभणी दौऱ्यावर!
सोमनाथ सुर्यवंशी आणि संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेणार
23-Dec-2024
Total Views | 45
मुंबई : उद्योग मंत्री उदय सामंत आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट हे सोमवारी बीड आणि परभणी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते दोघेही परभणी येथे सोमनाथ सुर्यवंशी तर बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत.
काही दिवसांपूर्वी परभणीमध्ये संविधानाचा अवमान करण्यात आलेल्या घटनेच्या निषेधार्थ केलेल्या आंदोलकांपैकी सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. तर बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. दरम्यान, मंत्री उदय सामंत आणि मंत्री संजय शिरसाट हे दोन्ही पीडित कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी बीड आणि परभणी दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पीडित कुटुंबियांशी संवाद साधणार आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची मदत आणि या संपुर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटी स्थापन करणार असल्याचे सांगितले आहेत. तसेच याप्रकरणाची न्यायालयीन चौकशीदेखील करण्याची ग्वाही त्यांनी दिली.