मुंबई (विशेष प्रतिनिधी) - नेपाळमधील गढीमाई उत्सवाकरिता पशुबळी देण्यासाठी चालेल्या ४०० जनावरांना सशस्त्र सीमा बल (एसएसबी) आणि बिहार सरकारने या प्राण्यांना ताब्यात घेतले होते. या प्राण्यांना कायमस्वरुपी निवारा देण्याचे काम 'वनतारा' (Vantara) प्रशासनाने केले आहे (Vantara).
अनंतर अंबानी यांच्या संकल्पनेमधून साकारलेल्या 'वनतारा'ने पशूसंवर्धनामध्ये अजून एक महत्त्वाचे कार्य केले आहे. नेपाळमध्ये पार पडणाऱ्या गढीमाई उत्सवासाठी उत्तर भारतातील राज्यांमधून अवैधरित्या मोठ्या संख्येने पशूधनाची वाहतूक होते. त्याठिकाणी या प्राण्यांचा बळी दिली जातो. भारत-नेपाळ सीमेजवळ आयोजित होणारा गढीमाई उत्सव हा जगातील सर्वात मोठा धार्मिक पशुबळी उत्सव म्हणून ओळखला जातो. २०१४ मध्ये या उत्सवात पाच लाखाहून अधिक प्राण्यांची कत्तल करण्यात आली होती. यातील बहुतेक प्राणी भारतातून बेकायदेशीरपणे नेण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि उत्तराखंडचा समावेश होता. सीमापार प्राण्यांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने अनेक निर्देश दिले आहेत. ज्यात निर्यात परवान्याशिवाय जनावरांच्या वाहतुकीवर बंदी आहे. तरीही जनावरांची बेकायदेशीर तस्करी सुरूच आहे.
'पीपल फॉर अॅनिमल्स' (पीएफए) आणि 'ह्यूमन सोसायटी इंटरनॅशनल' (एचएसआय) यांच्या मदतीने बिहार सरकार व सशस्त्र सीमा बलाने अशाच प्रकारच्या वाहतूकमधून सुमारे ४०० प्राण्यांचा बचाव केला. यामध्ये ७४ म्हशी आणि ३२६ शेळ्यांचा समावेश आहे. या सर्व प्राण्यांच्या संगोपनाची जबाबदारी वनताराने स्वीकारली आहे. या प्राण्यांनी अन्न आणि पाण्याशिवाय अनेक दिवस वाहतूकीमध्ये घालवल्याने ते अशक्त झाल्याचे निरीक्षण वनताराच्या पशुवैद्यकांनी नोंदवले आहे. ताब्यात घेतलेल्या प्राण्यांपैकी विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असलेल्या २१ लहान शेळ्यांना उत्तराखंडच्या देहराडून येथील 'पीएफए' संस्थेच्या 'हॅपी होम सॅन्कच्युअरी' मध्ये हलविण्यात येणार आहे. या संस्थेच्या संस्थापक गौरी मौलेखी यांनी सांगितले की, " “सशस्त्र सीमा बल आणि बिहार सरकारने बेकायदेशीर जनावरांची वाहतूक रोखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या गंभीर परिस्थितीत, आमच्या पथकांनी 'एसएसबी'च्या सहकार्याने या प्राण्यांची यशस्वीरित्या सुटका केली आणि 'वनतारा'मुळे या प्राण्यांच्या पुनर्वसनासाठी अत्यंत महत्त्वाचा आधार मिळाला.”