धक्कादायक! रशियामध्ये 9/11ची पुनरावृत्ती! इमारतींवर ड्रोन हल्ला
21-Dec-2024
Total Views | 49
मॉस्को: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला आता २ वर्षांहून अधिकचा काळ लोटला. या युद्धामध्ये लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले, तर दुसऱ्या बाजूला कोट्यावधींचे नुकसान झाले. अशातच आता रशियाच्या कझान शहरात ड्रोन हल्ला झाल्याचे समोर येत आहे. कझान शहारात ८ ड्रोन हल्लेझाले असून त्यातील ६ हल्ले हे रहिवाशी इमरातींमध्ये झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या हल्ल्यामुळे अनेकांना अमेरीकेत झालेल्या 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याची आठवण झाली.या हल्ल्याच्या पाठीमागे युक्रेनचा हात असल्याचे बोलले जात आहे.
कझानमधील उंच इमरतींवर ड्रोन हल्ला झाल्याची व्हिडीओ आणि फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. वेगवेगळ्या दिशांमधून इमरातींवर निशाणा साधत हा हल्ला केला गेल्याचे नजरेस येत आहे. रशियाच्या सुरक्षा मंत्रालयाने हा हल्ला युक्रेन ने केल्याचा आरोप केला आहे. आता पर्यंत या हल्ल्यातील मृतांची आकडेवारी अद्याप समोर आली नाही. हल्ला झाल्यानंतर त्वरीत या इमरातींमधून रहिवाशांना सुखरूप स्थळी हलवण्यात आले. त्याच बरोबर कझान शहरातील विमानतळावरून विमानांच्या उडाण्णाला सुद्धा मज्जाव करण्यात आला आहे.
न्युक्लीअर चीफची हत्या आणि युद्धविराम!
चार दिवसांपूर्वी दिनांक १७ डिसेंबर रोजी रशियाचे न्युक्लीअर चीफ इगोर किरिलोव्ह यांचा मॉस्कोमध्ये झालेल्या स्फोटात मृत्यू झाला. हल्ल्याच्या वेळी, किरिलोव्ह अपार्टमेंटमधून बाहेर पडत असताना जवळ उभ्या असलेल्या स्कूटरचा स्फोट झाला. या हल्ल्यामध्ये किरिलोव्ह यांच्या सहाय्यकाचा सुद्धा मृत्यू झाला. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या हत्येमागे युक्रेनचाच हात होता. या हल्ल्यानंतर दोन दिवसांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युद्धविराम करण्याचे संकेत दिले होते. या संदर्भात अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा करणार असल्याचे बोलले जात होते. आज कझान मध्ये झालेल्या हल्ल्यामुळे रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाला नवीन वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.