नवी दिल्ली : “दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही. आम्ही स्वबळावर निवडणुका लढवू,” असे रविवार दि. १ डिसेंबर रोजी ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दिल्लीतील त्यांनी ‘इंडी’ आघाडीला धक्का देत ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. आता येथील विधानसभा निवडणूक तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपविरोधी इंडी आघाडीमध्ये एकूण २६ पक्ष आहेत. आघाडीने दिल्लीत लोकसभा निवडणूक एकत्र लढवली होती. मात्र, सर्वच जागांवर भाजपने विजय मिळवला होता. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात एकत्र येईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, आता केजरीवाल यांनी स्वबळावर निवडणुका लढविण्याची घोषणा केल्याने ‘इंडी’ आघाडीला धक्का बसला आहे. २०२४ लोकसभा निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांनी पंजाबमध्ये काँग्रेससोबत युती नाकारली होती. तसेच, हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि आपची आघाडी झाली नव्हती.