मुंबई : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्र वायकर ( Ravindra Waikar ) यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका गुरुवार, दि. १९ डिसेंबर रोजी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे रवींद्र वायकर यांची खासदारकी अबाधित राहणार आहे.
लोकसभा निवडणुकीत उबाठा गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा वायकर यांच्याकडून अवघ्या ४८ मतांनी पराभव झाला. “वायकर यांना ४ लाख, ५२ हजार, ६४४ तर कीर्तिकर यांना ४ लाख, ५२ हजार, ५९६ मते मिळाली. मात्र, मतमोजणीत मोठी तफावत आहे,” असा दावा करीत कीर्तिकर यांच्याकडून निकालाला आव्हान देण्यात आले. “मतदानकेंद्रावर मतमोजणीदरम्यान १२० ‘टेंडर’ मते गहाळ झाली असून त्यांची मोजणी झालेली नाही. एकूण ३३३ ‘टेंडर’ मते होती. त्यांपैकी १२० ‘टेंडर’ मते मोजली गेली नाहीत. ‘टेंडर’ मतांच्या फेरमोजणीची विनंती केली होती. पण ती नाकारण्यात आली,” असा दावा कीर्तिकर यांच्यातर्फे करण्यात आला.
मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त केलेल्या निवडणूक अधिकार्यांकडून अनेक गंभीर चुका झाल्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर झाला. तसेच, मतमोजणीकेंद्रात मोबाईलचा वापर झाल्याचे दिसून आले. हा मुद्दा वारंवार निदर्शनास आणून देऊन, तसेच गुन्हा नोंदवल्याच्या बाराव्या दिवसापर्यंत कोणतीही कारवाई झाली नसल्याचेही कीर्तिकर यांच्यावतीने न्यायालयाला सांगण्यात आले होते. त्यामुळे, ‘टेंडर’ मते ही या मतदारसंघाच्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेतील वादाचे मुख्य कारण असल्याचा दावाही कीर्तिकर यांच्यातर्फे करण्यात आला होता.
मात्र, कीर्तिकर यांची याचिका ऐकण्यायोग्य नाही. याचिकेची मांडणी योग्यरित्या करण्यात आलेली नाही. तसेच ‘टेंडर’ मते ही विजयी उमेदवाराला कशी मिळाली, हे दाखविण्यात कीर्तिकर अपयशी ठरले. त्यामुळे त्यांची याचिका फेटाळून लावावी हा वायकर यांच्या वतीने करण्यात करण्यात आलेला दावा न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठाने योग्य ठरवला.