सिंहस्थापूर्वी नाशिककरांना मोदी सरकारची भेट

निर्णयाचे नाशिककरांकडून स्वागत

    02-Dec-2024
Total Views | 41
Nashik

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळा नेत्रदिपक व्हावा, यासाठी मोदी सरकारकडून ( Modi Govt ) आश्वासक पावले उचलण्यात आली असून, प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीमधील गोदाघाट परिसरात राम काल पथ उभारणीला आर्थिक पाठबळ दिले आहे. त्याअनुषंगाने केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून नुकतेच सुमारे १०० कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ’एक्स’ हॅण्डलवर पोस्ट करत याबाबतची घोषणा करण्यात आली. गोदाघाट परिसरात होणार्‍या या प्रकल्पासाठी महापालिकेकडून सुरुवातीला ३०४ कोटींचा प्रकल्प आराखडा सादर करण्यात आला होता. राज्य शासनाच्या निर्देशांनंतर हा आराखडा २४८ कोटींचा करण्यात आला. त्यातच केंद्र शासनाकडून देण्यात येणार्‍या निधीला १०० कोटींची मर्यादा असल्याने हा प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये करण्याचा निर्णय घेण्याता आला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १४६ कोटी, तर उर्वरित कामासाठी दुसर्‍या टप्प्यात १०२ कोटी निधी खर्च केला जाणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील १४६ कोटींपैकी केंद्राकडून १०० कोटी, तर उर्वरित ४६ कोटी निधी राज्य शासन व महापालिकेमार्फत उभारला जाणार आहे. नाशिकच्या वैभवात भर घालण्यासाठी आणि नाशिकची पौराणिक ओळख देश-विदेशात पोहोचवण्यासाठी या प्रकल्पाचे मोठे योगदान राहणार आहे. त्यासंबंधी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आनंद व्यक्त केला असून, केंद्र शासनाचे आभार मानण्यात आले आहे. यावेळी शहरातील विविध मान्यवरांनी निर्णयाचे स्वागत करत दै. ‘मुंबई तरुण भारत’कडे प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

राम काल पथ प्रकल्पात नेमके काय?

या प्रकल्पामध्ये सीतागुंफा ते श्री काळाराम मंदिर आणि रामकुंड परिसराचे सुशोभीकरण केले जाणार आहे. यामध्ये अहिल्यादेवी होळकर पूल परिसर, गांधीतलाव, रामकुंड व लगतच्या भागात पौराणिक अनुभूती नाशिककरांना घेता येईल, अशाप्रकारचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तसेच रामकुंड परिसरात धनुर्धारी श्रीरामाची भव्य प्रतिकृती उभारण्याची योजना असल्याचेही सांगण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदींचे आभार"

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणीसाठी नाशिकमध्ये येणार्‍या देश-विदेशातील पर्यटकांना आणि भाविकांसाठी राम काल पथ हा प्रकल्प मुख्य आकर्षण ठरणार आहे. यातून नाशिकची पौराणिक ओळख अधोरेखित होणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीने नाशिक पर्यटनाबरोबरच धार्मिक पर्यटन केंद्र होण्यास हातभार लागणार आहे. प्रकल्प उभारणीसाठी मोदी सरकारने दिलेल्या आर्थिक पाठबळासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक आभार

प्रदीप पेशकार, प्रदेश प्रवक्ते, भाजप

स्थानिक भूमिपुत्रांना मिळणार रोजगार

केंद्राबरोबरच राज्यातील महायुती सरकारने नाशिकच्या विकासासाठी नेहमीच निधी देताना कोणतीच काटकसर केलेली नाही. त्यामुळे शहरात विविध विकासकामांना गती देण्यात आली. आता आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने नाशिककरांना दिलेली ही सर्वात मोठी भेट आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत गोदाघाट परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार असून, नाशिकच्या सौंदर्यात भर घातली जाणार आहे. तसेच पर्यटनालाही चालना मिळणार आहे. स्थानिक भूमिपुत्रांना यातून रोजगारही उपलब्ध होण्यास मदत होईल.

अ‍ॅड. राहुल ढिकले, नवनिर्वाचित आमदार, भाजप, नाशिक पूर्व

रामायणकालीन इतिहासाचे होणार जतन

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने मोदी सरकारने नाशिकच्या मंत्र भूमीसाठी 99.14 कोटींचा निधी विकास कामांसाठी दिला आहे. आध्यात्मिकदृष्ट्या देशभरात महत्त्वाचे शहर म्हणून नावलौकिक असलेल्या या शहराला भरघोस निधी देऊन नरेंद्र मोदी सरकारने मोलाचे सहकार्य केले आहे. ही बाब निश्चितच अभिनंदनीय आहे. या माध्यमांमधून अनेक जुन्या स्मृतींना उजाळा मिळेल व रामायणकालीन इतिहास जतन होईल. यामुळे स्थानिक रोजगार वाढतील व पर्यटनाला चालना मिळेल.

प्रशांत जाधव, अध्यक्ष, भाजप नाशिक महानगर जिल्हा

नाशिकच्या सौंदर्यात आणि विकासात पडणार भर

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथे होणार्‍या ‘राम काल पथा’साठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो. यासोबतच विश्वविख्यात ‘काळाराम मंदिर विश्वस्त संस्थे’साठी धर्मशाळा, भोजनालय आणि गोशाळा हे प्रकल्पदेखील उभारण्यासाठी या प्रकल्पात समाविष्ट करण्यात यावे. त्यासाठीचे पत्रदेखील पंतप्रधानांना देण्यात आले आहे. या प्रकल्पाने नाशिकच्या सौंदर्यात भर पडणार असून, विकासात भर घातली जाणार आहे. या प्रकल्पासाठी निधी उपल्ब्ध करुन देण्यासाठी पुनश्च पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद.

महंत सुधीरदास, मुख्य पुजारी, श्री काळाराम मंदीर

रामायणकालीन पाऊलखुणा जपल्या जाव्यात

सदर प्रकल्प उभारणीसाठी केंद्र सरकारने दिलेल्या निधीसाठी केंद्राचे आभार आणि स्वागत. प्रभू श्रीराम यांच्या कालखंडातील ज्या काही पाऊलखुणा आहेत, त्याचाही विकास केला पाहिजे. तसेच वेगवेगळे गॅझेटर आणि भूमी अभिलेख कार्यालयाच्या दप्तरी उल्लेख असलेल्या ठिकाणांचाही राम काल पथ निर्माण करताना विकास करण्यात यावा. तसेच रामायण कालीन पाऊलखुणांचाही विकास करण्यात आला पाहिजे. प्रकल्प उभारताना शाश्वत आणि पर्यावरणपूरक विकास करण्यात यावा.

देवांग जानी, अध्यक्ष, गोदाप्रेमी सेवा समिती

हिंदू संस्कृतीची जीवनमूल्ये जपली जाणार

२०१४ साली पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी राम सर्कीट नावाची योजना सुरु केली. त्याबरोबरच आता घोषित केलेल्या ‘राम काल पथ प्रकल्पा’मुळे हिंदू संस्कृतीची जीवनमूल्ये जपली जाणार आहे. श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकचा ‘राम काल पथा’मुळे कायापालट होणार आहे. सीमामातेचे स्थान असलेल्या सीतामढीपासून प्रभू श्रीराम वनवासाला निघालेल्या ठिकाणापासून प्रत्येक ठिकाणी जेथे प्रभू श्रीराम यांनी वास्तव्य केले, त्या सर्व स्थळांचा विकास करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी मदत दिली. त्यात नाशिकचाही समावेश आहे. हिंदू समाज आणि हिंदू संस्कृतीचे जीवनमूल्य असलेल्या श्रद्धा, विश्वास आणि आस्थेला भगवान महटले जाते. त्यांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने चांगले पाऊल उचलले असून, यातून चांगले काम होणार आहे. त्यातून नाशिकला धार्मिक वैभव प्राप्त होईल.
 
दिनेशचंद्र, केंद्रीय मार्गदर्शक, विश्व हिंदू परिषद

धर्माच्या बाबतीत केलेला विचार स्वागतार्ह

प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत त्यांच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. तसेच रामकुंडाबरोबरच गोदेच्या किनारी असलेल्या कुंडांना नावे देणे, त्याचबरोबर त्यांना जुन्या आकारांमध्ये आणण्याबरोबरच प्रभू श्रीराम यांच्या संबंधी असलेल्या आठवणी सत्यात उतरणार आहे. त्यामुळे येणार्‍या पिढीला त्यामधून प्रेरणा मिळणार आहे. नाशिकसाठी हा निधी केंद्र सरकारने देऊन धर्माच्या बाबतीत केलेला विचार अगदी स्वागतार्ह आहे.

राजेंद्र फड, प्रसिद्धीप्रमुख, रामतीर्थ गोदावरी सेवा समिती

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121