ठाणे : भावी सनदी अधिकाऱ्यांसाठी पालिकेतर्फे मुलाखतींचे सराव प्रशिक्षण
भावी सनदी अधिकाऱ्यांसाठी ठाणे पालिकेची सुविधा
19-Dec-2024
Total Views | 17
ठाणे : भावी सनदी अधिकाऱ्यांसाठी ठाणे महापालिका सरसावली आहे. ठामपा संचालित चिंतामणराव (सी.डी.) देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सन २०२४ मधील मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जानेवारी २०२५ मध्ये दोन दिवसीय 'प्रतिरूप मुलाखत (मॉक इंटरव्ह्यु)' सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी २६ डिसेंबर पर्यत नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत १६ जून रोजी यूपीएससी पूर्व परीक्षा-२०२४ आयोजित करण्यात आली होती. तर, २० ते २९ सप्टेंबर या काळात यूपीएससीची मुख्य परीक्षा झाली. या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होऊन अंतिम मुलाखतीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांसाठी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमार्फत, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार, दोन दिवसीय 'प्रतिरूप मुलाखतीचे आयोजन केले आहे. या मुलाखती राज्याचे सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव के.पी.बक्षी, ठामपा आयुक्त सौरभ राव, लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, कमांडंट श्रध्दा पांडे,आयपीएस अधिकारी मोक्षदा पाटील, डिआरआय अति. संचालक राजलक्ष्मी कदम, कस्टम उपायुक्त अक्षय पाटील, नेहा निकम,प्रा. डॉ मृदुल निळे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक भूषण देशमुख हे तज्ञ घेणार आहेत.
अशी करा नोंदणी
या प्रतिरुप मुलाखतीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी संस्थेच्या cdinstitute@thanecity.gov.in या ई-मेलवर आपले DAF-2 ॲप्लीकेशन सादर करावे. संस्थेमार्फत विद्यार्थ्यांच्या DAF-2 ॲप्लीकेशनचे संस्थेच्या तज्ज्ञ प्रशिक्षकाकडून विश्लेषण करण्यात येईल. अधिक माहितीसाठी संस्थेच्या २५८८१४२१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे संचालक महादेव जगताप यांनी केले आहे.