नागपूर : (Congress) लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अत्यंत टोकाची टीका केल्यानंतरही 'उबाठा' गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांचे अभिनंदन केले. या भेटीमागचे तर्क मांडताना राजकीय विश्लेषकांची दमछाक होत असताना, काँग्रेसच्या गोटातही ठाकरे-फडणवीस भेटीमुळे प्रचंड अस्वस्थता पसरल्याचे दिसून येत आहे.
नागपुरच्या गुलाबी थंडीत सुरू असलेले हिवाळी अधिवेशन ऐन रंगात आले असताना, काँग्रेस आमदार मात्र दोन दिवसांपासून चिंतेत आहेत. काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड होत नाही, प्रतोद निवडला जात नाही, त्यात उद्धव ठाकरे एकाएकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतात. या बदलत्या राजकीय समीकरणांची जणू धास्ती घेतली असावी, असेच वातावरण काँग्रेसच्या गोटात आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांची भेट घेणाऱ्या उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडे पाहणेही टाळले. त्यामुळे ठाकरेंच्या मनात नेमके काय सुरू आहे, असाही प्रश्न काँग्रेस आमदारांना पडल्याचे चित्र आहे.
नाना पटोलेंची भेट टाळली
मंगळवार, दि. डिसेंबर रोजी दुपारी उद्धव ठाकरेंनी मुख्यंत्री आणि विधानसभा अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर ते विधिमंडळाबाहेर पडत असताना, नाना पटोले वाटेत (काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर) उभे होते. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष या नात्याने उद्धव ठाकरे आपल्याशी संवाद साधतील, हस्तांदोलन करतील, अशी अपेक्षा त्यांना होती. पण, हस्तांदोलन सोडा उद्धव ठाकरेंनी पटोलेंकडे पाहणेही टाळले. दुसरे म्हणजे बीड आणि परभणीच्या मुद्द्यावरून काँग्रेसने सभात्याग केला असताना, 'उबाठा' गटाचे आमदार मात्र सभागृहात बसून राहिले. त्यामुळे महाविकास आघाडीत सारे काही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.