"महाराष्ट्राला बेळगाव हवं असेल तर मुंबई कर्नाटकला द्या"; काँग्रेस आमदाराने तोडले अकलेचे तारे!
19-Dec-2024
Total Views | 53
बंगळूरु : (Congress MLA Laxman Savadi) काँग्रेस आमदार लक्ष्मण सवदी यांनी बेळगावात सुरू असलेल्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये उत्तर कर्नाटकावर चर्चा होत असताना अचानक बेळगावसह मुंबईलाही केंद्रशासित करण्याची मागणी केली. अधिवेशनाच्या उत्तरार्धात उत्तर कर्नाटकातील समस्या आणि विकासावर चर्चा सुरू असताना आमदार सवदींनी ही मागणी केली आहे.
काय म्हणाले आमदार सवदी ?
"परवा महाराष्ट्रातील बुद्धिभ्रष्ट झालेल्या एका नेत्याने बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करावा, असे वक्तव्य केले होते. यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी आम्हाला प्रश्न विचारला असता संबंधित नेत्याची मती भ्रष्ट झाल्याचे मी स्पष्टपणे सांगितले. अश्या पद्धतीने जर कर्नाटकचा अविभाज्य अंग असलेला बेळगाव सीमाभाग केंद्रशासित करायचा असेल तर मुंबईदेखील केंद्रशासित करावी", अशी बिनबुडाची मागणी केली.
"आमचाही मुंबईवर अधिकार आहे"
"आमचे पूर्वज मुंबईत वास्तव्यात होते. त्यामुळे आमचाही मुंबईवर अधिकार आहे. पूर्वी बेळगावसह अन्य सहा जिल्हे मुंबई प्रांतांचा भाग असताना आमचे कर्नाटकातील लोक मुंबईला जात होते. त्या ठिकाणी वास्तव्यास होते आणि ही बाब लक्षात घेता आमचा मुंबईवर हक्क आहे. त्यामुळे प्रथम मुंबई केंद्रशासित केली जावी आणि तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात यावा", असे सदनासमोर बोलताना लक्ष्मण सवदी म्हणाले.
"महाराष्ट्राला बेळगाव हवं असेल तर मुंबई कर्नाटकला द्या"
एवढ्यावरच न थांबता "महाराष्ट्राला बेळगाव हवं असेल तर त्या बदल्यात आमच्या पूर्वजांनी राज्य केलेली मुंबई कर्नाटकला द्या." असा अजब सल्लाही आमदार सवदींनी दिला.
आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहून केली होती मागणी
आठवड्याभरापूर्वी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून बेळगाव-कारवारला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली होती. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं की, "आपल्याला माहीत असल्याप्रमाणे बेळगाव आणि कारवारचा प्रश्न गंभीर होत आहे. या प्रश्नी मराठी माणसांना न्याय देणे किती गरजेचे आहे हे आपण जाणताच. बेळगाव कारवार प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे. मी आपणास कळकळीची विनंती करत आहे की बेळगांव कारवार प्रश्नी आपण मराठी माणसाला न्याव द्यावा. आपण सभागृहामध्ये मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी बेळगांव कारवार हा केंद्रशासित प्रदेश करण्याचा ठराव घ्यावा. आम्ही एक मताने या ठरावास पाठिंबा देऊ. बेळगाव केंद्रशासित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे लवकरात लवकर पाठवावा आणि बेळगाव केंद्रशासित करण्यासाठी प्रयत्न करावेत, ही विनंती.
आदित्य ठाकरेंची पोस्ट
याच संदर्भात आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्येही म्हटले होते की, बेळगावात होत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महाअधिवेशनाला कर्नाटक सरकारने परवानगी तर नाकारलीच, त्यावर बेळगावात संचारबंदीही लागू केली. सीमाही बंद केल्या जात आहेत. मराठी माणसांवरच्या या अन्यायाचा तीव्र निषेध! बेळगाव हा मराठी अस्मितेचा अविभाज्य भाग आहे आणि राहणारच! माझं कर्नाटकातल्या सरकारला आवाहन आहे की त्यांनी मराठी माणसांवरचा हा अन्याय तातडीने थांबवावा! महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितापेक्षा मोठं काहीही नाही! आणि केंद्र सरकारकडे देखील मागणी आहे की हा सर्व विवादित भाग तातडीने केंद्रशासित करावा”
आमदार सवदींनी केलेल्या मागणीचा सीमाभागातून निषेध व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे, महाराष्ट्र विधिमंडळाच्या नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.