कृतज्ञतेचा ‘एकच’ दिवस

    02-Dec-2024
Total Views | 27

THANKSGIVING
 
 
‘थँक्सगिव्हिंग डे’ म्हणजे अमेरिका आणि कॅनडासारख्या काही पाश्चिमात्य देशात, त्यांच्या दैवतांप्रती, नातेवाईकांप्रती आणि एकंदरीत लाभलेल्या आयुष्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणारा दिवस. दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी, पाश्चिमात्य देशांमध्ये ‘थँक्सगिव्हिंग डे’ साजरा केला जातो. यावर्षी दि. २८ नोव्हेंबर रोजी ‘थँक्सगिविंग डे’ साजरा झाला.
 
हा दिवस साजरा करण्याची सुरुवात १७व्या शतकात झाली. १६२० सालामधील युकेमधील ‘प्यूरिटन’ गटाने नवीन जगाच्या शोधासाठी आणि धार्मिक कारणांसाठी त्यांची जन्मभूमी सोडली आणि प्रवासाला सुरुवात केली. प्रवासादरम्यान अचानक आलेल्या वादळामुळे, त्यांना अपेक्षित ठिकाणी पोहोचता आले नाही. ते अमेरिकेमधील ‘प्लायमाउथ’ या ठिकाणी पोहोचले. ते दिवस प्रचंड थंडीचे असल्यामुळे, ‘प्लायमाउथ’ या ठिकाणी पोहोचलेल्या ‘प्यूरिटन’ गटातील लोकांना तिथे राहण्यासाठी आणि जगण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्यावेळी ‘प्लायमाउथ’ येथील मूळ रहिवाशांनी, त्यांना खूप मदत केली आणि जगण्यासाठी साहाय्य केले. ‘प्लायमाउथ’ येथील रहिवाशांनी त्यांना केलेल्या मदतीची जाणीव ठेऊन, ‘प्यूरिटन’ गटातील लोकांनी वर्षभराने त्यांना सामूहिक जेवणासाठी आमंत्रित करून, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तेव्हापासून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक दिवस म्हणून, अमेरिकादि देशांमध्ये दरवर्षी ‘थँक्सगिव्हिंग डे’ साजरा केला जातो. यादिवशी अमेरिकेमध्ये सार्वजनिक सुट्टी असते. सगळ्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना यादिवशी घरी आमंत्रित करून, सहभोजन केले जाते. या भोजनाला ‘थँक्सगिव्हिंग मील’ असे म्हटले जाते. या दिवशीच्या जेवणामध्ये ‘टर्की’ या पदार्थाला विशेष महत्त्व असते. ‘टर्की’सोबत इतरही अनेक गोष्टींना या दिवशी आहारात स्थान असते. यादिवशी एकत्र भेटून एकमेकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.
 
आपल्याकडे ‘थँक्सगिव्हिंग डे’ साजरा केला जात नाही. कारण,आपल्याकडे साजरा केला जाणारा प्रत्येक सण-उत्सव हा कृतज्ञता व्यक्त करणाराच असतो. पाश्चिमात्य देशांमध्ये एकत्र कुटुंबपद्धती नाही. तिकडे वयाच्या एका ठराविक वर्षी मुले त्यांच्या आई-वडिलांपासून वेगळे राहायला सुरुवात करतात. आपल्याकडे आहे तशी कुटुंबसंस्था त्यांच्याकडे अस्तित्वात नाही. त्यामुळे त्यांना एकत्र येण्यासाठी किंवा एकमेकांप्रती कृतज्ञता किंवा प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांना ‘थँक्सगिव्हिंगची’ वाट पाहावी लागते.
 
आपल्याकडे कुटुंबसंस्था अस्तित्वात आहे. आपल्या कुटुंबासोबत आपण जोडलेलो आहोत. त्यामुळे वर्षभर आपण एकत्र मिळून अनेक सण-उत्सव साजरे करत असतो. या सण-उत्सवांचा गाभाच मुळी कृतज्ञतेचा असतो. प्रत्येक सण-उत्सवांमध्ये आपल्यावर कृपा करणार्‍या, आपले रक्षण करणार्‍या देवीदेवतांची आपण पूजा तर करतोच आणि त्यांची पूजा करून, त्यांना आवडीची फुले वाहून, आवडीचा नैवेद्य दाखवून आपण त्यांच्याप्रती कृतज्ञता ही व्यक्त करतो. गणेशोत्सव, नवरात्रीपासून ते अगदी कुलदैवतापर्यंत आपल्यावर वरदहस्त असलेल्या प्रत्येक देवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे विविध सण-उत्सव साजरे केले जातात. देवी-देवतांसोबतच आपल्याला घडवणार्‍या, आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या नात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपला एक दिवस आहे. मग आईसाठी मातृदिन आहे, वडिलांसाठी पितृदिन आहे, भाऊ-बहिणींसाठी रक्षाबंधन आणि भाऊबीजेसारखे सण आहेत, गुरुसाठी गुरुपौर्णिमा आहे. इतकेच नाही, तर पितृपक्षाच्या निमित्ताने मृतव्यक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त करणे सुरूच ठेवतो. फक्त माणसांप्रतीच नाही, तर वर्षभर शेतात राबणार्‍या बैलांचे आपल्याकडे बैलपोळ्याच्या दिवशी आभार मानले जातात. नारळीपौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ वाहून, त्याचे आभार मानले जातात. दसर्‍याच्या दिवशी शस्त्रपूजाकरून आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडणार्‍या शस्त्रांप्रती, अवजारांप्रती आणि आताच्या काळात उपकरणांप्रतीही आभार व्यक्त केले जातात. ‘निसर्ग’ हा तर आपल्या सणांचा केंद्रबिंदूच आहे. त्यामुळे आपल्या सणातून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त होतेच.
 
वर्षाच्या सुरुवातीपासून ते वर्ष संपेपर्यंत आपल्याकडे असंख्य सण साजरे केले जातात. हे सण साजरे करण्याच्या पद्धती सर्वत्र वेगवेगळ्या आहेत. पण, या पद्धतींचा किंवा हे सण साजरे करण्यामागे एकच भावना असते, ती म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे. म्हणूनच भारतात वर्षभर थँक्सगिव्हिंग सुरुच असते म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही.
 
 
दिपाली कानसे
अग्रलेख
जरुर वाचा
तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

(PM Narendra Modi Old Post On Tahawwur Rana) २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला १० एप्रिल रोजी भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे.अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि दीर्घ कायदेशीर लढाईनंतर भारताला राणाचे प्रत्यार्पण करण्यात यश आले आहे.आता राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. न्यायालयाने तहव्वूर राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १४ वर्षे जुने ट्विट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121