‘सीक्वेल्स’ ते नव्या कलाकृती :2025 ठरणार ‘ब्लॉकबस्टर’

Total Views |
 
 
New Works: 2025
 

मनोरंजन...मनोरंजन...मनोरंजन... खरंच 2024 हे वर्ष चित्रपटप्रेमींसाठी अगदी ‘रोलर कॉस्टर राईड’सारखे होते, असे म्हणावे लागेल. मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड अशा अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी रसिकप्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. तसेच, प्रेक्षकांना भरघोस प्रतिसाद मिळवून अनेक चित्रपटांनी बॉक्सऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. बघता बघता, 2024 हे वर्ष सरत आले आणि 2025 हे नवे वर्ष पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहे. त्यानिमित्ताने 2025 साली मनोरंजनसृष्टीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार्‍या काही चित्रपटांचा घेतलेला हा धांडोळा...


जानेवारी महिन्यात ‘स्काय फोर्स’ हा अभिषेक अनिल कपूर आणि संदीप केवलानी दिग्दर्शित आणि ‘मॅडॉक फिल्म्स’ अंतर्गत दिनेश विजन, अमर कौशिक आणि ‘जिओ स्टुडिओज’ अंतर्गत ज्योती देशपांडे यांनी निर्मित केलेला भारतीय वायुसेनेवर आधारित चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, सारा अली खान आणि निमरत कौर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ‘स्काय फोर्स’नंतर सनी देओल आणि आमिर खानचा ‘लाहोर 1947’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाची निर्मिती आमिर खानने केली असून, राजकुमार संतोषी दिग्दर्शक आहेत. या चित्रपटात सनी देओल, प्रिती झिंटा, अली फझल आणि शबाना आझमी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा भव्य चित्रपट फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. लक्ष्मण उत्तेकर यांचे दिग्दर्शन असणार्‍या या चित्रपटात अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.
 
2024 साली ‘हॉरर कॉमेडी’ चित्रपटांना प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली. ‘स्त्री 2’, ‘मुंज्या’ या चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. ‘मॅडॉक फिल्म्स’च्या याच हॉरर-कॉमेडी विश्वात ‘थामा’ हा चित्रपट 2025 साली प्रदर्शित होणार असून, यात आयुषमान खुराना आणि रश्मिका मंदाना झळकणार आहेत. तसेच, हॉलिवूड चित्रपटांच्या पावलांवर पाऊल ठेवून, हिंदी चित्रपटसृष्टीने देखील त्यांचे ‘स्पाय युनिव्हर्स’ तयार केले असून, ‘यशराज फिल्म्स’च्या ‘स्पाय युनिव्हर्स’मधील पहिला महिलाप्रधान ‘स्पाय युनिव्हर्स’ काही चित्रपट भेटीला येणार आहे. यातील ‘अल्फा’ हा पहिला चित्रपट असून, यात आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ प्रमुख भूमिकेत असणार आहेत. अभिनेता शाहिद कपूर काही मोजकेच, पण उल्लेखनीय चित्रपट करताना दिसत आहे. तसेच पुढील वर्षी शाहिद कपूर पोलीस अधिकार्‍याची भूमिका ‘देवा’ या चित्रपटात साकारणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री पूजा हेगडे देखील झळकणार आहे.
 
एकीकडे नव्या कलाकृती प्रदर्शित होणार असून, दुसरीकडे 2025 सालीही अनेक चित्रपटांचे ‘सीक्वेल्स’ प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये अजय देवगणची प्रमुख भूमिका असणारा ‘रेड 2’ भेटीला येणार असून, या चित्रपटात रितेश देशमुखची देखील एन्ट्री होणार आहे. त्यामुळे रितेश नेमका नायकाच्या की, खलनायकाच्या भूमिकेत असणार, हे पाहण्याची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. याशिवाय, हृतिक रोशनची प्रमुख भूमिका असणारा ‘वॉर 2’ देखील 2025 साली प्रदर्शित होणार असून, या चित्रपटात पहिल्यांदाच हृतिक आणि ज्युनिअर एनटीआर एकत्र दिसणार असून, ज्युनिअर एनटीआर या चित्रपटातून पहिल्यांदाच हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. याशिवाय अभिनेत्री कियारा अडवाणीदेखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
 
यानंतर वळूयात इतर ‘सीक्वेल्स’कडे. तर, अर्शद वारसी आणि अक्षय कुमार हे दोघेही उत्तम अभिनेते असून, पहिल्यांदाच ‘जॉली एल.एल.बी 3’ या चित्रपटातून ते एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. यापूर्वी या चित्रपटाचे दोन भाग प्रदर्शित झाले असून, दोन्ही भागांत दोघांनीही स्वतंत्रपणे अभिनय केला होता. मात्र, तिसर्‍या भागात आता दोघे एकत्र येऊन विशेष धमाल करणार, असे दिसून येते. 2025 सालचे हे वर्ष खरंतर अक्षय कुमारच्या करिअरसाठी महत्त्वपूर्ण असेल.कारण, गेल्या काही वर्षांमध्ये त्याने चित्रपट केले, पण ते ‘सुपरहिट’ ठरले नाही. कदाचित 2025 सालचे हे वर्ष त्याच्यासाठी नवी संधी देणारे ठरणार आहे. कारण, ‘जॉली एल.एल.बी 3’ शिवाय अक्षय कुमारचे ‘हाऊसफुल्ल 5’, ‘वेलकम टु द जंगल’ हे दोन चित्रपटदेखील 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहेत. या दोन्ही चित्रपटांत कलाकरांची फौज दिसणार आहे. याशिवाय, नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, यात अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत आणि अभिनेत्री साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहेत.
 
हिंदी चित्रपटसृष्टीचा आढावा तर घेतला, आता वळूयात मराठी चित्रपटांकडे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे दि. 1 जानेवारी 2025 रोजी परेश मोकाशी दिग्दर्शित-लिखित ‘मु.पो.बोंबिलवाडी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, यात प्रशांत दामले हिटलरची भूमिका साकारणार आहेत. याशिवाय वैभव मांगले, गीतांजली कुलकर्णी, अद्वैत दादरकर, आनंद इंगळे आणि बरेच कलाकार दिसणार आहेत. यानंतर दि. 10 जानेवारी रोजी सुबोध भावे दिग्दर्शित आणि अभिनीत ‘संगीत मानापमान’ हा संगीतमय चित्रपट प्रदर्शित होणार असून, यात वैदैही परशुरामी आणि सुमीत राघवन झळकणार आहेत. अ‍ॅसिड हल्ल्याने वाईट वेळ आलेल्या एका गायिकेचा खडतर प्रवास ‘मंगला’ या चित्रपटातून उलगडणार असून, अभिनेत्री शिवाली परब प्रमुख भूमिकेत दिसणार आहे, तर हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ हा चित्रपट दि. 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार असून, यात अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग आणि बरेच कलाकार दिसणार आहेत.
 
2024 सालचे हे वर्ष जितके हिंदी, मराठी चित्रपटांचे होते तितके किंवा त्याहून एक पाऊल पुढे दाक्षिणात्य चित्रपटांचे होते, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यामुळे 2025 हे वर्षदेखील प्रेक्षकांना वेड लावण्यासाठी दाक्षिणात्य कलाकार सज्ज झाले असून, कन्नड चित्रपट ‘कांतारा : अ लेजंड-चॅप्टर 1’ हा भेटीला येणार असून, पुन्हा एकदा रिषभ शेट्टी वेगळ्याच अवतारात दिसणार आहे. याशिवाय प्रभासची प्रमुख भूमिका असणारा ‘सालार 2’ देखील मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. तर, राम चरण, कियारा अडवाणी यांची प्रमुख भूमिका असणारा ‘गॅम चेंजर’ हा तेलुगू चित्रपटही प्रदर्शनाच्या रांगेत आहे. याशिवाय, ‘थलपती 69’ हा विजय, पुजा हेगडे, बॉबी देओल, प्रकाश राज यांचाही तामिळ चित्रपट भेटीला येणार आहे. कमल हसन यांची मुख्य भूमिका असणारा तामिळ चित्रपट ‘इंडियन 3 : वॉर मोड’ देखील येणार असून, यात काजल अग्रवाल आणि सिद्धार्थ असणार आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘कुली’ हा तामिळ चित्रपटदेखील प्रदर्शित होणार असून, यात नागार्जुन, श्रुती हसन झळकणार आहेत.
 
एकूणच काय, तर 2025 सालच्या या नव्या वर्षात मनोरंजनसृष्टीत अनेक नव्या कलाकृती भेटीला येणार असून, रसिक प्रेक्षकांचे केवळ तुफान मनोरंजनच होणार, याच काहीच शंका नाही.

रसिका शिंदे - पॉल

रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत.