मुंबई : सरकार स्थापन करताना गावाला यायचे नाही? असा काही नियम आहे का? मी नेहमी गावी येत असतो. निवडणुकीत एवढे दौरे आणि प्रचार झाले. निवडणूक आम्ही महायुती मोठ्या मताधिक्यांनी जिंकलो, अशी माहिती राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील दरेगावी गेल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. त्याला शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. ते पुढे म्हणाले की, मी नेहमी सांगायचो की, जनता आम्हाला कामाची पावती देईल. महाविकास आघाडीने अडीच वर्षाच्या कार्यकाळात कामे थांबवली होती. ते आम्ही वेगाने पुढे नेले. तसेच, विकास आणि कल्याणकारी योजना आपण पाहिल्या तर लाडकी बहीण योजना असेल, मुलींचे शिक्षण असेल, शेतकर्यांच्या योजना असतील, अशा अनेक योजना आम्ही आणल्या. इतिहासात कधीही न झालेल्या योजना आम्ही आणल्या. या योजना महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिल्या जातील, असे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री यांनी सांगितले. तसेच, आमचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार होते. मीदेखील एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहे. त्यामुळे मी गावी येत असतो, मला गावी आल्यानंतर आनंद मिळतो, असे एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी सांगितले.
महायुतीच्या बैठकीत चर्चा करून अंतिम निर्णय घेणार
“गृहमंत्रिपदासह सर्व विषयांवर महायुतीच्या बैठकीत चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ,” असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. जनतेच्या मनात आणि मी कॉमन मॅन म्हणून काम केले. मी म्हणायचो की मुख्यमंत्री नाही तर कॉमन मॅन आहे. कॉमन मॅन म्हणून काम केल्यामुळे तशा भावना सर्वसामान्य माणसांच्या आहेत.
“मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृत्वात निवडणुका झाल्या. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्व सहकारीसोबत होते. मात्र, यामध्ये संभ्रम नको. त्यामुळे गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेतली. तेव्हा मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह घेतील त्याला पाठिंबा असेल हे स्पष्ट केले,” असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.