नवी दिल्ली : (Uttarakhand) “उत्तराखंडमध्ये जानेवारी २०२५ पासून ‘समान नागरी कायदा’ लागू करण्यात येणार आहे,” अशी माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी बुधवार, दि. १८ डिसेंबर रोजी दिली.
डेहराडूनमध्ये उत्तराखंड गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा विकास मंडळाच्या बैठकीत धामी म्हणाले की “राज्य सरकारने आपला ‘गृहपाठ’ पूर्ण केला आहे आणि जानेवारी २०२५ पासून ‘समान नागरी कायदा’ राज्यभर लागू केला जाणार आहे.
उत्तराखंडचा ‘समान नागरी कायदा’ ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या मूळ भावनेतून समाजाला नवी दिशा देईल. या कायद्यामुळे विशेषतः देवभूमीतील महिला आणि बालकांसाठी सक्षमीकरणाची नवी दारे उघडली जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘समान नागरी कायदा’ लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरेल,” असे धामी म्हणाले.
“समान नागरी कायद्या’साठी उत्तराखंड हे आदर्श उदाहरण ठरणार आहे. याद्वारे समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार मिळणार असून समाजात सामाजिक न्याय आणि समानतेची भावना मजबूत होईल,” असा विश्वासदेखील धामी यांनी व्यक्त केला.