"वेळ पडल्यास आमदारकीचाही राजीनामा देणार"; उपमुख्यमंत्री शिंदेंचा शिलेदार नाराज!
16-Dec-2024
Total Views | 438
भंडारा : (Narendra Bhondekar) राज्याच्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम दि. १५ डिसेंबर रोजी नागपूर येथील राजभवन येथे पार पडला. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भंडाऱ्याचे शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी शिवसेनेच्या उपनेते पदाचा तसेच पूर्व विदर्भाच्या समन्वयक पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाने मला मंत्रिपदाचं आश्वासन दिल्यानंतरही आता डावलल्याने शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप होत असून वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामाही देणार असल्याचे नरेंद्र भोंडेकर म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदेंसोबत जाणारा सर्वात पहिला अपक्ष आमदार मी होतो
मागील सरकारच्या वेळेस १० अपक्ष आमदारांपैकी एकनाथ शिंदेंसोबत जाणारा सर्वात पहिला आमदार मी होतो. भाजप - शिवसेना सरकार अस्तित्वात येणार असल्याने कुठल्याही अपेक्षाविना मी शिंदेंसोबत गेलो होतो. त्यावेळी मला पुढल्या वेळेस जेव्हा सरकार येईल त्यावेळेस नक्कीचं तुम्हाला सन्मानाने मंत्रिपद देऊ, असं आश्वासन दिले होते. ज्यावेळी शिवसेनेत पक्षप्रवेश झाला त्यावेळी चर्चा झाली मात्र मंत्रिमंडळात स्थान दिले नाही, महामंडळाची फाईल मुव्ह झाली. त्यानंतर सरकार जेव्हा येईल तेव्हा पहिल्या मंत्रिमंडळात स्थान देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. जाहीरसभेत सुद्धा बोलणं झालं होतं. मात्र, एवढं बोलणं झाल्यानंतर सुद्धा आता मंत्रिमंडळाच्या विस्तारात जे मागून आलेत त्यांना स्थान देण्यात आलं. जे पक्षासोबत प्रामाणिक राहत नाहीत त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं, असं नरेंद्र भोंडेकर म्हणाले.
वेळ पडल्यास मी आमदारकीचा राजीनामा सुद्धा देणार
वेळ पडल्यास मी आमदारकीचा राजीनामा सुद्धा देणार. आम्हाला उधारीचा पालकमंत्री नकोय, जिल्ह्याचा पालकमंत्री हवा, ही आग्रहाची भूमिका आम्ही ठेवून शिवसेनेत पक्षप्रवेश केला. मला देवेंद्र फडणवीस यांचा भाजपमध्ये येण्यासाठी फार मोठा आग्रह होता. मात्र, मी शिवसेनेत जाणं पसंत केलं. पण मला आता शिवसेनेत गेल्यानंतर पश्चाताप झाल्यासारखं वाटतंय. आमचा अधिकार शिंदे साहेबांवर होता. त्यामुळे आम्ही शिवसेनेत गेलो. मात्र, शिंदे साहेबांनी आम्हाला विश्वासात घेतलं नाही. पूर्व विदर्भाचा समन्वयक म्हणून एवढा मोठा पद मला दिलं, मात्र त्या पदाला कुठेही अर्थ आता राहिला नाही, असंही नरेंद्र भोंडेकर म्हणाले.
प्रामाणिकतेचा अर्थ राहत नाही, हे आजच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून दिसून येतं. त्यामुळं प्रामाणिक कितीही राहा त्याला किंमत नाही. जे हुल्लडबाजी करतात त्यांना न्याय मिळतं असं दिसतंय, अशी बोचरी टीका आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे.