मुंबई : (Ranjitsinh Mohite-Patil ) भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना अखेर पक्षाकडून पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या कृत्यांबाबत स्पष्टीकरण देण्यासंदर्भात कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसीमध्ये भारतीय जनता पक्षाचे जबाबदार प्रतिनिधी असूनही मोहिते पाटील यांनी पक्षशिस्तीचा भंग करणारे कृत्य वारंवार केल्याचे निदर्शनास आल्याने त्याबाबत अनेक विषयांचे निरीक्षण मांडण्यात आले आहे. तसेच सर्व विषय अतिशय गंभीर असल्याने यावर काही स्पष्टीकरण असल्यास ते पुढील सात दिवसांमध्ये लेखी स्वरुपात सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्यानावे ही नोटीस बजावण्यात आली आहे.
मोहिते पाटलांच्या पक्षविरोधी कृत्यांबाबत पक्षाकडून मांडण्यात आलेली निरीक्षणे :
१) देशाचे पंतप्रधान, नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रचारासाठी माळशिरस येथे आले असता सदर कार्यक्रमास अनुपस्थिती
२) लोकसभा निवडणूक काळात आपल्या परिवाराने भाजपच्या विरोधात काम केल्याचे निदर्शनास आले.
३) पत्रकार परिषदेत आपल्या परिवारातील सदस्यांनी भाजपच्या माढा आणि सोलापूर लोकसभेच्या जागा पाडण्यासंदर्भात जाहीर वक्तव्य केले.
४) आपल्या कार्यकत्यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपच्या बूथ प्रमुखांना धमकावणे, पोलिंग एजंट मिळू न देणे असे प्रकार केल्याचे निदर्शनात आले.
५) लोकसभा निवडणूक मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवाराची गळाभेट घेऊन माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेला भाजपविरोधी मतदानास प्रवृत्त केल्याचे निदर्शनास आले.
६) विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या परिवारातील सदस्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे मफलर गळ्यात घालून भाजपविरोधी काम केल्याचे निदर्शनास आले.
७) महायुतीच्या सरकारने ज्या शंकर सहकारी कारखान्यास आर्थिक मदत केली त्याच कारखान्यातील चिटबॉय कडून
आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा प्रचार केला तसेच कारखान्याच्या सिव्हिल विभागातील कर्मचाऱ्यांकडून सदाशिवनगर येथील रहिवाशांना घरोघरी आऊन राष्ट्रवादीच्या उमेदवारास ममादान करण्यास भाग पाडल्याचे निदर्शनास आले.
८) पोलिंग एजटला आपल्या कार्यकर्त्याकडून मारहाण झाल्याचे निदर्शनास आले आहे.
रणजितसिंह मोहिते पाटलांच्या या पक्षविरोधी कृत्यांमुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये माढा व माळशिरस येथील भाजप उमेदवारांना याचा चांगलाच फटका बसल्याने त्यांना पक्षातून बडतर्फ कऱण्याबाबत मोठ्या प्रमाणावर मागणी करण्यात आली होती. याची दखल घेत पक्षाने आता मोहिते पाटलांना ही नोटीस पाठवली आहे.