मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Dattatray Hosbale Kannur Program) "सामुदायिक सहकार्याद्वारे समाजाची सर्वांगीण प्रगती साधणे, म्हणजेच समाजसेवेद्वारे गावांना स्वावलंबी बनवणे हेच भारताचे व्हिजन आहे." असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले. केरळच्या इलाक्कुझी (कन्नूर) येथे पजहस्सी राजा कल्चरल सेंटरचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान प्रत्येक गावाने सर्व क्षेत्रात स्वयंपूर्ण व्हावे, यावर सरकार्यवाहंनी विशेष भर दिला.
हे वाचलंत का? : सनातन धर्मातील आपलेपणा हाच विश्वाचा आधार
उपस्थितांना संबोधत पुढे ते म्हणाले, “सामुदायिक सहकार्याने समाजाची सर्वांगीण प्रगती साधणे हे आपले उद्दिष्ट आहे. अशी गावे भारताचा आत्मा आहेत आणि शतकानुशतके सततच्या प्रयत्नांतून ती टिकून आहेत. गावांचा विकास केवळ सरकारी आर्थिक मदतीवर अवलंबून नसावा. सरकारने मार्गदर्शन केले पाहिजे, परंतु मदतीवर सतत अवलंबून राहिल्याने गावे कमकुवत होतात. विकासाने केवळ भौतिक वाढीच्या पलीकडे जाऊन आध्यात्मिक आणि मानसिक प्रगतीचा समावेश केला पाहिजे,”
ग्रामीण भागातील सेवेचे महत्त्व यावर जोर देत पुढे ते म्हणाले, "भारत स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत असताना आणि अमृत कालच्या प्रवासाला सुरुवात करत असताना, नैसर्गिक आपत्ती आणि साथीच्या रोगांसारखी आव्हाने उभी राहिली आहेत. अशा काळात स्वयंसेवकांनी सक्रियपणे आणि सातत्याने ग्रामीण भागात सेवा करून समाजात आत्मविश्वास निर्माण केला आहे. स्वयंसेवकांची निःस्वार्थ सेवा आणि त्याग हे स्वामी विवेकानंदांनी भारताचे सार म्हणून ओळखले आहे."
कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर केरळ प्रांत संघचालक ॲड. के.के. बलराम, कन्नूर येथील माता अमृतानंदमयी मठाच्या प्रमुख स्वामी अमृता कृपानंदपुरी आदी मान्यवर उपस्थित होते.