‘फेक नॅरेटिव्ह’ला ‘ब्रेक’ लावण्यासाठी पिंजून काढल्या ७८ विधानसभा

आमदार अमित गोरखे यांची ‘बहुजन संवाद यात्रा’ ठरली निर्णायक

    02-Dec-2024
Total Views | 83
Amit Gorakhe

लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाच्या नॅरेटिव्हमुळे भाजप महायुतीला मोठा फटका सहन करावा. या नॅरेटिव्हला ( Fake Narrative ) ‘ब्रेक’ लावण्याची जबाबदारी भाजपने आमदारअमित गोरखे यांच्यावर दिली. त्यांनी राज्यभरात ‘बहुजन संवाद यात्रा’ काढत काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या खोट्या प्रचाराची पोलखोल केली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मतदारांनी सजग होत महायुतीला कौल दिला. जनमत बदलण्यासाठी फायदेशीर ठरलेल्या या यात्रेविषयी आमदार अमित गोरखे यांच्याशी साधलेला विशेष संवाद...

अनेक खडतर वाटा पार करीत तुम्ही इथपर्यंत पोहोचला आहात. तुमची यशोगाथा तरुण पीढीसाठी मार्गदर्शक ठरणारी आहे. त्यामुळे तुमच्या जीवन प्रवासाविषयी जाणून घ्यायला वाचकांना आवडेल.

वर्तमानपत्र विक्रेता ते आमदार, असा माझा राजकीय प्रवास राहिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारानुसार काम करीत आयुष्यात विविध टप्पे गाठले. २०१० सालापासून भाजपमध्ये सक्रीय झालो. माझे नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत काम करण्याची संधी दिली. मी ज्या समाजातून येतो, त्या मातंग समाजाला आजवर विधानपरिषद किंवा राज्यसभेत प्रतिनिधित्व मिळाले नव्हते. इतिहासात पहिल्यांदा माझ्या निमित्ताने मातंग समाजाला प्रतिनिधित्व मिळाले. भाजपच्या या कृतीची केवळ सत्ताधारीच नव्हे, तर काँग्रेस आणि शरद पवार पक्षातील नेत्यांनीही प्रशंसा केली. ज्यादिवशी मी शपथ घेतली, त्यादिवशी संपूर्ण राज्यभरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भाजपने मला दिलेली आमदारकी हा मातंग समाजाचा गौरव आहे.

विरोधकांच्या ‘फेक नॅरेटिव्ह’ला ‘ब्रेक’ लावण्यासाठी तुम्ही ‘बहुजन संवाद यात्रा’ काढली, विधानसभा निवडणुकीत तिचा फायदा कसा झाला?

मी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर पक्ष नेतृत्त्वाने मला समाजात जाऊन संविधान बदलाच्या ‘खोट्या नॅरेटिव्ह’ची पोलखोल करण्याची सूचना केली होती. त्यानुसार मी बहुजन संवाद यात्रेची आखणी केली. २२ पेक्षा अधिक जिल्हे, ७८ मतदारसंघ मी पिंजून काढले. ज्या जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जातींचा प्रभाव आहे, तेथील छोट्या छोट्या वस्त्यांमध्ये जाऊन संवाद साधणे, त्यांच्या अडचणी जाणून घेण्यास मी सुरुवात केली. त्याला सर्वसामान्यांचा जो प्रतिसाद मिळाला, ते पाहून मीही अचंबित झालो. दोन महिन्यांत ३० हजार किमीहून अधिक माझा प्रवास झाला. काँग्रेस आणि महाविकास आघाडीने लोकांना भ्रमित केले होते, भाजप संविधान बदलेल, असा खोटा प्रचार केला होता. मी लोकांसमोर वस्तुस्थिती मांडली. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वेळोवेळी केलेली अवहेलना मुद्द्यांसहित पटवून दिली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत लोकांनी सजग होत मतदान केले.

‘अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ’ हे आठ वर्षे भ्रष्टाचारामुळे बंद होते. तुम्ही ही संस्था रुळावर आणलीत. आता भाजपच्या माध्यमातून मातंग समाजाला बळ देण्यासाठी या महामंडळाचा वापर कशापद्धतीने होत आहे?

मला फार कमी वेळ या महामंडळाचे अध्यक्षपद मिळाले. या अल्प काळात मी ‘अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळा’चा संपूर्ण कारभार ऑनलाईन आणला. त्याआधी अर्ज घेण्यासाठीही भ्रष्टाचार व्हायचा. ३० रुपयांच्या अर्जासाठी तीन हजार रुपये घेतले जात होते. ऑनलाईनमुळे हे प्रकार बंद झाले. दिल्लीतून सहकार्य मिळायचे नाही, ते माझ्या काळात पाठपुरावा करून सुरू केले. येत्या काळात या महामंडळासाठी एक हजार कोटींचा निधी मिळवून देण्यासाठी माझा प्रयत्न असेल. ‘बार्टी’च्या धर्तीवर ‘आर्टी’ अर्थात ‘अण्णाभाऊ साठे शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थे’ची निर्मिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आम्हाला करता आली. माझ्या आमदारकीच्या कारकीर्दीत सोनेरी अक्षराने लिहावे, असे हे काम आहे.

मातंग समाजातून आजवर एकही ‘आयएएस’ अधिकारी झालेला नाही. मातंगांचा भारतीय प्रशासकीय सेवेतील सहभाग वाढवण्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न करीत आहात. या उपक्रमाबद्दल थोडक्यात माहिती.

माझ्या संवाद यात्रेदरम्यान ‘आर्टी’बद्दल जनजागृती करण्यावर भर दिला. ही संस्था मातंग समाजासाठी एक शैक्षणिक हब म्हणून पुढे यावी, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. प्रत्येक जिल्ह्यातून किमान ५० मुले प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी तयार करावीत, असा आमचा हेतू आहे. त्यादृष्टीने मी प्रचार-प्रसार केला. माझ्या सहा वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळात ‘आर्टी’च्या माध्यमातून किमान ६० आयएएस अधिकारी व्हावेत, असा दृढनिश्चय मी केला आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121