एका नऊ वर्षीय मुलाने अवघ्या तीन वर्षीय मुलीवर केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने पुण्यातील कोंढवा परिसर रविवारी हादरुन गेला. पण, त्याहीपेक्षा धक्कादायक बाब म्हणजे, सोशल मीडियाच्या प्रभावाखाली हे दुष्कृत्य केल्याची त्या इयत्ता तिसरीत शिकणार्या मुलाने दिलेली कबुली! यानिमित्ताने मुलांकडून होणारा सोशल मीडियाचा गैरवापर आणि कठोर निर्बंधांची आवश्यकता पुनश्च अधोरेखित झाली आहे.
बाळपणींचा काळ सुखाचा, आठवतो घडी घडी...
तशी नये फिरून कधी घडी
‘शारदा’ नाटकातील गो. ब. देवल यांच्या गीताच्या वरील पंक्ती. लहानपणीचा काळ हा किती सुखाचा, आनंदाचा आणि खेळांमध्ये मनमुराद रममाण होण्याचा होता, त्या स्मृती जागवणारे हे गीत. पण, समाजातील सद्यस्थिती पाहता, ‘बाळपणींचा काळ धोक्याचा’ असेच मुलांना आणि त्यांच्या पालकांनाही म्हणण्याची दुर्दैवाने वेळ आली आहे. त्याचे कारण म्हणजे, पुण्यातील बाललैंगिक अत्याचाराची गंभीर घटना. अशा घटनांचे एकूणच वाढते प्रमाण चिंताजनक असले तरी, कोंढव्याची घटना ही सर्वस्वी मन सुन्न करणारी म्हणावी लागेल. कारण, इथे कुणा प्रौढ व्यक्तीकडून नव्हे, तर अवघ्या नऊ वर्षांच्या मुलाकडून तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचाराचा हा घृणास्पद प्रकार उघडकीस आला. पण, त्याहूनही विचलित करणारी बाब म्हणजे, सोशल मीडियाच्या आहारी जाऊन हे दुष्कृत्य केल्याची त्या मुलाने चौकशीत दिलेली कबुली...
रविवारी दुपारी त्या मुलीच्या घराजवळच हा सगळा प्रकार घडला. मुलीने घरी येऊन पालकांना घडल्या प्रकाराची कल्पना दिली आणि पालकांनीही लगोलग यासंदर्भात पोलीस तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे, ही दोन्ही कुटुंबे एकमेकांच्या चांगलीच परिचयाची. ती चिमुरडी तर त्या मुलाला ‘दादा’ म्हणून हाक मारायची. त्याच दादाने सोशल मीडियाच्या प्रभावाखाली आपल्याच बहिणीसमान त्या कोवळ्या मुलीवर अत्याचार केला. ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत हे प्रकरण ‘बाल न्याय मंडळा’समोर गेले आणि त्या मुलाला जामीन मंंजूर करून त्याचा ताबा पालकांकडे देण्यात आला. या मुलाच्या चौकशीतील अधिक तपशील समोर आले नसले, तरी यानिमित्ताने सोशल मीडियाचा मुलांच्या मानसिकतेवर होणार्या गंभीर परिणामांचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
खरं तर यापूर्वीही सोशल मीडियाचे धोके, त्याचे मुलांवर होणारे शारीरिक, मानसिक आणि भावनिक पातळीवरील दुष्परिणाम सिद्ध झाले आहेत. त्यांची विविध पातळ्यांवर चर्चाही कानी पडते. अगदी घरापासून ते शाळांपर्यंत या समस्येने सगळ्यांनाच ग्रासलेले. त्यावर मुलांच्या हातात पालकांनी फोन न देणे, त्यांच्या सोशल मीडियावर वापरावर निर्बंध लादणे यांसारखे तात्पुरते उपायही चर्चिले जातात. पण, हा प्रश्न काही कुटुंबांपुरता, समाजापुरता, शैक्षणिक संस्थांपुरता मर्यादित राहिलेला नसून, त्याचा देशपातळीवर धोरणात्मक विचार करण्याची वेळ आली आहे.
ऑस्ट्रेलिया ़हा मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध लादणारा जगातील पहिला देश ठरला. 16 वर्षांखालील मुलांना तिथे सोशल मीडियाचा वापर करता येणार नसून, पुढील वर्षीपासून हा कायदा तिथे देशभरात लागू होईल. अन्य कुठल्याही देशांमध्ये सोशल मीडियाच्या वापरावर सरसकट बंदी नसली तरी, सोशल मीडियावरील नोंदणीचे वय, नोंदणीसाठीची पालकांची पूर्वपरवानगी वगैरेबाबत नियमावली अस्तित्वात आहेत. भारतात सध्या यासंदर्भात कोणतेही नियम अस्तित्वात नसले तरी ‘डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन अॅक्ट’च्या मसुद्यातील तरतुदीनुसार, 18 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियाच्या वापरापूर्वी पालकांकडून त्याचे प्रमाणीकरण करावे लागेल. या विधेयकाच्या मसुद्यावर सध्या सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील वर्षी हे विधेयक संसदेत पारित होण्याची शक्यताही आहे. पण, काही बालमानसोपचारतज्ज्ञांच्या मते, सोशल मीडियावरील निर्बंधांमुळे हा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागण्याची शक्यता तशी धूसरच. कारण, जे जे करू नको म्हणून सांगितले जाते, ते ते मुद्दाम करण्याकडे, अनुभवण्याकडे मुलांचा नैसर्गिक कल असतो. त्यामुळे सोशल मीडियावर सरसकट निर्बंध लादले गेले, तरी त्यातील पळवाटा शोधणे, पालकांच्या स्मार्टफोनमधून सोशल मीडियाचा वापर करणे, या प्रकारांवर आळा घालणे तसे कठीणच. त्यामुळे आजच्या आणि भावी पिढीलाही सोशल मीडियाच्या सकारात्मक वापरांविषयी, त्याच्या फायद्या-तोट्यांविषयी, सायबर धोक्यांविषयी रीतसर धडे द्यावे लागतील. केवळ मुलांच्याच पातळीवर नव्हे, तर शिक्षक, पालक यांच्यासाठीही सोशल मीडिया प्रशिक्षण तितकेच अत्यावश्यक. मुले हे पालकांच्याच अनुकरणातून बहुतांशी बर्या-वाईट सवयी आत्मसात करतात. तेव्हा, एक जबाबदार पालक म्हणूनही या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे. आपल्या मुलांना वाचनासह मैदानी खेळ, कराटे, पोहणे अथवा त्यांच्या आवडीनिवडींनुसार, कला-क्रीडाप्रकारांमध्ये गुंतवून ठेवण्याचा पर्यायही सोशल मीडिया, गेमिंगच्या ‘अॅडिक्शन’मधून त्यांना बाहेर काढणारा ठरू शकतो. त्यामुळे कुठेतरी पालकांनाही आजच्या पिढीच्या मुलांबरोबर अरेरावी, जोरजबरदस्ती न करता, सोशल मीडियाच्या वापराबाबत एकूणच सजग राहणे, ही काळाची गरज म्हणावी लागेल.
2023 साली केलेल्या एका सर्वेक्षणातील अंदाजानुसार, भारतात साधारण चार कोटींच्या आसपास मुलांकडून सोशल मीडियाचा वापर केला जातो. त्यातही वयवर्षे नऊ ते 17 दरम्यानची 60 टक्क्यांहून अधिक मुले दिवसातून तीन तासांपेक्षा अधिक वेळ सोशल मीडियाचा वापर करतात. यावरून सोशल मीडिया वापराची व्याप्ती लक्षात घ्यावी. त्यामुळे पालकांनी केवळ मुलांची साथसंगत नव्हे, तर त्यांच्या सोशल मीडिया वापरावरही लक्ष ठेवणे, हे आजच्या काळात क्रमप्राप्त. त्यासाठी आजच्या मुलांच्या कलानुसार घेणे, त्यांच्याशी नियमित संवाद साधणे, पाल्याशी मित्रत्वाचे नाते प्रस्थापित करणे आणि महत्त्वाचे म्हणजे, सोशल मीडियापेक्षा खर्याखुर्या समाजघटकांशी ऋणानुबंध प्रस्थापित करून समाजभान जपले, तर बालपणीचा काळ हा नक्कीच सुखाचा होईल!
मुलांच्या सोशल मीडिया वापराबाबतची ठळक निरीक्षणे
जगभरात 95 टक्के किशोरवयीन आणि 8-12 वयोगटातील 40 टक्के मुले सोशल मीडियाचे सक्रिय वापरकर्ते
73 टक्के भारतीय पालकांच्या मते, 18 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडियाच्या वापरासाठी पालकांची पूर्वपरवानगी अनिवार्य असावी.
9 ते 17 वयोगटातील महाराष्ट्रातील 17 टक्के आणि भारतातील 15 टक्के मुले सोशल मीडियाचा वापर 6 तासांपेक्षा अधिक वेळ करतात.
सोशल मीडियाचे मुलांवरील परिणाम महाराष्ट्र भारत (टक्क्यांत)
आक्रमकपणा 42 39
उतावळेपणा 38 37
आळशीपणा 31 27
अतिक्रियाशीलता 29 25
नैराश्य 24 22
आनंदी 11 08