विधानसभा निवडणुकीने गणिते फिरवली; उद्धव ठाकरेंना महापालिका निवडणूक जड जाणार
02-Dec-2024
Total Views | 100
मुंबई : ‘अरे आवाज कुणाचा’ अशी आरोळी कानावर पडली की, मुंबईकरांच्या मुखातून आपसूकच ‘शिवसेनेचा’ असे निघायचे. पण, उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thacheray ) बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली आणि भगव्याशी इमान राखणार्यांचा घात झाला. मुंबईकरांनी त्यांना पाठ दाखवली. लोकसभा निवडणूक ते लांगूलचालन करून जिंकले खरे. पण, विधानसभेने गणिते फिरवली. त्याचे प्रतिबिंब येणार्या मुंबई पालिका निवडणुकीत उमटणार असल्यामुळे धास्तावलेल्या माजी नगरसेवकांनी महायुतीची दारे ठोठावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेवर यंदा शुद्ध भगवा फडकेल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
चाळीस हजार कोटींहून अधिकचे अंदाजपत्रक असलेल्या मुंबई पालिकेवर गेल्या २५ वर्षांपासून उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे वर्चस्व आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने त्यांना स्वबळाची ताकद दाखवून घाम फोडला. भाजपचे ८२, तर अखंडित शिवसेनेचे ८४ नगरसेवक निवडून आले. भाजपने मनात आणले असते, तर त्यांचा महापौर विराजमान झाला असता. परंतु, युतीधर्माखातर त्यांनी खुर्ची सोडण्याचे औदार्य दाखवले. उद्धव ठाकरेंनी मात्र, २०१९ साली युतीधर्म तोडून त्याची परतफेड केली. त्याचा परिणाम भाजपवर न होता, उद्धव ठाकरेंवरच झाला. पक्ष, चिन्ह आणि सत्ता गेली. उलट एकनाथ शिंदेंची शिवसेनाच खरी असल्याचे मतदारांनी लोकसभा आणि विधानसभेतही दाखवून दिले. ठाकरेंचे एकेक गड नेस्तनाभूत झाले. त्याचा मोठा फटका महापालिका निवडणुकीत सहन करावा लागणार आहे.
मुंबईकरांचा महायुतीला कौल
महापालिकेची रंगीत तालीम म्हणून विधानसभा निवडणुकीकडे पाहिले जाते. मुंबईकरांचा कौल कोणत्या दिशेला आहे, हे या निवडणुकीने दाखवून दिले. महायुतीचे २२ आमदार निवडून आले. त्यात भाजपचे १५, शिवसेना (शिंदे) सहा आणि राष्ट्रवादीच्या एका जागेचा समावेश आहे. तर, मविआला केवळ १४ जागा मिळाल्या. त्यातील दहा उबाठा, तीन काँग्रेस आणि एक सपाची आहे. शरद पवारांना भोपळा फोडता आलेला नाही. विशेष म्हणजे ठाकरेंना मिळालेल्या दहा पैकी सात या काठावर निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे तेथील परिस्थितीही त्यांना फारशी अनुकूल नाही.
काँग्रेस, शरद पवारांची ताकद किती?
काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत मुंबईत ११ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी केवळ तीन (विद्यमान आमदार असलेल्या) जागा त्यांना राखता आल्या. कधीकाळी मुंबईत दबदबा असलेल्या काँग्रेसची आतापर्यंतची ही सर्वात वाईट कामगिरी आहे. दलित, मुस्लीम आणि हिंदी भाषकांवरील काँग्रेसचा प्रभाव ओसरल्याचे हे निदर्शक आहे. दुसरे म्हणजे, मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा उफाळू लागली आहे. त्यामुळे अनेक नेते कूस बदण्याच्या तयारीत आहेत. परिणामी, महापालिका निवडणुकीत काँग्रेसची ताकद आणखी क्षीण होईल. यंदाच्या विधानसभा निवडणुकीने शरद पवार यांचे अस्तित्व जवळपास पुसून टाकले आहे. त्यामुळे त्यांना पालिका निवडणुकीत किमान एक आकडी संख्या राखता आली, तरी ती जमेची बाजू ठरावी.
नवी ‘गळती’ रोखण्याचे आव्हान
दुसरे म्हणजे उबाठाच्या मुंबईतील ४५ माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाणे पसंत केले आहे. विधानसभेला शिंदे समर्थक आमदारांना आपापल्या जागा राखण्यात या माजी नगरसेवकांची मोठी मदत झाली. त्यामुळे भाजप पाठोपाठ शिंदे यांचाही महानगरातील प्रभाव नाकारून चालणार नाही. विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक कामगिरी करणार्या भाजपकडे मुंबईत ८२ माजी नगरसेवकांचे बळ आहे. शिवाय अन्य पक्षातील १३ हून अधिक माजी नगरसेवकांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. मुंबईत ५० हजार मतदारांचा एक प्रभाग असल्यामुळे प्रभावी संघटनशक्तीशिवाय विजय जवळपास अशक्य, ही बाब हेरून उबाठा गटातील काठावरचे नगरसेवक पक्षांतराच्या तयारीत दिसतात. त्यामुळे नवी ‘गळती’ रोखण्याचे आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे. या सर्व बाबींचा विचार करता, मुंबई महापालिकेवर यंदा शुद्ध भगवा फडकेल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.