मुंबई (अक्षय मांडवकर) - संशोधकांनी रत्नागिरीच्या सड्यावरुन चारा म्हणून वापरात येणाऱ्या गवताच्या २० प्रजातींची नोंद केली असून ग्रामीण लोकजीवनात या प्रजाती महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे (sada grassland in ratnagiri). मात्र, या प्रजातींचा लोकजीवनातील पारंपरिक वापर कमी झाल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदवले आहे (sada grassland in ratnagiri). त्यामुळे भविष्यात सड्यावरील या गवताचा वापर उपजिविका निर्मितीसाठी कशा पद्धतीने केला जाऊ शकतो, याकडे देखील संशोधनाद्वारे लक्ष वेधले आहे. (sada grassland in ratnagiri)
रत्नागिरीच्या किनारपट्टीला लागून सड्यांचे विस्तीर्ण पट्टे पसरलेले आहेत. या सड्यावर पावसाळी हंगामात काही संकटग्रस्त प्रजाती उगवतात, तर ऑगस्ट-सप्टेंबरपासून गवताचे प्राबल्य वाढत जाते. ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून हे गवत सुकण्यास सुरुवात होते. रत्नागिरीतील राजापूरच्या कातळ सड्यांवर गवताच्या कोणत्या प्रजाती आढळतात, त्यांचे पारंपरिक उपयोग, त्यांच्या वापरात झालेले बदल अशा बाबींच्या अभ्यास ‘बॉम्बे इन्व्हार्यमेंटल अॅक्शन ग्रुप’ आणि ‘आघारकर संशोधन संस्थे’च्या ‘बायोडाव्हर्सिटी अॅण्ड पॅलेओबायोलॉजी ग्रुप’मधील संशोधकांनी केला. यामध्ये पूजा घाटे, भूषण शिगवण, सारंग बोकील आणि अपर्णा वाटवे या संशोधकांचा समावेश आहे. यासंबंधीचे संशोधन वृत्त नुकतेच ‘जर्नल ऑफ इकोलॉजिकल सोसायटी’ या नियतकालिकामध्ये प्रकाशित झाले आहे. संशोधकांनी राजापूर तालुक्यामधील कशेळी, बकाळे, देवाचे गोठणे, रुंधे आणि देवीहसोळ येथील सड्यांवर सर्वेक्षणाचे काम केले. यामध्ये स्थानिकांच्या मुलाखती घेऊन चार्यासाठी वापरात येणार्या निरनिराळ्या प्रजातींच्या पारंपरिक वापरासंदर्भात माहिती घेण्यात आली. या प्रजातीचे फुलणे, पोत, रंग, स्वरूप यावरून स्थानिक लोक त्यांना कसे ओळखतात, ही माहितीदेखील नोंदविण्यात आली. तसेच चार्याचे मूल्य, हंगामी पसंती, गवताचे इतर उपयोग आणि साठवणुकीच्या पद्धती याविषयीच्या माहितीचेदेखील संग्रहण करण्यात आले.
सड्यांवर उगवणार्या गवताच्या प्रजातींचा वापर हा प्रामुख्याने पशुसंवर्धन, घर शाकारणी, राबशेती आणि फलोत्पादनात केला जातो. संशोधकांनी नोंदवलेल्या २० प्रजातींपैकी करडी (Apluda mutica), गवतील (Ishaemum ciliare), करपील (Ishaemum ritchiei), तांबील (Ishaemum semisagittatum), काटवळ, बोंगराट, गोंडियाळ (Pseudanthistiria umbellata) आणि कुडशी, डोंगयाळ (themaeda spp) या गवत प्रजाती गुरांच्या सर्वाधिक पसंतीच्या असल्याचे समोर आले आहे. यामधील करडी आणि काटवळ या प्रजातींना स्थानिक गावकरी गोंडेदार फुलोरामुळे ओळखतात. पशुवैद्यकांनुसार ओल्या गवतामध्ये अधिक पौष्टिक मूल्य असते. यामधील उच्च जीवनसत्व ‘अ’ आणि खनिजांमुळे गुरांच्या दुधाचे उत्पादन वाढते. त्यामुळे चारा म्हणून हिरवे गवत पसंतीचे असले तरी, डायमेरिया कुळातील पांढरी करडी गवताला जानेवारीनंतर गुरे खातात. कारण, दव पडल्यानंतर हे गवत मऊ पडते आणि खायला सोपे जाते. हेच गवत जास्त करून आंब्याच्या पेट्यांमध्ये भरण्यासाठीदेखील वापरले जात असल्याची नोंद संशोधकांनी केली आहे. या सर्व प्रजातींची छायाचित्र संशोधकांनी डिजिटल हर्बेरियम स्वरुपात ‘आय-नॅचरलिस्ट’ या संकेतस्थळावर संग्रहित केली आहेत.
गुरांच्या संख्येत लक्षणीय घट
महाराष्ट्र सरकारच्या २०१९ सालच्या पशुगणनेनुसार रत्नागिरीतील गुरांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे चार्यासाठी गवत प्रजातींचा पारंपरिक वापरदेखील कमी झाला आहे. गवत विक्रीमधून कमी उत्पन्न मिळते. गवत कापण्याच्या मजुरांना जास्त रोजंदारी द्यावी लागते. त्यामुळे सड्यांवरील गवताच्या भविष्यातील व्यवस्थापनामध्ये कंपोस्टिंग किंवा जैवइंधन उत्पादनाची चाचणी घेणे आवश्यक आहे. तसेच, महाराष्ट्रातील दुष्काळी भाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसायाकरिता या गवताचा पुरवठा करून उपाजीविकानिर्मिती कशी केली जाऊ शकते, याचादेखील विचार करणे आवश्यक आहे. - पूजा घाटे, संशोधक
'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.