ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात याआधीही मोठा भाऊ असलेल्या भाजपने १८ पैकी नऊ जागा जिंकून ठाणे ( Thane ) जिल्ह्यात पुन्हा एकदा भाजपच मोठा भाऊ असल्याचे सिद्ध केले आहे. २०१९ सालच्या तुलनेत भाजपने एक अतिरिक्त जागा जिंकली असून, एकूण झालेल्या मतदानाच्या ५६ टक्क्यांपैकी २६ टक्के मते भाजपच्या पारड्यात पडली आहेत. तर, जिल्ह्यात २० टक्के मते मिळवून शिवसेना दुसर्या स्थानी आहे.
१८ पैकी नऊ जागा लढवून भाजपने १० लाख, ३४ हजार, १०५ मते मिळविली असल्याने जिल्ह्यात भाजपच्या कमळाचा जनाधार वाढताना दिसत आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या ठाणे जिल्ह्यात ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवाडा, मिरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, कल्याण ग्रामीण, कळवा-मुंब्रा, डोंबिवली, कल्याण पूर्व, उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण पश्चिम, भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, भिवंडी ग्रामीण, शहापूर आणि मुरबाड या १८ विधानसभेच्या जागा आहेत.
जिल्ह्यात ३८ लाख, ४५ हजार, ४२ पुरुष आणि ३३ लाख, ८२ हजार, ८८२ महिला असे एकूण ७२ लाख, २९ हजार, ३३९ मतदार असले तरी एकूण १९ लाख, ३१ हजार, ९७३ महिला आणि पुरुष २१ लाख, ८३ हजार, ५११ असे एकूण ४१ लाख, १५ हजार, ७५७ मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला. २०१९ सालच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला सहा तर भाजपने आठ जागांवर विजय मिळविला होता. तर, २०२४ च्या निवडणुकीत भाजपने नऊ जागा लढवून सर्व जागा जिंकल्या आहेत. यात भिवंडी (पश्चिम) मधून भाजपच्या महेश चौगुले यांनी ७० हजार, १७२ मते, मुरबाडमधून किसन कथोरे यांना १ लाख, ७५ हजार, ५०९, उल्हासनगरात कुमार आयलानींना ८२ हजार, २३१, कल्याण पूर्वेच्या गडात सुलभा गायकवाड यांना ८१ हजार, ५१६, डोंबिवलीत मंत्री रविंद्र चव्हाण १ लाख, २३ हजार, ८१५, मिरा-भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता यांना १ लाख, ४४ हजार, ३७६, ठाणे मतदारसंघात हॅट्ट्रिक करणारे संजय केळकर यांना १ लाख, २० हजार, ३७३, ऐरोलीमधून निर्विवाद यश मिळवणार्या गणेश नाईक यांनी १ लाख, ४४ हजार, २६१ आणि बेलापूर मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी ९१ हजार, ८५२ मतांची बेगमी करीत राष्ट्रवादीच्या संदीप नाईक यांच्यावर ३७७ मतांनी निसटता विजय मिळवला. यानुसार, जिल्ह्यात भाजपला १० लाख, ३४ हजार, १०५ एकूण मते मिळाली आहेत. शिवसेनेने सात जागा लढवून ८ लाख, ३९ हजार, ५९५ मते मिळाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.